
>> अतुल कहाते
सर्वसामान्य लोकांनाही कष्ट घेऊन, एखाद्या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करून या माध्यमांवर आपला ठसा उमटवणं शक्य आहे. अर्थातच एका रात्रीत हे घडू शकत नाही. स्वतःमध्ये खरोखरची कौशल्यं असणं, त्या कौशल्यांमध्ये इतरांना रस वाटेल अशा प्रकारे त्यांची जोपासना करणं आणि त्यांचं उत्कृष्ट प्रकारे सादरीकरण करणं हे त्यासाठी गरजेचं आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा असते तशी ती इथेही आहेच. त्यामुळे हे सहजपणे अजिबातच घडणार नाही; पण ते अशक्यही नाही. याचं एक प्रोत्साहित करू शकणारं उदाहरण म्हणून सांगायचं तर क्रिकेटच्या मैदानावर गेली अनेक वर्षं अविश्वसनीय कामगिरी करून दाखवणाऱया विराट कोहलीनं इन्स्टाग्रामवर एखाद्या प्रायोजित मजकुराला उचलून धरलं तर त्याला त्यापोटी दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळते – एका मजकुरासाठी! यातून या नवमाध्यमांच्या लोकप्रियतेची आणि ताकदीची आपल्याला कदाचित थोडीफार कल्पना येऊ शकेल. एका ट्विटसाठी त्याला अडीच कोटी रुपये मिळतात!
सध्याच्या काळात सोशल मीडियाचा सर्वत्र बोलबाला आहे. आपल्यापैकी कित्येकजण या नवमाध्यमांचा सर्रास वापर करीत असतात. अर्थात त्यातील बहुतेकजण केवळ करमणूक किंवा माहितीची आदानप्रदान याच हेतूने या माध्यमांमध्ये सक्रिय असतात. वास्तविक बदलत्या काळात ही नवमाध्यमे केवळ ‘टाइमपास’ राहिलेली नाहीत. या माध्यमांचा वापर ‘कमाई’साठीसुद्धा होत असतो. किंबहुना नवमाध्यमांमधून कमाईच्या संधी वेगाने वाढत आहेत. फक्त या संधी कशा साधता येतील हे समजायला हवे.
आपल्यापैकी बरेच जण फेसबुक, इन्स्टाग्राम, यू-टय़ूब अशांसारख्या माध्यमांचा वापर बहुतेक वेळा करमणुकीसाठी किंवा एकमेकांशी संपर्कात राहण्यासाठी करतात. यू-टय़ूबवर आता अनेक शैक्षणिक प्रकारचे कार्यक्रम सादर होत असल्यामुळे तसंच दूरचित्रवाणीच्या वाहिन्यासुद्धा आपले अनेक कार्यक्रम या सगळ्याच माध्यमांवर थेट प्रसारित करत असल्यामुळे आता त्यांचं स्वरूप नुसतं ‘टाईमपास’ प्रकारचं राहिलेलं नाही. हे झालं या माध्यमांचा वापर तिथे असलेल्या गोष्टी बघण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी असलेल्या लोकांचे. याखेरीज या माध्यमांवर निरनिराळ्या गोष्टी सादर करत असलेल्या लोकांचे काय? मुळात हा प्रश्नच आपल्यापैकी बऱयाच जणांना कळणार नाही. कारण आपण समजा फेसबुकवर काही लिहिलं किंवा यू-टय़ूबवर एखादा पदार्थ बनवल्याची चित्रफीत टाकली; तर त्यात आपल्याला त्यातून काय मिळणार हा प्रश्नच निरर्थक नाही का? फार तर आपल्या परिचयातले किंवा त्या विषयात रस असलेले काही लोक तो बघणार आणि कदाचित आपलं कौतुक करणार (किंवा आपल्याला नावं ठेवणार!). प्रत्यक्षात मात्र या माध्यमांवर कोणत्याही प्रकारची नवनिर्मिती करणाऱयांना या माध्यमांकडून कमाई करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते हे खूपच कमी जणांना माहीत असेल. म्हणूनच या प्रकाराचा उलगडा करण्याचा आपण प्रयत्न करू.
