सांगली-ईश्वरपूरमध्ये मविआकडून भाजप-शिंदे गटाचा ‘करेक्ट कार्यक्रम’, सत्ताधाऱ्यांना भोपळाही फोडता आला नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली आणि ईश्वरपूरमध्ये महाविकास आघाडीने भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व राखत सांगलीमध्ये महाविकास आघाडीने 18 पैकी 17 जागांवर विजय मिळवला, तर ईश्वरपूरमध्ये 18 पैकी 17 जागा जिंकत विजयी झेंडा फडकावला. तर विटा बाजार समितीत काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजीत कदम भाजपाचे देशमुख आणि आमदार अनिल बाबर यांच्या आघाडीने सत्ता मिळवली.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजप-शिंदे गटाचा धुव्वा उडवत जिल्ह्यावर वर्चस्व सिद्ध केले. भाजपाने मोठा गाजावाजा करत बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपला सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत एकही जागा जिंकता आली नाही. 18 पैकी 17 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या, तर एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली.

या निवडणुकीसाठी भाजपचे कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार विलासराव जगताप यांनी कंबर कसली होती. परंतु महाविकास आघाडीपुढे त्यांचा दारूण पराभव झाला. सत्तेत असून आणि मतदार निहाय खर्च करुनही भाजपाला एकही जागा जिंकता आली नाही.

ईश्वरपूरमध्येही भोपळा

ईश्वरपूर बाजार समितीवर महाविकास आघाडीने आपला झेंडा फडकवला. आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या पॅनलने 18 पैकी 17 जागांवर विजय मिळवत पुन्हा सत्ता काबीज केली. फक्त एक जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला. या ठिकाणीही भाजपचा दारुण पराभव झाला.

विटामध्ये भाजप-शिंदे गटाला काँग्रेसची साथ

विटा बाजार समितीत काँग्रेस, भाजपा आणि शिंदे गट अशा विचित्र युतीने बाजार समितीची सत्ता काबीज केली. या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड व वैभव पाटील यांचा पराभव झाला.