आशियाचा स्थापत्य वारसा: अवाढव्य वृक्षांनी ग्रासलेले राजविहार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. मंजिरी भालेराव

इंडियाना जोन्स, लारा क्रोफ्ट या संपूर्ण जगात लोकप्रिय झालेल्या व्यक्तिरेखांनी जगातील काही पुरातत्वीय स्थळांची लोकांना ओळख करून दिली. त्यांच्याशी संबंधित इतिहास किंवा पुराणकथा यांची माहिती करून दिली. अप्रतिम छायाचित्रणाने या स्थळांचे सौंदर्य अजूनच उजळून निघाले. ही ठिकाणे पर्यटनस्थळे बनली. यापैकी लारा क्रोफ्ट हिची भूमिका साकारणारी अन्जेलीना जोली ही मुळातच एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि त्यातून अतिशय गूढ अशा वातावरणातले चित्रीकरण, त्यामुळे ‘टुंब रेडर’ हा चित्रपट यशस्वी झाला नसता तरच नवल. त्या चित्रपटात जे स्थळ दाखवले गेले आहे ते म्हणजे कंबोडियातील अक्राळ-विक्राळ झाडांनी ताबा मिळवलेले ‘ता फ्रोम.’ आज ‘ता प्रोम’ या नावातील ‘ता’ म्हणजे पूर्वज आणि ‘प्रोम’ म्हणजे ‘ब्रह्मा’ आहे, पण मुळात हा परिसर म्हणजे एक बौद्ध विहार म्हणजे मठ होता. त्याचे जुने नाव होते ‘राजविहार’. कंबोडियातील राजा जयवर्मन (7 वा) हा त्याच्या भव्य इमारतींच्या रचनेसाठी प्रसिद्ध आहे. त्याचा ओढा बौद्ध धर्माकडे होता. त्यानेच इ. स. 1186 मध्ये या विहाराची स्थापना केली आणि त्याचे नाव ठेवले राजविहार. या परिसरात या इमारतींच्या स्थापनेच्या वेळचा शिलालेख मिळाला आहे. त्यामध्ये याची माहिती आहे.
जयवर्मन (7 वा) हा कंबोडियातील सर्वात श्रेष्ठ राजांपैकी एक होता. त्याने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी आणि त्या धर्माच्या तत्त्वांनुसार लोककल्याणासाठी विविध प्रकारच्या स्थापत्याची निर्मिती केली. लोकांचे दुःख दूर करणे हे त्याचे आद्य कर्तव्य होते, अशी त्याची धारणा होती. प्रजेच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी त्याने 102 आरोग्यशाळा (रुग्णालये) बांधली होती, हे आपण मागे पाहिले होते. प्रजेचे शारीरिक आणि अध्यात्मिक पातळींवर कल्याण व्हावे यासाठी तो झटत होता, हे त्याच्या लेखातून तो स्पष्ट करतो. महायान बौद्ध धर्मातील करुणामयी बोधिसत्त्व अवलोकितेश्वर जसा त्याच्या भक्तांची काळजी घेतो तसाच हा राजाही त्याच्या प्रजेची काळजी घेतो, असे त्याने बऱयाचदा सूचित केले आहे. अवलोकितेश्वराची मंदिरेही बांधली, पण या राजविहारामध्ये त्याने बौद्ध विहार आपल्या आईचे म्हणजे राणी जयराजचूडामणी हिचे स्मारक म्हणून प्रज्ञापारमिता या बौद्ध देवतेचे मंदिर तसेच त्याचे गुरू जयमंगलार्थ यांच्याही स्मरणार्थ मंदिरे बांधली होती. त्याने प्रीह खान हे मंदिर आपल्या वडिलांच्या म्हणजे धरणींद्रवर्मन (2 रा) यांच्या स्मरणार्थ बांधले होते.
