पोलीस डायरी – पोलिसांचे वाढते बळी; वरिष्ठांनो, सौजन्याने वागा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रभाकर पवार ([email protected])

शौर्यपदक विजेते सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन दिगंबर काकडे शनिवारी सकाळी मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे जॉगिंग करताना रस्त्यातच कोसळले. त्यांना जमलेल्या लोकांनी पोलिसांना बोलावून जवळच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने काकडेंचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

आगामी मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेण्यासाठी नितीन काकडे रोज सकाळी धावण्याचा सराव करीत असत, परंतु नियमित धावण्याचा व्यायाम करणाऱ्या नितीन काकडेंवर वयाच्या 42 व्या वर्षीच नियतीने घाला घातला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई-वडील असा परिवार आहे. पुण्याच्या सासवड येथील पांधरे गावच्या नितीन काकडे यांनी ‘26/11’च्या पाकिस्तानी हल्ल्यात सक्रिय भाग घेतला होता. या अलौकिक कामगिरीबद्दल राष्ट्रपतींनी 2008 साली पोलीस उपनिरीक्षक असलेल्या नितीन काकडे या अधिकाऱ्याचा शौर्यपदक बहाल करून गौरव केला होता. परंतु या उमद्या तरुण पोलीस अधिकाऱ्याचा कामाच्या प्रचंड ताणामुळे बळी गेला असून दर दोन-चार दिवसांनी मुंबई पोलीस दलातील एकातरी पोलिसाला कामाच्या अतिताणामुळे आपला प्राण गमवावा लागत आहे.

वाढत्या प्रदूषणामुळे तर मुंबईतील वाहतूक पोलिसांची फुप्फुसं, मूत्रपिंड निकामी होत आहेत. त्यांच्यामधील क्षय व कर्करोग बळावत आहे. रक्तदाब व मधुमेह तर मुंबई पोलिसांच्या पाचवीला पुजलेला आहे. दरवर्षी मुंबई पोलीस दलातील सरासरी सुमारे 150 पोलीस अधिकारी व कर्मचारी विविध कारणांमुळे  अकाली मरण पावतात. त्यात हार्टऍटॅकने मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या अधिक आहे. ही बाब अत्यंत चिंतनीय आहे. यामागे वरिष्ठांचा जाच, किरकोळ कारणांसाठी निलंबित होण्याची, नोकरी जाण्याची भीती ही कारणे मोठय़ा प्रमाणात सांगितली जात आहेत. पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक हा तर हमाल, वेठबिगार समजला जातो अशा पिचलेल्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांच्या व्यथांचा एक Text Message व्हॉटस्ऍपवर फिरत आहे. त्याचा तपशील जसाच्या तसा खाली देत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक असलेल्या एका महिलेने हा मेसेज व्हायरल केला आहे.

शोकांतिका वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची

उपनिरीक्षक पदावर नेमणूक झालेले सर्वच पोलीस अधिकारी हाच विचार करत असतात की एक दिवस ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर काम करतील. अशा या जबाबदारीच्या पदावर नेमणूक झाल्यानंतर मात्र ते दिवस-रात्र कामात व्यस्त होतात. त्यांचा दिवस सुरू होतो कधी आणि रात्र संपते कधी तेही त्यांना समजत नाही. रोजच बंदोबस्त, नाकाबंदी, कोम्बिंग, ऑल आऊट ऑपरेशन, वरिष्ठांची भेट, कोर्टकचेऱयांमुळे घरी पोहोचण्यास रात्री रोजच उशीर होतो. नेहमीचे सणवार, उत्सव, मिरवणुका, सभा तर कधी निदर्शने हे सर्व शांततेने पार पाडले जावे यासाठी वरिष्ठांच्या सूचना, कायदा व सुव्यवस्था मीटिंग, व्हिजिटस्, महत्त्वाचे फोन व सर्व प्रकारचे बंदोबस्त हे न संपणारे सत्र रोज चालूच राहते. या साऱयांचा काय परिणाम त्या वरिष्ठ अधिकाऱयांच्या कुटुंबावर होतो याबाबत मात्र कधीही कोणी बोलताना दिसत नाही. मुलांना आई-वडील हवे असतात तर पती-पत्नीला एकमेकांच्या सहवासाची गरज असते, त्यांना एकमेकांच्या कामाचे कौतुक करायचे असते. आपला पती किंवा पत्नी खूप मेहनत घेते हे त्यांना माहीत असते तरीही वेळ मिळत नाही ते व्यक्त करायला.

