कोरोना, अफवा, आर्थिक लूट आणि योगशास्त्र!

>> दिलीप जोशी

आज ‘कोरोना’ शब्दाचा धसका न घेणारे जगाच्या पाठीवर दुर्मिळच असतील. एवढी या विषाणूने कुप्रसिद्धी प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे अशा प्रसंगी अफवांचा बाजारही तेजीत आहे. त्यामुळे कित्येकजण अफवांनेही धास्तावत आहेत. कोरोना विषाणूने शाकाहारी आहाराचे महत्त्व जगाला पटवून दिले आहे. अचानकपणे नवख्या आजाराने डोके वर काढले तर त्याचा सामना कसा करायचा याविषयी पूर्णतः अनभिज्ञता असते. जे आज कोरोनाविषयी जग अनुभवत आहे. त्यातून रुग्णांची लूट करण्याचे प्रकारही घडत आहेत. कोरोनामुळे प्रतिकार क्षमतेचेही महत्त्व सगळय़ांनाच लक्षात आले आहे आणि त्यादृष्टीने आपले योगशास्त्र नक्कीच उपयुक्त आहे.

कोरोना विषाणूमुळे देशाची आणि नागरिकांचीही आर्थिक हानी झाली आहे. मात्र अर्थशास्त्राचा ‘अ’ आणि इकॉनॉमीचा ‘ई’ ही माहिती नसणारे ढोंगी विचारवंत, निरर्थक बुद्धिवादी वाचाळपणा करून वैयक्तिक प्रसिद्धीची हौस भागवत आहेत. त्यांना चाप लावणे अत्यंत निकडीचे आहे. कारण एखादी चुकीची गोष्ट वाचल्यावर त्याविषयी कोणाच्या मनामध्ये नेमकी काय विचारप्रक्रिया चालू होईल हे सांगता येत नाही. ती गोष्ट योग्य-अयोग्य हे पडताळून पाहण्याची समज सर्वांनाच असते असे म्हणता येणार नाही. त्यामुळे कठीण स्थितीत वैचारिक प्रदूषणाची भर टाकणाऱयांना कायदेशीर हिसका दाखवलाच पाहिजे.

या विषाणूचा प्रभाव काही अंशी मांसाहारावर झाला आहे. म्हणजे काही लोकांनी मांसाहार अल्प केला आहे. पूर्णपणे बंद केलेला नाही, तर काही मंडळी मांसाहारी गोष्टींचे मूल्य घसरल्याने त्यावर अधिक ताव मारण्यास हरकत नसल्याचे सांगत आहेत. पुढे असेही सांगत आहेत की, मांसाहार केल्याने काही होत नाही. तो करू शकतो. यामुळे शरीराची प्रतिकार क्षमता अधिक वाढते. आवश्यक पोषक घटक मिळतात वगैरे शेखी मिरवत आहेत. म्हणजे थोडक्यात विनामूल्य (फुकट) सल्ले देत आहेत आणि स्वतः प्रवास करताना मास्क लावून फिरत आहेत. प्रश्न असा पडतो की, मांसाहार करून यांची प्रतिकार क्षमता कशी वाढली नाही की ज्यामुळे यांना एका विषाणूची धास्ती वाटून मास्क लावून फिरावे लागत आहे. अशा दुतोंडी लोकांपासून सावध राहावे.

एक लक्षवेधी सूत्र असे की, आपण जे सेवन करतो त्याचा साधक-बाधक परिणाम शरीरावर होत असतो. मानवी शरीर म्हणजे काही यंत्र नाही. यंत्र हे नियंत्रित केले जात असते. मानवी शरीर वात, पित्त, कफ यांपासून बनलेले आहे. शरीरामध्ये याचे संतुलन असणे महत्त्वाचे असते. आज जरी एखादी गोष्ट ग्रहण केल्यावर तिचा नकारात्मक परिणाम जाणवत नसला तरी वातावरण विद्यमान स्थितीपेक्षा अधिक खालावले तर तेच शरीर त्यावेळी संबंधित त्रासाचे लक्ष्य बनते, बनू शकते. याचा उद्याच्या दृष्टीने गांभीर्याने विचार केला आहे का? आज त्रास नाही म्हणजे भविष्यात होणारच नाही. या भ्रमात राहणे म्हणजे खुशीत गाजर खाण्यासारखे आहे.

