।।जय शारदे वागेश्वरी।।

924

>> आसावरी जोशी

पुस्तकांचं खुप सुंदर जग… संवेदनशील प्रत्येकास मोहवणारं… हे छानसं जग मार्चमध्ये फ्रान्समधील पॅरीस येथे भव्य ग्रंथ जत्रेच्या स्वरुपात अवतरणार आहे आणि या ग्रंथोत्सवात विशेष अतिथी म्हणून हिंदूस्थानाला मानाचे निमंत्रण आहे. ग्रंथ हा आपला आणि आपल्या देशाचा आत्मा. आपल्या बहुभाषिक सारस्वताचे केलेले सिंहावलोकन…

साहित्य… किती सर्वव्यापी… आणि सर्वसमावेशक शब्द. संपूर्ण सारस्वताचा विश्वव्यापी आवाका सहज कवेत घेणारा हा शब्द… साहित्य.. सारस्वत!!! हे तीन अक्षरी किंवा चार अक्षरी शब्द.. सरस्वती आईची उपासना त्यांच्या माध्यमातून होते, केली जाते. विलक्षण सामर्थ्य या तीन-चार अक्षरांत सामावले आहे. अभिव्यक्तीचे अत्यंत सक्षम माध्यम. कोणतीही अभिव्यक्ती प्रथम शब्दातून प्रकटते आणि शब्द लेखणीमार्फत कागदावर उतरण्यास आतुरतात. कोणत्याही कायिक, वाचिक, आंगिक, अगदी सांगीतिक अभिव्यक्ती प्रगटते साहित्याचा हात धरूनच.या साहित्याची ताकद विलक्षण असते. साहित्य केवळ अभिव्यक्त होत नाही तर भाषेची सौंदर्यस्थळे. लयता, गेयता, नादमयता सारे सारे वाचकांपर्यंत, अभ्यासकांपर्यंत पोहोचवते. भाषेच्या माध्यमातून साहित्य आणि साहित्याच्या माध्यमातून भाषेचा रसास्वाद घेता येतो. या सारस्वताची जाणकार चोखंदळ वाचकांस नेहमीच भुरळ पडत राहते आणि मग भाषेच्या मर्यादेचा टप्पा कधी ओलांडला जातो हेच कळत नाही. केवळ अभिजात दर्जेदार साहित्याच्या ओढीने विविध भाषिक वाचक एका छताखाली जमतात आणि या रसास्वादाची देवाणघेवाण सुरू होते.

फ्रान्समधील पॅरिस शहरात मार्चमध्ये जागतिक स्तरावर पुस्तक जत्रा भरणार आहे आणि ग्रंथ महोत्सवात यंदा हिंदुस्थानला सन्माननीय अतिथी म्हणून आग्रहाचे निमंत्रण आहे. यापूर्वी 2002 व 2007 मध्ये हिंदुस्थान या महाजत्रेसाठी सन्माननीय अतिथी म्हणून आमंत्रित होता. यंदाही या पुस्तक जत्रेत विविध हिंदुस्थानातील भाषांतील 30 लेखकांचा सहभाग असेल. त्याचबरोबर 15 हिंदुस्थानी प्रकाशकही या महोत्सवात सहभागी होणार आहेत. उद्याचा हिंदुस्थान, हिंदुस्थानी इतिहासाचे लेखन व पुनर्लेखन अशा संकल्पनांचाही मागोवा घेतला जाणार आहे. ‘फ्रेंच इन्स्टिटय़ूट इन इंडिया’ या संस्थेचे संचालक बर्ट्रंन्ड डी हार्टिंग यांनी नमूद केले की, पॅरिस पुस्तक जत्रा हे केवळ पुस्तकांचे प्रदर्शन नव्हे तर युरोपातील साहित्यविषयक तसेच प्रकाशनविषयक महत्त्वाचे संमेलन आहे. पुस्तके हा फुलोरासाठी खास अंतरीचा जिव्हाळा, मग हा विषय ओलांडून फुलोरा पुढे जाणे शक्यच नव्हते.

मुळात सच्चा सरस्वतीच्या उपासकासाठी भाषेचे देशाचे अडसर कधी आड येत नाही. जमल्यास मातृभाषेव्यतिरिक्त इतर भाषा आत्मसात करून किंवा मग अनुवादित साहित्याचा आस्वाद घेत ही भूक भागवली जाते. पॅरिसच्या जागतिक ग्रंथोत्सवात सामील होण्याआधी थोडेसे सिंहावलोकन आपल्या हिंदुस्थानी साहित्याचे करण्याचे ठरविले. हिंदुस्थानी साहित्यशास्त्र्ाात यश, अर्थप्राप्ती, व्यवहार ज्ञान, अशुभ निवारण, उपदेश, उच्च आनंद ही साहित्य निर्मितीची प्रयोजने सांगितली आहेत. साहित्य निर्मितीतून यश, कीर्ती मिळते. व्यवहारज्ञान अर्थात लेखकाला आणि वाचकाला नव्या जाणिवा, अनुभव प्राप्त होताना समाज जीवनात गती मिळते. जिज्ञासापूर्ती आणि उद्बोधन होते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लेखकाला आत्मानंदाची अनुभूती होते.

