झाडांचा डॉक्टर!

>> आसावरी जोशी

हिंदुस्थानात प्रथमच वृक्षांसाठी रुग्णवाहिका ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे. चेन्नई येथे डॉ. अब्दुल घनी यांनी सुरू केलेली ही वृक्षसेवा महाराष्ट्रात दोन महिन्यांत येण्यासाठी सज्ज होते आहे.

आजची तरुणाई अनेक अर्थांनी सतर्क आणि जागरूक झाली आहे.. आपल्या भवताली नेहमीच चांगल्या आणि वाईटाची सरमिसळ असते.. काही हात विधायकतेसाठी सतत कार्यरत असतात, तर काही हातांना केवळ विध्वंसच करता येतो. समाजमाध्यमातून ही परस्पर विरोधी चित्रे तर नेहमीच अत्यंत ठसठशीतपणे समोर येत राहतात. आपल्या देशात अशा दोन्ही चित्रांच्या घटना वारंवार घडतच असतात. अवनी वाघिणीची हत्या, आरेच्या जंगलातील वणवा, तेथे होणारी वृक्षतोड आणि बरेच काही. या साऱया विध्वंसक हातांच्या विरोधात एकवटली ती आजची जागरूक आणि सतर्क तरुणाई. या न त्या मार्गाने ती आपली मतमतांतरे, क्षोभ, संताप व्यक्त करत राहिली. कोणी मेणबत्ती मोर्चे काढले, कोणी कायदेशीर लढा पुकारला. प्रभावी समाजमाध्यमांचा वापर करीत प्रत्येक तरुण स्पंदन उचंबळत राहिले.

तरुणाईचे हात नेहमीच शिवशिवतात काही न काही करण्यासाठी.. अभिव्यक्त होण्यासाठी. काही चाचपडतात, तर काहीना खूप लवकर दिशा मिळते. मार्गदर्शन मिळते. योग्य व्यक्तीचे. डॉ. अब्दुल घनी. असाच एक तरुण… सामान्य नोकरदार. पण एपीजे अब्दुल कलामांचा परीस स्पर्श झाला आणि विचारधारा बदलली. पायाखालची वाट स्वच्छ विचारांनी उजळून निघाली. आपल्या भवतालच्या पर्यावरणाचे, निसर्गाचे आपण काहीतरी देणे लागतो या विचाराने मन अस्वस्थ झाले आणि त्याच्या हातून असंख्य कोवळी रोपे कसदार मातीत डौलात उभी राहू लागली. जवळपास 40,00000 झाडे या तरुणाने डॉ. कलामांपासून प्रेरणा घेत लावली. हे त्याचे पहिले पाऊल होते.

आता त्याचा पुढचा उपक्रम म्हणजे झाडांवर प्रथमोपचार करण्यासाठी सज्ज झालेली आपल्या देशातील पहिली झाडांसाठीच असलेली रुग्णवाहिका. चेन्नईत ही रुग्णवाहिका सुरू झाली आहे. आल्यागेल्या पांथस्थांना थंडगार सावली देणारी डेरेदार झाडे बऱयाचदा अमानुषपणे छाटली जातात. नव्या इमारतीच्या बांधणीचे निमित्त करून मुळापासून तोडली जातात. या आणि अशा बऱयाच विघातक कारणांचे निमित्त पुढे करून बेसुमार वृक्षतोड होते. झाडांचे, पर्यायाने पर्यावरणाचे नुकसान होते. अर्थात हे माणसाच्या गावीही नसते. पण यातूनच डॉ. घनींनी रुग्णवाहिकेची संकल्पना प्रत्यक्षात आणली. या रुग्णवाहिकेचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे तोडलेल्या मोठय़ा वृक्षांना त्वरित नव्या जागी नव्याने प्रस्थापित करणे. यासाठी खास पर्यावरणतज्ञांची यंत्रणा सज्ज झाली आहे. झाड तोडण्याऐवजी घनांना कळवले की, त्यांची माणसे येऊन वृक्षाची आणि प्रस्तावित जागेची पाहणी करून जातात आणि अतिशय काळजीपूर्वक त्या मोठय़ा वृक्षाचे नवीन जागेत पुनर्रोपण केले जाते.