मेसेज व्हायरल करणारी महिला अधिकारी पुढे म्हणते, कधी कधी एखादी व्यक्ती आजारी असते, पण तेही सांगता येत नाही किंवा औषधोपचार करायलाही वेळ मिळत नाही. कारण वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला साप्ताहिक सुट्टी किंवा हवी तेव्हा रजाही मिळत नाही. घरी कितीही गंभीर परिस्थिती असली तरी कामावर हजर राहावेच लागते. जर त्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे राहण्याचे ठिकाण लांब असेल तर त्याची काय अवस्था होत असेल याचे उदाहरण आहे विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अलका मांडवे यांचे! गेली पाच वर्षे त्या सानपाडा ते विलेपार्ले असाच प्रवास करून काम करत होत्या. रोज घरी त्या मध्यरात्री 12.00 ते 2.00 वाजता तर कधी कधी  पहाटे 4.30 वाजता जात होत्या आणि सकाळी 9.00 वाजता परत पोलीस ठाण्यात हजर होत होत्या. त्यांना साप्ताहिक सुट्टीही गेल्या कित्येक दिवसांत मिळाली नाही. गेले चार महिने सतत निरनिराळय़ा बंदोबस्तांमुळे घराकडे, मुलांकडे, संसाराकडे आणि पतीकडे त्यांना जराही लक्ष देता आले नाही. परिणामी नुकतेच त्यांच्या पतीचे अचानक निधन झाले. त्यापूर्वी त्या रजा घेऊन पतीच्या उपचारासाठी वेळ काढणार होत्या, पण मागितलेली रजा मिळाली नाही व त्यामुळे नाइलाजाने नोकरीवर हजर झाल्या आणि पोलीस स्टेशनला काम करत असताना बातमी आली ती त्यांच्या पतीवर काळाने घाला घातल्याची. गेले चार महिने त्यांना त्यांच्या पतीशी धड बोलताही आले नाही की त्यांच्या बिघडलेल्या प्रकृतीची चौकशीही करता आली नाही यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकते. एका वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर काम करताना त्याला वरिष्ठ अधिकारी तोही एक माणूस आहे हे विसरून जातात ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे, असेही ही महिला आपल्या मेसेजमध्ये नमूद करते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक असल्याचे आपल्या Text Message मध्ये नमूद करणाऱ्या या महिलेने वरिष्ठ अधिकारी आपली कातडी वाचविण्यासाठी वरिष्ठ निरीक्षकांना वाटेल तसा त्रास देतात. 24 तास राबणाऱ्या वरिष्ठ निरीक्षकांची मानसिकता जाणून न घेता कायम त्यांना धारेवर धरत असतात. त्यामुळेच मोठय़ा प्रमाणात पोलीस हृदयविकाराचे बळी ठरत आहेत, असाही आरोप केला आहे. तेव्हा आता वरिष्ठ अधिकाऱयांनीही आपल्या हाताखालील वरिष्ठ निरीक्षक, निरीक्षक, उपनिरीक्षक, शिपाई आदी कर्मचाऱयांशी सौजन्याने बोलले पाहिजे, त्यांच्याशी चांगले वागले पाहिजे. आपल्या हाताखाली अधिकारी ही जनावरे नव्हेत. त्यांनाही भावना आहेत हे वरिष्ठांनी लक्षात घेतले पाहिजे. पनिशमेंट नेचरच्या ‘डीसीपीं’नी याची विशेष नोंद घ्यावी. सध्या पोलीस दलात जो काही आक्रोश सुरू आहे त्या अशाच अधिकाऱयांच्या जाचामुळे!