सर्वोत्तम आहार म्हणजे शाकाहारच होय. कोरोना विषाणूने शाकाहारी आहाराचे महत्त्व जगाला पटवून दिले आहे. जे याप्रमाणे आहार घेत असतील त्यांना नक्कीच मांसाहार आणि शाकाहार यात उत्तम आहार कोणता हे लक्षात येईल. किंबहुना ते लक्षात येण्यास आरंभ झाला असेल. ज्यांना अद्यापही तसे लक्षात आलेले नाही, हे हास्यास्पद वाटते त्यांचा ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या वाक्यावर विश्वास नसावा. स्वतः सोसल्याशिवाय कोरोना आजारात होणारा शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास काय असतो हे कळत नाही. आज आजारपणाचा सामना करणारे जात्यात आहेत आणि अन्य व्यक्ती सुपात आहेत. निसर्गचक्र कधी कसे फिरू शकते हे तोकडय़ा मानवी बुद्धीला कळणे, आकलन होणे काही मर्यादेपर्यंतच शक्य आहे. त्यामुळे सदैव सुरक्षित राहण्यासाठी योग्य काय त्याची कास पकडून वाटचाल करणे हितावह असते. अन्यथा ‘अति शहाणा त्याचा बैल रिकामा’ अशी स्थिती होण्यास विलंब लागणार नाही.

विशेषतः पावसाळ्यामध्ये काही विशिष्ट साथी धुमाकूळ घालतात. त्यांचा सामना कसा करायचा याविषयी सर्वांनाच बऱयापैकी माहिती आहे. मात्र इतरवेळी अचानकपणे नवख्या आजाराने डोके वर काढले तर त्याचा सामना कसा करायचा याविषयी पूर्णतः अनभिज्ञता असते. जे आज कोरोनाविषयी जग अनुभवत आहे. त्यातून रुग्णांची लूट करण्याचे प्रकारही घडत आहेत. परिस्थितीचा अपलाभ घेऊन नागरिकांची लूट करणारे लबाडही (संधीसाधू) नेहमीपेक्षा अधिक ताकदीने अशा वेळी सक्रिय होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नागरिकांना अल्प दरात उपचार उपलब्ध असले आणि त्याची माहिती नसली तर त्यांचा खिसा रिकामा करण्याचे षडयंत्र काही भ्रष्ट लोक करतात. सर्वच हॉस्पिटल किंवा डॉक्टर भ्रष्ट आणि लुटारू नसले तरी आरोग्य क्षेत्रातील या लबाडीविषयी नागरिकांत कायमच रोष राहिला आहे. या क्षेत्रात आता नेमके काय चालू आहे? याकडे अधिक बारीक लक्ष असले पाहिजे. संधीचा फायदा घेणाऱयांना केवळ आणि केवळ पैशांशी देणेघेणे असते. आपला रुग्ण वाचला पाहिजे यासाठी त्याचे कुटुंबीय झटत असतात, तर तावडीत मिळालेला हा रुग्ण म्हणजे ‘सोन्याचे अंडे देणारी कोंबडी’च असल्याप्रमाणे त्याचे आर्थिक शोषण होत असेल तर त्याने ते तत्काळ संबंधित यंत्रणेला कळवले पाहिजे. त्या यंत्रणेकडूनही प्रतिसाद मिळत नसेल तर पुढे पुढे जात राहिले पाहिजे आणि होत असलेला अन्याय मोडून काढला पाहिजे. मुख्य म्हणजे कोणताही आजार, त्रास, संसर्ग हा व्यक्तीच्या थेट शरीरावर आक्रमण करतो. त्याचे शरीर त्या त्रासाशी झुंजत असते. मात्र फायदा लाटणारे ‘मृताच्या टाळूवरचे लोणी’ कसे मिळेल याकडे लक्ष ठेवून असतात.

शरीराची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी ‘योगा’सारखा सर्वोत्तम उपाय नाही. येथे काही व्यायामशाळेप्रमाणे वजन उचलायचे नाही की शरीरावर जोर येईल अशा काही कृती करायच्या आहेत. प्राणायामामुळे शरीराची प्रतिकार क्षमता उत्तम प्रकारे वाढते. यासह आहार शाकाहारी असेल तर अतिउत्तम! आज अखंड जग हस्तांदोलन टाळून ‘नमस्कार’ करीत आहे. यामुळेच कित्येकजण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचले असतील यात शंका नाही. ज्यांना योगाचे महत्त्व पटले आहे, त्याचा लाभ अनुभवला आहे अशी विदेशी मंडळी काही कालावधीपासून योगा करत आहेत. तसेच इतरांनाही शिकवत आहेत. असे असताना आपले योगशास्त्र आपण कधी शिकणार आणि इतरांना शिकवणार? कोणत्याही नवीन विषाणूजन्य आजाराचा फैलाव झाल्यावर बाजारात त्याविषयी नेमक्या औषधी उपलब्ध नसतात हे लक्षात घेतले पाहिजे. योगशास्त्र शिकण्याशिवाय पर्याय नाही अशीच वर्तमान स्थिती आहे. व्यावहारिकदृष्टय़ा व्यक्ती नोकरी- व्यवसायातून मिळणारे वेतन-लाभ कुठे गुंतवायचे याविषयी चौकस असतो. मात्र शरीराविषयी तसे गांभीर्य नाही. केवळ ‘कोरोना’पर्यंत विचार न करता निरोगी भविष्याचा विचार झाला पाहिजे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या