यू-टय़ूबवर व्हिडिओ प्रसारित करून कमाई करण्याची संधी साधणाऱया लोकांना सर्वसामान्यपणे ‘यू-टय़ूबर’ असं म्हणतात; तर स्वतः यू-टय़ूब अशा लोकांना ‘यू-टय़ूब पार्टनर’ म्हणतं. म्हणजेच आपल्या व्यवसायातले हे जणू भागीदारच आहेत असं यू-टय़ूबचं म्हणणं आहे. अशा भागीदारांना यू-टय़ूबकडून जाहिराती, यू-टय़ूबचं पैसे भरून सदस्यत्व घेणारे लोक, अतिलोकप्रिय लोकांच्या बाबतीत निरनिराळ्या खास उत्पादनांच्या विशेष जाहिराती अशा अनेक माध्यमांद्वारे पैसे मिळू शकतात. मग सगळ्यांनाच सरसकट ही कमाई का करता येत नाही? उदाहरणार्थ समजा मी एखाद्या पाककृतीची चित्रफीत यू-टय़ूबवर टाकली तर मला यू-टय़ूबकडून पैसे का मिळत नाहीत? याचं कारण म्हणजे यामधल्या कमाईच्या प्रत्येक संधीसाठी यू-टय़ूबच्या काही अटी असतात. त्यातच स्थानिक कायद्यांनुसार या अटी बदलूही शकतात. उदाहरणार्थ आपल्या चित्रफितीत समजा आपल्याला जाहिराती दाखवून त्याद्वारे कमाई करायची असेल तर आपलं वय किमान 18 वर्षांचं असावं लागतं. तसंच आपण कुठलीही जाहिरात यू-टय़ूबमधल्या व्हिडिओमध्ये दाखवण्याआधी त्यासंबंधीचे यू-टय़ूबचे निकष पाळावे लागतात. त्यात हिंसाचार, न दाखवण्याजोगी दृश्यं, फक्त प्रौढांसाठी असलेली दृश्यं, धक्कादायक दृश्यं, समाजात तेढ निर्माण करणारी दृश्यं, असंवेदनशील प्रकारची दृश्यं असं काही असून चालत नाही. यामधलं काहीही एखाद्या मूळ चित्रफितीत किंवा त्यामधल्या जाहिरातीमध्ये असेल तर अशी चित्रफीत यू-टय़ूब काढून टाकतं. तसंच कुणी अशा चित्रफितीविषयी तक्रार केली तरी यू-टय़ूब त्याची दखल घेऊन अशी चित्रफीत काढून टाकू शकतं.
यू-टय़ूबवर आपण जणू आपली स्वतःची वाहिनीच चालवू शकतो. त्याला ‘यू-टय़ूब चॅनेल’ असं म्हणतात. अशा वाहिनीचे लोक नियमित सभासद होऊ शकतात. अर्थातच ज्या लोकांना संबंधित विषयात रस असेल असेच लोक त्यात सहभागी होतात. समजा आपण अशी एखादी वाहिनी यू-टय़ूबवर चालवली आणि तिला 1000पेक्षा जास्त सभासद लाभले तर आपल्याला यू-टय़ूबकडून पैसे मिळू शकतात. ही रक्कम किती असते याचा अंदाज यावा म्हणून सांगायचं तर 10 लाख सभासद असलेली एखादी वाहिनी चालवत असलेल्या माणसाला वर्षाकाठी तब्बल 44 लाख रुपयांची कमाई होऊ शकते! म्हणजेच हा नुसता ‘टाईमपास’चा प्रकार नाही! म्हणूनच अनेक कलाकार, तंत्रज्ञ, निरनिराळ्या विषयांमधले तज्ञ, भाष्यकार आपापल्या यू-टय़ूब वाहिन्या चालवण्यासाठी उत्सुक असतात. कोरोनाच्या संकटामुळे चित्रपट, नाटकं, सांस्कृतिक कार्यक्रम यांच्यावर गदा आलेली असल्यामुळे या कलाकार मंडळींना अशा प्रकारे उत्पन्नाचं नवं साधन निर्माण करणं शक्य झालं आहे. अर्थातच यासाठी संबंधित माणूस आपल्या कलेमुळे, कौशल्यामुळे किंवा लोकप्रियतेमुळे खूप सभासद जमवू शकला तरच हे घडू शकतं. साहजिकच ‘माझ्या वाहिनीचे सदस्य बना’ अशी गोड गळ अनेकांकडून घातली जाते.
