
घरोघरी जाऊन मतदारांची माहिती गोळा करण्यासाठी एका खासगी संस्थेची नियुक्ती करून निवडणूक पद्धतीत घोटाळा केल्याचा आरोप करत कर्नाटकातील काँग्रेसने आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस आणि पक्षाचे कर्नाटक प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी बेंगळुरू येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, बेंगळुरू महानगर पालिकेने ऑगस्टमध्ये एका खासगी कंपनीला मतदारांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी नियुक्त केले. ज्यांनी त्यांचे लिंग, मातृभाषा, मतदार ओळखपत्र आणि आधार तपशील गोळा केला.
‘मुख्यमंत्री हे निवडणुकीतील या घोटाळ्याचे सूत्रधार होते’ असा आरोप करून ते म्हणाले, ‘बसवराज बोम्मई यांच्या विरोधात एफआयआर नोंदवावी आणि त्यांना अटक झाली पाहिजे’.
गोळा झालेला डेटा सरकारच्या गरुड ऍप्लिकेशनमध्ये नाही तर खासगी कंपनीच्या ‘डिजिटल समीक्षा’ ऍप्लिकेशनमध्ये भरला गेला होता, असा आरोप सुरजेवाला यांनी आरोप केला.
‘कंपनीने शेकडो बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) देखील नियुक्त केले आहेत, जे तांत्रिकदृष्ट्या सरकारी नियुक्त व्यक्ती असावेत. या बीएलओंना देखील ते सरकारी कर्मचारी असल्यासारखे ओळखपत्र देण्यात आले होते’, असेही सुरजेवाला म्हणाले.
‘आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की बीबीएमपीच्या वतीने एका खासगी संस्थेला सर्वेक्षण करण्याची परवानगी कोणी दिली? खासगी संस्थेला असे कंत्राट देण्याची शिफारस सरकारला कोणी केली आणि कंत्राटदाराचा इतिहास आणि अन्य माहिती का तपासली गेली नाही?’, असेही सुरजेवाला म्हणाले.

























































