सत्याचा शोध – दुखणं सोमेश्वरी उपाय रामेश्वरी! 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> चंद्रसेन टिळेकर

आधुनिक युगातील आपल्या समस्यांची उकल विज्ञानाने कालबाह्य ठरवलेल्या हजारो वर्षांपूर्वीच्या धर्मग्रंथात न शोधता आपल्या विचारशक्तीने केली पाहिजे, पण आपल्या लोकांचे असे असते की, ‘दुखणे सोमेश्वरी आणि उपाय रामेश्वरी!’ आपले प्रश्न आपणच सोडविण्याचा प्रचंड कंटाळा. पुलंच्या भाषेत सांगायचे तर ‘बौद्धिक आळस’ हिंदुस्थानींच्या अंगात मुरलेला असतो. बुवाबाजीचा उगम नेमका इथेच होतो.

अनेक वेळा असा अनुभव येतो की, जे काही समाज प्रबोधन घडवून आणायचे असेल किंवा दुसऱया शब्दांत सांगायचे तर चार शहाणपणाचे बोल कुणा दुसऱया व्यक्तीला सांगायचे असतील तर सांगता येते, पण तीच गोष्ट आपल्या जवळच्या नातेवाईकांना किंवा कुटुंबातल्याच एखाद्याला सांगायची असेल तर मात्र मोठे धर्मसंकट उभे राहते. अंधश्रद्धेच्या संदर्भातही तसेच होते. दुसरा एखादा कोणी त्याला त्याच्या गुरूच्या आलेल्या प्रचीतीबद्दल आपल्याला सांगायला लागला तर आपल्याला कानाडोळा करता येतो, ती गोष्ट हसण्यावारी नेता येते, परंतु आपल्या जवळच्या नातेसंबंधातले जर कोणी अंधश्रद्धेच्या बाजूने बोलायला लागले तर मात्र आपले अवघड जागेचे दुखणे होऊन बसते. जवळच्या मित्रांबरोबर, नातेवाईकांबरोबर जर आपण प्रतिवाद सुरू केला तर ही मंडळी आपल्याला कायमची दुरावण्याची शक्यता असते. कारण त्यांनी सांगितलेली गोष्ट आपण स्वीकारली नाही म्हणजे आपण त्यांच्यावर अविश्वास दाखवला असा त्यांचा समज होतो.

एकदा माझ्या एका बालमित्राने, “आपण ‘शनिमाहात्म्य’ वाचायला लागल्यापासून सहा महिन्यांतच आपल्या साऱया समस्या दूर झाल्या,” असे छातीठोकपणे सांगितले. आता असे काही केवळ वाचल्याने, मग तो कोणताही धर्मग्रंथ असो वा स्तोत्र-मंत्र पठण असो, ते केल्याने आपल्या समस्या दूर होत नाहीत हे त्याला कसे सांगावे? असा प्रश्न मला पडला. कारण त्याचे म्हणणे खोडून काढणे म्हणजे त्याने त्याच्या अज्ञानातून का होईना, जो आनंद मिळवला त्याच्यावर विरजण टाकण्यासारखे होते, परंतु असे असले तरी त्याला अज्ञानाच्या नंदनवनातून बाहेर काढणे आवश्यकच होते. कारण अशास्त्राrय, अतार्किक उपायातून मिळालेले यश म्हणजे कावळा बसायला आणि फांदी मोडायला अशी एकच वेळ झाली असण्याचाच खरे तर अधिक संभव असतो. त्यामुळे पुढील आयुष्यात असल्या गोष्टींच्या, उपायांच्या नादी लागून त्याचे मोठे नुकसान करून घेण्याचा संभव असतो. त्यामुळे थोडासा रोष पत्करून मी त्याला असल्या तात्पुरत्या अन् भ्रामक उपायाने मिळालेल्या यशाच्या गुंगीत राहणे धोक्याचे आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम एवढाच झाला की, नित्याने भेटणारा तो मित्र कधीतरीच भेटू लागला. मुळात ‘शनिमाहात्म्य’ वाचायचे कशाला, तर शनीने आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला काही पीडा करू नये आणि तो तसा आता करीत असेल तर या त्याच्या ‘माहात्म्य’ वाचनाने तो आपली पीडा सौम्य करील. आता शनीसारखा कोटय़वधी योजने दूर असलेला ग्रह, आपल्यापासून त्याचे अंतर मोजायला मीटर-किलोमीटर ही परिमाणे तोकडी पडतात म्हणून अतिवेगवान अशा प्रकाशाच्या वेगाची फूटपट्टी लावावी लागते. इतक्या भयानक अंतरावर असलेले ग्रह-उपग्रह कसलेही बरे-वाईट परिणाम मानवावर करणे केवळ अशक्य, हे सांगायला आपल्याला कुठल्याही शास्त्रज्ञाची गरज पडू नये. अर्थात हे केवळ माझे म्हणणे आहे असे नाही, तर बहिणाबाईच ज्योतिष्याला कसे खडसावतात ते पहा…