सर्वसाधारणपणे आपल्या वाहिनीला 1,000 सदस्य लाभले तर त्याचं आर्थिक वार्षिक मूल्य यू-टय़ूबच्या म्हणजेच गुगलच्या दृष्टीनं साधारण 1,300 रुपये इतकं असतं. त्यामधला 45 टक्के वाटा यू-टय़ूब आपल्याकडे ठेवतं आणि उरलेली रक्कम आपल्याला मिळते. अर्थातच यू-टय़ूबरला हे उत्पन्न आपल्या स्थानिक करप्रणालीनुसार आपल्या आयकराच्या हिशेबात दाखवावं लागतं आणि त्यावर कर भरावा लागतो. जाहिरातींमधलं उत्पन्न जाहिरातदारांकडून आपल्या खात्यात यावं यासाठी आपल्याला ‘ऍडसेन्स’ नावाच्या सुविधेचा वापर करावा लागतो. दर 1,000 लोकांनी जाहिरात बघितल्यावर यू-टय़ूबरला 1,300 रुपये मिळतात. आता त्यातही खाचाखोची असतात. आपल्याला जाहिरातदारांकडून पैसे मिळण्यासाठी जाहिरात बघणाऱया माणसानं ती किमान 30 सेकंद तरी बघणं भाग असतं.
या सगळ्यातून पारंपरिक माध्यमांमधून कमाई करण्याच्या संधी कमी होत असल्या तरी या नव्या माध्यमांमधून कमाई करण्यासंबंधीच्या संधी वेगानं वाढत असल्याचं आपल्या लक्षात येईल. असाच प्रकार फेसबुक, इन्स्टाग्राम यांच्यासारख्या नवमाध्यमांच्या बाबतीत घडतो. त्यामुळे त्यांचं वेगळं वर्णन इथे केलेलं नाही.
यासंदर्भातला एक महत्त्वाचा मुद्दा स्वामित्व हक्कांचा म्हणजेच कॉपीराईटचा असतो. आपण स्वतः तयार केलेली चित्रफीत किंवा इतर मजकूरच या माध्यमांवर प्रसारित करणं अपेक्षित असतं. तसं नसेल तर त्या चित्रफितीचे किंवा मजकुराचे स्वामित्व हक्क आपल्याकडे असणं अपेक्षित असतं. दुसऱयाची किंवा दुसऱयाच्या मालकीची चित्रफीत आपल्या नावावर अशा माध्यमांवर टाकणं हा गंभीर गुन्हा असतो. असं करायचंच असेल तर त्यासाठी संबंधित माणसाची किंवा संस्थेची लेखी परवानगी आपल्याकडे असायला हवी. कुणीही आपल्या किंवा इतरांच्या स्वमित्व हक्कांचा भंग झाल्याची तक्रार या माध्यमांवर नोंदवू शकतं. तसंच ही माध्यमंच आपल्याला मुळात आपल्याकडून कुणाचा स्वामित्व हक्कांचा भंग तर होत नाही ना याची खातरजमा करण्यासाठीच्या सोयी उपलब्ध करून देतात. उदाहरणार्थ यू-टय़ूबवर ‘कॉपीराईट मॅचिंग टूल’ आहे. त्यात ज्या चित्रफितीविषयी तक्रार आलेली असेल अशी चित्रफीत आणि उपलब्ध असलेल्या इतर चित्रफिती यांच्यामधलं साम्य शोधून त्याविषयीचे तपशील आपल्याला मिळू शकतात. निव्वळ वेळ घालवण्यासाठी या माध्यमांचा वापर करण्यापेक्षा त्यातून कमाई करण्याचा प्रयत्न करणाऱया युवक-युवतींना यातून प्रेरणा लाभो आणि थोडी दिशा मिळो हीच आशा!
(लेखक माहिती तंत्रज्ञानाचे तज्ञ आहेत)
n [email protected]




























































