गुरू साक्षात परब्रह्म

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>विवेक दिगंबर वैद्य

वेदविद्येचा परिचय, प्रचार आणि प्रसार सर्वत्र, सर्वदूर होणे हेच अवतारकार्य मानणाऱया श्रीरामकृष्ण महाराजांचा हा परिचय.
‘श्री गुरुचरित्रा’च्या सोळाव्या अध्यायात श्रीगुरू नृसिंहसरस्वती यांनी योग्य गुरूच्या शोधार्थ आलेल्या ब्राह्मणाला मार्गदर्शन केले त्याविषयीचा वृत्तांत दिलेला आहे. जो वेद, शास्त्र, व्याकरणादी विद्या शिष्याला प्रदान करतो तो ‘खरा’ गुरू असे सांगत ‘गुरू’ हाच शंकर, गुरू हाच ब्रह्म आणि गुरू हेच नारायणस्वरूप जाणावे असे श्रीगुरू त्या ब्राह्मणाला सांगतात. ‘श्रीगुरुचरित्रा’तील अनेकविध प्रसंगांतून गुरुमाहात्म्याचे वर्णन केलेले आहे. सृष्टीची उत्पत्ती झाली तेव्हापासून वेद आणि वेदविद्येचा सांभाळ व संवर्धन केवळ गुरुश्रेष्ठांनीच केलेला आहे. युगांमागून युगे सरली, सकल चराचरांत कालानुरूप बदल घडले तरी हे नवनवे बदल आत्मसात करीत गुरुश्रेष्ठांनी या धर्माची घडी निगुतीने बसवली हेच ‘खरे’ गुरुमाहात्म्य आहे. जेव्हा धर्माला ग्लानी येण्याचे प्रसंग उद्भवले तेव्हा परमेश्वराने विविध अवतार घेत धर्माचे रक्षण केले. त्याच्या या कार्याला बळकटी देण्यासाठी प्रत्येक वेळी गुरुपरंपराच पुढे सरसावली. अशा समृद्ध गुरुपरंपरेमधील एक महत्त्वाचे नाव गुरुदेव श्रीरामकृष्ण महाराज क्षीरसागर यांचे आहे. धर्मरक्षणाकरिता प्रकट झालेले हे ईश्वरीय तत्त्व श्रीरामकृष्ण महाराजांच्या ‘गुरु’स्वरूपात अवतीर्ण झाले.

फाल्गुन शुद्ध तृतीया, शके 1855, अर्थात 16 फेब्रुवारी 1934 या दिवशी नगर जिह्यातील पारनेर तालुक्याच्या ‘रायतळे’ गावात श्रीगुरुदेवांचा जन्म झाला. क्षीरसागर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. बालपणी पितृछत्र हरपलेला रामकृष्ण आपल्या कुटुंबासह नगर शहरात दाखल झाला. ओढगस्तीच्या जगण्यात लहानग्या लेकरांची जितकी परवड होते तितकी ‘परवड’ रामकृष्णाच्याही नशिबाला चुकली नाही, मात्र त्यातही वेगळेपणाची चुणूक दिसून यावी म्हणून घडलेल्या एका प्रसंगामुळे रामकृष्णाची आयुष्याकडे पाहण्याची नजर आणि दृष्टिकोन पूर्णतः बदलला. सातेक वर्षांचा रामकृष्ण घराच्या दरवाजात उभा असताना त्याचे लक्ष सहजच आकाशाच्या दिशेने गेले. तेव्हा त्या विस्तीर्ण अवकाशामध्ये त्याला एका तेजस्वी व्यक्तीचे दर्शन घडले. रामकृष्ण त्या व्यक्तीकडे कुतूहलाने पाहता झाला. एवढय़ात नजरानजर होण्याचा अवकाश, ती व्यक्ती अंतर्धान पावली. त्या दिव्य आणि अलौकिक अनुभवामुळे रामकृष्णाचे आयुष्य पूर्णपणे बदलले.

या दिव्य घटनेनंतर अवघ्या तीन वर्षांनी रामकृष्णाला श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराजांचा स्वप्नदृष्टांत साक्षात घडला. या स्वप्नदृष्टांताद्वारे श्रीगुरूंनी रामकृष्णाला तात्काळ गाणगापुरास बोलावून घेतले. दहा वर्षांचा रामकृष्ण स्वप्नसंकेतानुसार श्रीक्षेत्र गाणगापुरास पोहोचला तेव्हा त्याला श्रीगुरूंनी सगुणरूपात दर्शन दिले अन् अनुग्रह देतेवेळी पुढे तपश्चर्या करण्याच्या निमित्ताने 25 वर्षे जनसंपर्कापासून दूर निर्जन स्थळी एकांतवासात राहण्यास सांगितले. रामकृष्णाने तपश्चर्येस प्रारंभ केला. तपश्चर्येने सिद्ध झालेल्या रामकृष्णांना पुढे 15 वर्षांनी एकाएकी श्रीपांडुरंगाचे थेट दर्शन घडले. रात्री दोन वाजता रामकृष्णांना श्रीविठ्ठलाचे सालंकृत रूप दिसले तेव्हापासून नित्यनेमाने रात्री दोन वाजता ते साधना करण्यास बसू लागले. ही 25 वर्षे रामकृष्णांची परीक्षा पाहणारी ठरली. अतोनात हाल झाले. भोवतालच्या अज्ञानी जीवांकडून त्यांना निंदा व कुचेष्टांचे घाव सहन करावे लागले. तरीही आपले जीवन मानवकल्याणाकरिता आहे याची स्पष्ट जाणीव श्रीगुरूंनी करवून दिली असल्याने हा उपद्रव रामकृष्णांनी सहन केला. जननिंदेचे विषारी डंख सोसत ते श्रीगुरुचरणी ‘रत’ झाले. अखेर 25 वर्षांनंतर त्यांना पुन्हा श्रीगुरूंचे साक्षात दर्शन घडले आणि ‘‘मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करवून घ्यायचे आहे’’ अशी गुरुआज्ञा प्राप्त झाली.