याखेरीज वृक्षांच्या अनेक लहानमोठय़ा समस्यांवर ही रुग्णवाहिका चांगला पर्याय ठरू शकेल. शिवाय या पर्यावरण तज्ञांकडून सामान्य माणसांना पर्यावरणासंबंधी प्रबोधनात्मक माहिती दिली जाते. वृक्षांच्या बिया विनामूल्य पुरविल्या जातात. महापालिकेच्या सतत संपर्कात राहून पावसापूर्वी वृक्षांच्या फांद्या कमी करणे, त्यांच्याभोवती कुंपण घालणे, तोडलेल्या फांद्यांची उपयुक्त वासलात लावणे इ. अनेक कामे केली जातात. आता सध्या केवळ चेन्नईत सुरू झालेली ही रुग्णवाहिका पुढील दोन महिन्यांत मुंबई नक्कीच गाठेल. आणि मला वाटते तिची मुंबई-पुण्यासारख्या महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात खरोखरच गरज आहे.

आज केवळ आपल्या शहरांपुरतेच पाहायचे झाले तर रस्त्याच्या कडेने खूप हौसेने वृक्षारोपण केले जाते. विविध झाडे लावली जातात. पण पुढे काय… जमिनीत लावल्यानंतर या झाडांचा प्रवास अक्षरशः एकटय़ानेच सुरू होतो. कधीतरी पाणी देण्यापुरती आणि तक्रार होऊन वरून आदेश आल्यानंतर वृक्षतोड करण्यापुरता महापालिकेचा आणि या झाडांचा काय तो संबंध. बाकी या झाडांचा सर्व स्तरांतील माणसे स्वतःच्या सोयीने हवा तसा वापर करतात. मजा म्हणून फळे, पाने तोडणे, वेळ जात नाही म्हणून दगड मारणे, घरात न मावणारी विद्युत रोषणाई झाडांवर लावणे इ. इ. थोडासा स्वतःशी विचार केला तर आपण सामान्य माणसेच आपल्या भवतालच्या पर्यावरणाचे सहज रक्षण करू शकतो. कारण आपण दुर्लक्ष केले तरी झाडे मात्र आपली साथ कधीच सोडत नाहीत.

– थंडी, वारा, ऊन पाऊस सहन करीत आपल्यावर अखंड सावली धरतात. प्रत्येक माणसाला दिवसागणिक दोन झाडांचा तीन किलो ऑक्सिजन रोज लागतो.
– सावलीसोबत टिकाऊ लाकूड, औषधेही ही झाडेच आपल्याला पुरवितात. आपल्या मुळांद्वारे जमिनीत पाणी शोषून घेऊन वातावरणात थंडावा आणतात.
– पावसासाठी पोषक वातावरण तयार करतात.
– त्यांच्या हिरवाईने मन प्रसन्न होते, पक्षांच्या घरांना पोषक, सुरक्षित निवारा मिळतो.

आज जर आपण निवासी संकुलांच्या जाहिराती पहिल्या तर प्रत्येक बांधकाम व्यावसायिक आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असतो.

पक्ष्यांचा किलबिलाट, विपुल हिरवाई, थंड. स्वच्छ हवा.. इ. मनास भुरळ पाडणारी प्रलोभने या जाहिरातीत असतात. म्हणजे माणसाची निसर्गाची आंतरिक ओढ जराही कमी झालेली नाही. त्यासाठी आपणच प्रयत्न केले तर बऱयाच गोष्टी साध्य होतील.
प्रत्येकाने विचार करून पाहूया… डॉ. घनींची रुग्णवाहिका महाराष्ट्रात येण्यास सज्ज होते आहेच, पण आपल्या या हिरव्या दोस्तांची आपणच काळजी घेतली तर अशा रुग्णवाहिकेची गरजच उरणार नाही.

एवढे आपण करू शकतो…
– आपल्या भवतालच्या हिरवाईची काळजी आपल्याला घेता येणे बऱयापैकी शक्य असते.
– फक्त जरा मन, डोळे आणि कान सतर्क असणे गरजेचे आहे.
– विनाकारण होणारी वृक्षतोड सुजाण आणि जागरूक नागरिक कायद्याने थांबवू शकतो.
– खिशास फार तोशीस न पडता भवतालच्या वृक्षांना पाणी सहज घालू शकतो.
– त्या झाडांवर होणारी विद्युत रोषणाई जागरूक राहून थांबवू शकतो.
– विशेष प्रसंगी एखादे झाड अगदी सहज लावू शकतो.
– झाडावरील पक्ष्यांना दिलेले थोडेसे दाणापाणी त्यांना सहज आपलेसे करून जाते.

ajasavari@gmail.com