नको नको ज्योतिषा, माझ्या दारी नको येऊ।
माझे दैव मला कळे, माझा हात नको पाहू।
म्हणे नशिबाचे ग्रह नऊ।।

आश्चर्य या गोष्टीचे वाटते की, गाडगेबाबांसारख्या बहिणाबाईही अल्पशिक्षितच, पण या दोन महान व्यक्तींच्या ठायी जो विवेक आहे त्याचा मागमूसही उच्चविद्याविभूषित व्यक्तींच्या ठायी नसावा? ‘शनिमाहात्म्या’प्रमाणे ‘गुरुचरित्र’ वाचल्यानेही कुटुंबाचे मोठे कल्याण होते अशी अंधश्रद्धा आपल्या समाजात आहे. परिणामी गावोगावी त्याची पारायणे केल्याचे आपल्याला दिसून येते.

‘गुरुचरित्रा’बद्दल प्रसिद्ध समाजसेवक व लेखक अनिल अवचट आपल्या ‘धार्मिक’ नावाच्या पुस्तकात काय म्हणतात ते वाचण्यासारखे आहे. ते म्हणतात, ‘गुरुचरित्र’ वाचनाचा लोक एवढा बाऊ का करतात ते कळत नाही. पारायणात ब्रह्मचर्य पाळावे, उजवा कान वर करून झोपावे, म्हणजे गुरूंचा उद्देश ऐकता येईल, स्त्रियांनी ‘गुरुचरित्र’ वाचू नये. श्रीपादवल्लभ यांनी साठ वर्षांच्या स्त्राrला संतान दिले, वांझ म्हशीकडून दूध काढून दाखवले, कापलेली जीभ पूर्ववत केली इत्यादी चमत्कारिक कथा खच्चून ‘गुरुचरित्रा’त आहेत. असल्या कथांची पारायणे करून कोणते ज्ञान माणसाला प्राप्त होणार आहे?
या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे आणि ती म्हणजे आपल्या धर्मग्रंथांसह जगातले जवळ जवळ सर्व धार्मिक ग्रंथ आधुनिक विज्ञानाने कालबाह्य ठरवले आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे बहुतांशी धार्मिक ग्रंथ हे हजार ते पाच हजार वर्षांपूर्वी लिहिले गेले आहेत. साहजिकच त्या काळी ज्ञान मिळविण्याची जी काही तुटपुंजी अन् अप्रगत साधने होती, त्यांचा वापर करूनच त्या वेळच्या ऋषीमुनी, तपस्वी म्हणून वंद्य मानतो, त्यांनी काही कल्पना करून निष्कर्ष काढले असणार, पण हे निष्कर्ष आधी म्हटल्याप्रमाणे योग्य त्या साधनाभावी निव्वळ कविकल्पनाच असल्याचे नंतरच्या काळात सिद्ध झाले. अर्थात योग्य साधने, उपकरणे किंवा सुसज्ज अशी प्रयोगशाळा नसतानाही महत्त्वाचे शोध लावणे शक्य आहे हे आपण ‘शून्याचा शोध’ लावून जगाला दाखवून दिले, तेही तेवढेच खरे आहे.

थोडक्यात सांगायचे तर आधुनिक युगातील आपल्या समस्यांची उकल विज्ञानाने कालबाह्य ठरवलेल्या हजारो वर्षांपूर्वीच्या धर्मग्रंथात न शोधता आपल्या विचारशक्तीने केली पाहिजे, पण आपल्या लोकांचे असे असते की, ‘दुखणे सोमेश्वरी आणि उपाय रामेश्वरी!’ आपले प्रश्न आपणच सोडविण्याचा प्रचंड कंटाळा. पुलंच्या भाषेत सांगायचे तर ‘बौद्धिक आळस’ हिंदुस्थानींच्या अंगात मुरलेला असतो. बुवाबाजीचा उगम नेमका इथेच होतो. कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या शब्दांत सांगायचे तर, “प्रत्येकासी येथे हवा, कोणीतरी एक जबरी बुवा, जो काढील साऱया उवा… मनातल्या चिंतांचा! उपाय शोधायचे नाही, लढायचे नाही, आपण भिडायचे नाही आयुष्याला!”
कुणीतरी म्हटल्याप्रमाणे अगदी एका वाक्यात सांगायचे तर ‘आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार’!!
[email protected]
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी
चळवळीशी निगडित आहेत.)