
एकनाथ शिंदेच नव्हे, तर अन्य 15 आमदारही अपात्र ठरणार आहेत, शिंदेंचे पुनर्वसन फडणवीस करणार असतील तर इतरांचे काय होणार, असा सवाल शिवसेना नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनी आज केला. शिंदे अपात्र ठरले तर त्यांच्यासाठी ज्यांनी बंड केले, उठाव केले असे बोलणाऱया बाकीच्या बंडखोरांना तर मूठमातीच मिळेल, असे परब म्हणाले.
आमदार अपात्रता सुनावणीवर अनिल परब आज प्रसारमाध्यमांशी बोलले. 31 डिसेंबरपर्यंत निर्णयासकट हे प्रकरण संपवायचे असे सूतोवाच विधानसभा अध्यक्षांनी केले आहे. त्यादृष्टीने त्यांनी नवीन वेळापत्रक बनवले आहे, असे ते म्हणाले.
एकनाथ शिंदेंना विधान परिषदेवर घेऊ आणि त्यांना मुख्यमंत्री करू असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे माध्यमांनी यावेळी सांगितले. त्यावर बोलताना परब यांनी अनेक तांत्रिक मुद्दे उपस्थित केले. ते म्हणाले की, यामध्ये कायदा वेगवेगळा आहे. शिंदे अपात्र होतील तेव्हा ते विधानसभेत होतील. विधान परिषदेत त्यांना घेणे शक्य आहे का? कोणत्या फॅकल्टीमधून ते निवडणून येणार? राज्यपाल नियुक्त होणार की कुणाचा आमदारकीचा राजीनामा घेऊन त्याचा बळी घेऊन ते निवडून येणार? अशा सर्व बाबी विचारात घ्याव्या लागतील. शिंदे एकटेच परत पदावर आले तर बाकीच्या 15 बंडखोरांचे काय? त्यांना वाऱयावर सोडणार का? ते काही एकटेच अपात्र होणार नाहीत. त्यामुळे फडणवीसांचा पर्याय बरोबर की चुकीचा हा वेगळा प्रश्न असला तरी ते अपात्रच होणार याची खात्री मात्र फडणवीसांना पटली आहे. शिंदे अपात्र ठरले तर त्यांच्यासाठी ज्यांनी बंड केले, उठाव केले असे बोलणाऱया बाकीच्या बंडखोरांना तर मूठमातीच मिळेल, असे अनिल परब म्हणाले.





















































