पुण्याची मराठमोळी अपूर्वा झळकणार बॉलिवूडमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

गेल्या काही दिवसात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री बॉलिवूडमध्येही आपली झलक दाखवताना दिसत आहेत. त्यापैकी एक नवोदित अभिनेत्री अपूर्वा कवडे हीनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून एक अनलिमिटेड- दि मर्डर मिस्ट्री या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील अपूर्वा कवडे हिने याआधी बऱ्याच शॉर्टफिल्म केलेल्या आहेत. अभिनयाचा पहिला ब्रेक तिला शॉर्ट फिल्मद्वारे मिळाला होता. त्याचप्रमाणे इंटरनॅशनल पंजाबी म्युझिक अल्बमध्येही तिने काम केलेले आहे. हा अल्बम जगभर प्रदर्शित झाला आहे.

आता तिला निर्माते पी.अभयकुमार यांच्या एक अनलिमिटेड-दि मर्डर मिस्ट्री या चित्रपटात ब्रेक मिळाल्याने ती भलतीच खूश आहे. कोणताही ओळखीचा फायदा न घेता तिने ऑडिशनमार्फत ही भूमिका मिळवली आहे. स्वत:च्या स्किलवर एवढी मोठी भूमिका मिळणं फार अभिमानाची गोष्ट असते असं ती सांगते. त्यातही या चित्रपटात सगळे प्रसिद्ध आणि अनुभवपूर्ण कलाकार असल्याने ती या चित्रपटासाठी फारच उत्सुक आहे. त्याचप्रमाणे हिंदी चित्रपटात ब्रेक मिळाल्याने हा चित्रपट करिअरला दिशा देणारा ठरणार आहे, असंही ती सांगते.

या चित्रपटाचे निर्माते पी.अभयकुमार, दिग्दर्शक डि.के.बर्नवाल, तर गायक विनोद राठोड, संगीतकार संजयराज अशी दिग्गज पार्श्वभूमी या चित्रपटाला लाभली असून विजू खोटे, विजय कदम, मुकेश तिवारी, विजय पाटकर, वृषाली गोसावी, निखिल परमार, अरुण बक्षी असे प्रसिद्ध कलाकारही या चित्रपटात दिसणार आहे. अशा दिग्गजांसोबत काम करायला मिळणार असल्यामुळे अपूर्वा फार उत्सुक आहे. या चित्रपटाचे शुटींग लवकरच सुरू होणार असून चित्रपटाचं एक गाणं रेकॉर्ड करून झालं आहे.