
आतापर्यंत रस्ता नसल्याने, खड्डेयुक्त, पाणंद, डोंगराळ भागातून नागरिक करत असलेला प्रवास पाहिला असेल. मात्र, गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने, नागरिकांना चक्क जीवघेणा जलप्रवास करावा लागतो आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही शेवगाव तालुक्यातील आपेगावकरांचा रस्त्यासाठीचा संघर्ष कायम सुरूच आहे. आतातरी प्रशासन याकडे लक्ष देऊन त्यांचे प्रश्न सोडवणार का, हा खरा सवाल उपस्थित झाला आहे.
ग्रामीण भागातील रस्ते आधुनिक करण्यात येत आहेत. ‘पंतप्रधान सडक योजने’च्या माध्यमातून रस्ते व गावे जोडली गेलेली आहेत. आजवर अनेक गावांना त्यातून रस्ते मिळाले आहेत. तर, अनेक गावांच्या रस्त्यांचा दर्जा सुधारला आहे. ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सोपे व सहज व्हावे, या उद्देशाने गावाचे रस्ते तालुक्याला जोडण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. मात्र, शेवगाव तालुक्यातील आपेगाव त्याला अपवाद राहिले आहे.
दोन हजार लोकसंख्येचे आपेगाव ढोरा नदीपात्रामुळे विभागले गेले आहे. गावाला वस्तीवर जाण्या-येण्यासाठी नदीवर पूल नाही. त्यामुळे वर्षातून आठ महिने या गावकऱ्यांना धोकादायक प्रवास करावा लागतो आहे. लहान मुलांना, वृद्धांना व गावातील गरोदर महिलांना शेवाळलेल्या बंधाऱ्याच्या भिंतीवरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनास जाग येणार आहे का, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. छातीइतक्या खोल पाण्यातून आम्हाला रोज येणे-जाणे करावे लागते आहे. आजवर पाय घसरून दोघांचा जीव गेला आहे. पुलासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींसोबत नेहमीच भांडतो, पण आश्वासनांच्या पलीकडे काही मिळाले नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा
पूल न झाल्यास आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीदरम्यान मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांच्यासह राजू शेळके, बाबासाहेब शेळके, शंकर शेळके, विशाल बाबर, अण्णासाहेब बोरुडे, बाळासाहेब शेळके, रमेश वाघ, ज्ञानेश्वर शेळके यांनी सांगितले आहे.
माझे वडील आजारी आहेत. त्यामुळे मला सोडवायला कुणीच नसते. शाळेत जायचे म्हटले की, पालकांना कामधंदा सोडून शाळेत सोडण्यासाठी व घेण्यासाठी यावे लागते. नदीतून तसेच बंधाऱ्याच्या भिंतीवरून जाताना भीती वाटते. कोणी नसले की, आम्ही घरीच राहतो, त्यामुळे माझी शाळादेखील बुडते.
– दादा शेळके, शाळकरी विद्यार्थी.






















