60 हेक्टरमध्ये पसरलेल्या या विविध इमारतींमध्ये 12 हजार 640 सेवक राहत होते, अशी या विहाराच्या स्थापनेच्या शिलालेखातील माहितीवरून लक्षात येते. या परिसरात 18 पुजारी, 2740 अधिकारी, 2202 सहाय्यक आणि 615 नर्तिका होत्या. आसपासच्या 3140 गावांतून 80 हजारांच्या आसपास लोक येऊन इथे विविध प्रकारच्या सेवा देत असत. या विहारमध्ये भरपूर संपत्ती गोळा झाली होती असेही या लेखावरून समजते. त्यामध्ये सोने, मोती आणि रेशमी वस्त्र्ाs यांचा समावेश होतो. या परिसराच्या भोवती पाच तटबंदी बांधल्या होत्या. त्या पार करूनच आपल्याला आतपर्यंत जाता येते. प्रत्येक भिंतीत चार मुख्य दिशांना गोपुरे म्हणजे प्रवेशद्वारे आहेत, त्यापैकी काहीच आज उघडी आहेत. मध्ये-मध्ये अनेक शिल्पे कोरलेली दिसतात. कंबोडियातील इतर मंदिरांवरील शिल्पांप्रमाणे इथेही कमी उठावाची शिल्पे आहेत. त्यामध्ये सिद्धार्थ घोडय़ावर बसून घराबाहेर पडण्याचा प्रसंग, अवलोकितेश्वर, प्रज्ञापारमिता, काही अप्सरा, ध्यान करणारे साधू किंवा भिक्षू तसेच काही बौद्ध पुराकथांमधील प्रसंग आजही पाहायला मिळतात. येथे एकूण 260 देवतांच्या मूर्ती, 39 मनोरे, 566 निवासस्थाने होती. या इमारतींमध्ये आज मूर्ती नाहीत. काही छोटी मंदिरे आणि इतर इमारतींमध्ये ग्रंथालय, भिक्षूंच्या खोल्या, नर्तकांचा मंडप अशा अनेक खोल्या या परिसरात आहेत. खंदकाचे अवशेष आहेत. इ.स.च्या 15 व्या शतकापर्यंत या परिसरात इमारतींची भर पडत होती असे दिसते. काळाच्या ओघात जेव्हा इथली वस्ती कमी झाली तेव्हा या इमारतींचा ताबा झाडा-झुडपांनी घेतला. बहुतांशी शिल्पे आणि इमारती आज फारच वाईट अवस्थेत आहेत. बरीच भिंतींवर वाढलेल्या झाडांमागे लपली आहेत.
‘ता प्रोम’ या स्थळाची प्रसिद्धी तेथील महाकाय वृक्षांमुळेच जास्त आहे हे दिसते. सुरुवातीला लहान असणारी ही झाडे पुढे अवाढव्य आकाराची बनली आणि त्यांनी अक्षरशः या मंदिरांचा ताबा घेतला. काहींना गिळंकृतच केले. अनेक इमारतींची प्रवेशद्वारेच बंद झाली, काही शिल्पे झाकून टाकली. या बांधकामात कोणत्याही इतर माध्यमाचा वापर केलेला नव्हता, त्या शुष्कसांधी इमारती होत्या. त्यामुळे दोन दगडांच्या मधल्या फटीतून उगवलेली ही झाडे सहजच महाकाय बनली. त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणीही नव्हते, त्यामुळे कोणतीही डागडुजी झाली नाही. झाडे कशीही वाढली. वादाच्या झाडांच्या पारंब्या जमिनीमध्ये गेल्या आणि त्यांची मोठी जाळीच तयार झाली. त्या जाळय़ांच्या मागे मंदिरे लपली, त्यांची प्रवेशद्वारे बंद झाली. आज जर या वृक्षांपासून स्मारकांना मोकळे करायचे असेल तर वृक्ष तोडताना त्यांनी पकडलेले दगडही पडणार आणि ती इमारतच कोसळणार हे नक्की. त्यामुळे या परिसराचे जतन आणि संवर्धन करताना फक्त इमारतींच्या बाजूचे वृक्ष तोडले आहेत, बाकीचे तसेच ठेवले आहेत. या परिसरात दगडांचा खच पडला आहे. काही पडलेल्या भागाची पुनर्बांधणी केलेली आहे, पण इथे फिरताना पडलेले दगड, वाढलेली झाडे, अर्धवट तुटलेली वाट यामधून कंबोडियाच्या पुरातत्व खात्याने अनेक पायवाटा तयार केल्या आहेत. जमिनीला धक्का लागू नये म्हणून त्यावर लाकडी फळय़ा घातल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांची चांगली सोय झाली आहे.
सध्या जगभरातून पर्यटक कंबोडियातील ऐतिहासिक, धार्मिक स्मारके आणि वारसा स्थळे पाहायला येतात. त्या सगळय़ांच्या यादीमध्ये अंगकोरवाटनंतर ‘ता प्रोम’ या स्थळाचे नाव नक्की असते. या परिसरात पर्यटकांना फोटो काढण्यासाठी खास जागा तयार केल्या आहेत, त्याचा भरपूर लाभ ते उठवतात.
सगळय़ात महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे, या आणि इतर स्थानाच्या जतन आणि संवर्धनात कंबोडिया सरकारला हिंदुस्थान सरकार गेले कित्येक वर्षे मदत करत आहे. त्याबद्दलची सविस्तर पाटी तिथे लावलेली आहे. ती पाहताना आपल्या देशाबद्दलचा अभिमान द्विगुणीत होतो. कंबोडिया पर्यटनावर चालणारा देश आहे, पण कोरोनानंतर त्या देशाचीही परिस्थिती बिकट झाली आहे. अर्थकारण कोलमडले आहे. आता पर्यटन उद्योग परत रूळावर यायला लागला आहे. त्यामुळे या वारसासमृद्ध देशाला मदत झाली तर चांगलेच आहे.
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ,
पुणे येथे असोसिएट प्रोफेसर ऑफ इन्डोलॉजी आहेत)
– [email protected]