जगात अतिप्राचीन साहित्य आदिवासी भाषांमध्ये सापडते. म्हणजे आदिवासी साहित्य हे संपूर्ण सारस्वताचा मूलस्रोत आहे असे मानायला हरकत नाही. आपल्याकडे 22 हून अधिक मान्यताप्राप्त भाषा आहेत. यामध्ये संथाली आणि बोडो या दोन आदिवासी भाषांचा समावेश आहे. आदिवासी साहित्यात काही गोष्टी या मूलतत्त्वाप्रमाणे पाळल्या जातात. यामध्ये लय, ताल आणि संगीत याला महत्त्व दिले जाते. निसर्ग म्हणजेच हिरवा देव, धरित्री, आकाश आणि अन्य प्राणिमात्र यांचा समावेश अपरिहार्य असतो. या आदीतत्त्वातूनच आपल्या आपल्या बोलीभाषा, नागरी भाषा फुलल्या, विकसित झाल्या. दक्षिणेतील तमीळ आणि उत्तरेतील उर्दू वगळले तर जवळपास सर्व हिंदुस्थानी भाषांचा जन्मकाळ थोडय़ाफार फरकाने समान आहे. मराठी आणि गुजराती या भाषांपुरते पाहायचे झाले तर गुजरातीचा आदिग्रंथ 1185 मध्ये रचला गेला आहे तर आपल्या मराठी साहित्याचा जन्म बाराव्या शतकात सापडतो. म्हैसूरमधील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या प्रतिमेखाली लिहिली गेलेली ओळ…

‘श्री चामुंडराजे करवीयले गंगराजे सुताले करवीलय’

या मराठी भाषेतील आद्य ओळी आहेत. पुढे संस्कृत, फारसी, अरबी भाषांच्या प्रभावाखाली येत मराठीने बाराव्या शतकापासून आपले स्वतंत्र अस्तित्व ‘ज्ञानियाचा’ हात धरून दाखविण्यास सुरुवात केली. मुकुंदराजांना जरी मराठीतील आद्य कवी मानले जात असले तरी ज्ञानदेवांच्या भावार्थ दीपिकेने सर्वसामान्य जनमानसात मराठीस मानाचे स्थान मिळवून दिले. ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ ही सुंदर अवस्था अध्यात्मिकता ओलांडून साहित्य क्षेत्रातही सापडते. नामदेव, चोखोबा, एकनाथ यांच्या ओव्यांनी, भारूडांनी मराठी साहित्य समृद्ध केले. पुढे शिवकालात तंतकवींनी वीरश्रीयुक्त कवने रचून मराठी भाषेला ओजस्वी बनवले. पंत कवींनी तिच्या विद्वत्तेत भर घातली. बखरींनी इतिहासाचा शोध घेण्यास शिकवले. पुढे विष्णुशास्त्र्ााr चिपळूणकर, बाबा पदमनजींचे यमुना पर्यटन, केशवसुतांच्या तुतारीने मराठी भाषेत नवचैतन्य आणले आणि मग कवी कुसुमाग्रज, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे यांच्या हस्ते-परहस्ते मराठी भाषेचा समृद्ध प्रवास संपन्नतेच्या मार्गावरच सुरू आहे.

देववाणी संस्कृतचे स्थान आजही विश्व साहित्यात सर्वोच्च मानले जाते. ऋग्वेद संहिता हा संस्कृतमधील आद्य ग्रंथ आहे. मराठी, तामीळ, तेलगू, कन्नड, हिंदी, वंग या बहुतेक हिंदुस्थानी भाषांवर संस्कृतचा प्रभाव आजतागायत आहे.

आठवे शतक हे हिंदी साहित्याचा आरंभबिंदू मानले जाते. तुलसीदास कबीराच्या भक्तिरसासोबत मुन्शी प्रेमचंद, अमृता प्रीतम यांच्या पाऊलखुणा हिंदी साहित्यावर अमीट उमटलेल्या.

कन्नड भाषा 950 च्या शतकात सापडते. या भाषेत एका इंग्रजी कवितेचा अनुवाद ही या भाषेची आद्य कविता आहे. बी. एम. श्रीकंठय्या यांच्या इंग्रजी कवितांचा कन्नड अनुवाद कन्नड भाषेचे सौंदर्य स्थळ उलगडतो. कन्नड साहित्यात छोटय़ा छोटय़ा गोष्टी, कथा अत्यंत लोकप्रिय आहेत. विरुपाक्ष कुलकर्णी, एस. एल. भैरप्पा यांचे समृद्ध कानडी साहित्य अनुवादित स्वरूपात आपण आवडीने वाचतो.

तामीळ, तेलगू, वंग साहित्यावर संस्कृत भाषेचा आत्यंतिक प्रभाव आहे. तेलगू साहित्याची निर्मिती 11 व्या शतकात झाली. तेलगू भाषेत वृत्तपत्रीय साहित्याचा सहभाग विशेषत्वाने आढळतो.

रवींद्रनाथांची, शरद्चंद्राची वंगभाषा म्हणजे जणू मिष्टी अर्थात मिठाईचा गोडवा. बहुरंगी, बहुढंगी भाषा हिंदुस्थानची संपन्न संस्कृती दाखवतात आणि प्रत्येक भाषेतील साहित्य वाचकाची ज्ञानलालसा भागवते. जाणिवांच्या वाटा अजूनच तल्लख करते. मुळात येथे सरस्वती मातेच्या उपासनेला भाषेचा बांध अडवूच शकत नाही. आकळणाऱया मातृभाषेतून हे सारस्वत अनुवादित होते आणि रसिक त्या वाचनानंदाचा आकंठ आस्वाद घेतात.

शब्दांची, जागेची मर्यादा ओळखून हा रसास्वाद केवळ आपल्या देशापुरताच ठेवला, पण पॅरिसच्या पुस्तकांच्या महाजत्रेत आपल्या या असंख्य भाषा हातात हात घालून उभ्या राहतील आणि जगाच्या नकाशावर हिंदुस्थानी सारस्वताचा ज्ञानदीप अखंड तेवत राहील.

आपली प्रतिक्रिया द्या