यापुढील काळ रामकृष्णांच्या अवतारकार्याचा बहराचा काळ होता. योजनाबद्ध रीतीने पावले टाकीत रामकृष्ण पुढे जात राहिले. त्यांच्या वेदरक्षणाच्या कार्याला जनाधार मिळता झाला. कर्तबगार अन् बुद्धिनिष्ठ भक्तांचे साहाय्य प्राप्त झाले. श्रीगुरूंचा आशीर्वाद आणि रामकृष्ण महाराजांची तळमळ एकत्र कार्य करती झाली आणि त्यातूनच सन 1974 मध्ये ‘श्रीदत्तात्रेय निवास’ ही वास्तू उभी राहिली. श्रीरामकृष्ण महाराजांची अखंड तपश्चर्या आणि त्यांच्या व्यक्तित्वाचे पावित्र्य यातून साकारलेल्या ‘श्रीदत्तात्रेय निवासा’मध्ये साक्षात श्रीनृसिंहसरस्वती महाराजांची चरणपावले उमटली. श्रीगुरूंच्या या ‘चिंतामणी पादुका’ आज श्रीदत्तात्रेय निवासाच्या पावित्र्याचे प्रतीक बनल्या आहेत.

वेदांचे संरक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज आहे हे ओळखून गुरुदेव श्रीरामकृष्ण महाराजांनी ‘वेदांत’ या वेद विद्यापीठाची स्थापना केली. याद्वारे चारही वेदांचे अध्ययन आणि अध्यापन प्राचीन गुरुकुल पद्धतीने केले जाते. वेद ही साक्षात परमेश्वराच्या मुखातून प्रकटलेली वाणी आहे. वेदरक्षण करणे हे परमेश्वरी कार्य आहे. वेदोच्चाराने बुद्धीला चालना मिळते, शरीरावर सुयोग्य परिणाम होतो, वेदपठणामुळे दिव्य शक्ती निर्माण होतात. जड जीवांची उत्पत्ती व पालनपोषण होते, निसर्गाचे रक्षण होते व प्रदूषण नियंत्रित होऊन चराचर सृष्टीचा समतोल साधला जातो. वेदांतामध्ये सांगितलेला धर्म सद्यकाळात कसा अनुसरावा हेदेखील गुरुदेवांनी साध्यासोप्या प्रासादिक वाणीत सांगितले. त्यांची ही अनमोल विचारधारा ग्रंथरूपाने उपलब्ध आहे. अमृतवर्षा, गुरुदर्शन, रामकृष्णलहरी, अमृतकणप्रवाह, अमृतकलश, धर्मदर्शन, सद्गुरुसंवाद अशा विविध संग्राह्य ग्रंथांमधून प्रकट झालेले श्रीरामकृष्ण महाराजांचे अभ्यासपूर्ण वेदांतविचार आणि शिकवण अनुकरणीय आहे. खरा धर्म आणि त्याचे नेमके स्वरूप काय आहे याविषयीचे गुरुदेव श्रीरामकृष्णांचे विचार अभ्यासकांसाठी मार्गदर्शनीय आहेत.

वेदांताला अभिप्रेत असलेला धर्म आणि त्याचे वर्म गुरुदेवांनी सहज समजेल अशा भाषेत सांगितले. धर्म म्हणजे चांगला विचार धारण करणे आणि प्रत्यक्षात आचरणात आणणे अशी सोपी व्याख्या त्यांनी केलेली आहे. त्यांच्या सहिष्णू विचारांमुळे आज विविध जातीधर्मांतील लोक त्यांचे अनुयायी आहेत. गुरुदेवांचे आध्यात्म जातीभेद अन् वर्णभेदाच्या पलीकडे आहेत. प्रापंचिकांना कर्तव्यभावनेने प्रपंच करीत आध्यात्मिक आचरण करता येते हे निक्षून सांगणारे, साधकाला प्रतिकूल परिस्थितीतून आत्मविश्वासाने बाहेर काढणारे आणि धर्माचरणास उद्युक्त करणारे असे हे प्रगत आणि वेदाधिष्ठत विचार आहेत. गुरुदेवांची विचारधारा सन 1999 मध्ये लोप पावली तरीदेखील त्यांच्या नीलवर्णकांतीचे संपूर्ण अधिष्ठान आज नगर येथील ‘श्रीदत्तात्रेय निवास’ या पवित्र वास्तूमध्ये आत्मज्योतीच्या रूपाने चिरंतन जागृत आहे.

गुरुदेवांच्या आशीर्वादाने सन 1980 मध्ये मुंबईत ‘भगवान श्रीदत्तात्रेय सत्संग मंडळ’ स्थापन करण्यात आले. त्यायोगे वेदांचे संवर्धन संशोधन व संरक्षण, वेदपाठशाळांना मदत, राष्ट्र उभारणीसाठी सांघिक प्रयत्न यांना प्राधान्य दिले जाते. त्याशिवाय वेदांच्या प्रचार व प्रसार कार्यास हातभार लावू इच्छिणाऱया जिज्ञासूंना संस्थेच्या 022-23804446 या संपर्क क्रमांकावर आवर्जून माहिती देण्यात येते.

[email protected]