
सामना ऑनलाईन, इंदूर
मध्य प्रदेशात उमेदवारांसाठी गळ टाकून बसलेल्या पक्षांमुळे इच्छुक उमेदवारांना लॉटरी लागली आहे. एका इच्छुकाला अतिहाव नडली आणि मिळालेलं तिकीटही तो गमावून बसला. अर्जुन आर्य असं या उमेदवाराचं नाव आहे. अर्जुन आर्य यांची उमेदवारी स्वत: अखिलेश यादव यांनी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी आर्य यांनी काँग्रेसकडून तिकीट मिळेल या हावेपोटी समाजवादी पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच काँग्रेसने आर्य यांना काँग्रेस कल्चरची झलक दाखवत त्यांच्याऐवजी माजी प्रदेशाध्यक्ष अरूण यादव यांना तिकीट जाहीर केलं.
अर्जुन आर्य यांना सपाने बुधनी मतदारसंघातून उमेदवारी देऊ केली होती. याच मतदारसंघातून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे निवडणूक लढवतायत. या मतदारसंघातून समाजवादी पक्षातर्फे अर्जुन आर्य यांनी धडाक्यात प्रचारही सुरू केला होता. काँग्रेसमध्ये येऊन तिकीट न मिळाल्याने आर्य यांची सगळी मेहनत वाया गेली आहे.



























































