
>> अनिल कुचे
कुपोषणग्रस्त मेळघाट म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या मेळघाटात आता विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा येथील स्कायवॉक प्रकल्पाला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. जगाच्या पातळीवर तिसऱ्या क्रमांकाचा स्कायवॉक चिखलदरा येथे व्हावा यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे वारंवार विनंती केली. त्यानुसार केंद्र शासनाने प्रकल्पाला मंजुरी द्या. राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री यशोमती ठाकूर व राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळे जगाच्या पातळीवरील हा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे.
स्कायवॉकच्या निमित्ताने मेळघाटातील विकासाचा मार्ग मोकळा झाला असून त्याचे अनेक फायदे मेळघाटातील जनतेला होणार आहेत. यासोबतच आदिवासी भागातील युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. गोरगरीब कुटुंबांना रोजगार प्राप्त होण्याशिवाय स्थानिक कुटुंबीयांचे कामानिमित्त अन्यत्र होणारे स्थरांतरदेखील रोखले जाणार आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने स्कायवॉक प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
चिखलदरा तालुक्यात असलेल्या टायगर ब्लॉक प्रोजेक्टअंतर्गत बफर झोनमधील महाराष्ट्राच्या सिडको विभागाद्वारे ग्लास स्कायवॉकचे काम सुरू झाले आहे. केंद्र शासनाने या प्रकल्पाला परवानगी दिल्यामुळे सर्व अडथळे दूर झाले असून प्रकल्पाच्या कामाला गतीसुध्दा आली आहे. स्कायवॉकसाठी केंद्र व राज्य शासनासोबतच संबंधित विभागानेसुध्दा वारंवार पत्रव्यवहार करून स्कायवॉकला परवानगी मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे प्रयत्न केले आहेत. उल्लेखनीय म्हणजे तत्कालीन शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी या प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला होता. यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन प्रकल्प कशा पद्धतीने पूर्ण होईल यासाठी पाठपुरावा केला.
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे होणाऱ्या या प्रकल्पामुळे पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. यासोबतच स्कायवॉक पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार असून पर्यटनाची गर्दीसुद्धा वाढणार आहे. जिल्ह्यातील पर्यटन विकास कामातील प्रलंबित बाबी, पर्यावरणविषयक परवानगी आदी प्रक्रिया, विविध पर्यटनस्थळांचा विकास, आवश्यक निधी याबाबत पर्यटनमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात महत्त्वाचे पर्यटन सुविधा याद्वारे निर्माण होणाऱ्या जिल्ह्याच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी पर्यावरणविषयक बाबींसंदर्भातही राज्य शासन स्तरावर चर्चा करण्यात आली आहे.
उल्लेखनीय म्हणजे, अमरावती शहरातील शिवटेकडी, वडाळी तलाव यांचा विकास व सुशोभीकरण होणार आहे. यासोबतच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पर्यटन उद्यान तसेच जिल्ह्यातील केकतपूर, शेवती व संगमेश्वर आदी पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी मिळवून देण्यात आला आहे. पर्यटनमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळण्यास मदत होईल.
1993 च्या सुमारास मेळघाटातील कुपोषणाची समस्या जगासमोर आली होती. त्या काळात मेळघाटात शेकडो बालक कुपोषणामुळे दगावत होते. 1995 मध्येसुद्धा हीच परिस्थिती कायम होती. याची दखल जगभरातील प्रसारमाध्यमांनी घेतली तसे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. तेव्हापासून कुपोषणग्रस्त मेळघाट म्हणून जगभरात प्रसिद्ध झाले. मात्र आता पर्यटन विकासामुळे मेळघाटवरील हा ‘डाग’ पुसला जाणार असून मेळघाटला पर्यटनस्थळ म्हणून नवी ओळख मिळेल हेसुद्धा तेवढेच खरे आहे.






























































