>> धनंजय साठे
वाचनाची गोडी निर्माण करावी लागते. अगदी बालवयातच. रोजचं वर्तमानपत्र वाचण्याची सवय किती काही देऊन जाते. घरचं वातावरण जर पुस्तकवेडं असेल तर जगणं निर्मळ होतं. जो अनुभव मी बालपणापासून घेतला आणि त्यामुळे आयुष्य अधिक आनंददायी झालं.
आम्ही बंगळुरूला स्थायिक होतो तेव्हा मी पाच वर्षांचा होतो. मला आठवतंय तेव्हापासून इसापनीती, लहान मुलांच्या गोष्टींची पुस्तकं मला आई वाचून दाखवायची. मुळात आमच्या घरात वाचनाची आवड सगळ्यांनाच होती. जसजसे मी आणि माझ्या बहिणी मोठे होत गेलो तसे आमच्या वाचनाच्या कक्षा अधिक प्रगल्भ होत गेल्या. Enid Blyton या लेखकापासून सुरुवात होऊन कधी Hardy Boys, Nancy Drew, Sidney Sheldon, Irving Wallace, Alistair Mclean पर्यंत पोहोचलो हे कळलंच नाही. मग James Hadley Chase आणि Nick Carter नेसुद्धा हजेरी लावली. माझ्या बहिणी तर Mills & Boon च्या भक्त होत्या. मी तरी मराठी कादंबऱयाही वाचायचो. म्हणजे बाबुराव अर्नाळकरांच्या डिटेक्टिव पुस्तकांपासून अनिल बर्वे, बाबा कदम, पु.ल. देशपांडे, व.पु. काळे, गौरी देशपांडे, वैजयंती काळे आणि आईची खास मैत्रीण सानियापर्यंत पुस्तकं वाचली.
शेवटच्या तिघी लेखिका तर अनेकदा घरी जेवायला असायच्या. कळस म्हणजे आईची सख्खी काकू सुप्रसिद्ध लेखिका डॉ. विजया राजाध्यक्ष… असे वाचन संस्कार घरात होते. जवळपास 5000 पुस्तकांची लायब्ररी घरातच होती. असा साहित्यिक वारसा घेऊन जन्माला आल्यावर वाचनाची गोडी न लागली तर नवल! मी, माझ्या बहिणी आणि आजूबाजूला राहणारे काही मित्र घरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एक लायब्ररीचे सभासद होतो. त्या काळात बंगळुरूला टीव्ही आला नव्हता. उन्हाळाच्या सुट्टय़ांमध्ये मुंबईला येणं हे ठरलेलं असायचं. कारण तेव्हा मुख्य आकर्षण टीव्हीचंही असायचं. तेव्हा टीव्हीचे कार्यक्रम संध्याकाळी 6.30 वाजता सुरू व्हायचे. बाकी दिवसभर पुस्तकं हेच आमचे मित्र असायचे.
पण हल्ली जे चित्र पाहायला मिळतं त्यावरून स्पष्ट दिसतं की, एकूण आजच्या युवा पिढीला एखादा लेख वाचायला जरी सांगितला तर ते त्यांच्या मोबाइलवर शोधून वाचतात. त्यामुळे संध्याकाळी लायब्ररीमध्ये जाऊन आपल्या आवडीची पुस्तकं वाचायला घरी घेऊन जाण्याची प्रथा आज लुप्त झाली आहे. आमच्या लहानपणी आम्ही आवडीच्या लेखकाचे पुस्तक वाचायला मिळावे म्हणून लायब्ररीमध्ये शर्यतीत असल्यासारखे धावत जायचो. पण सध्याचा जमाना मोबाइल व मॉल्सचा आहे.
हल्ली संपूर्ण दुनिया मुठीत आल्यामुळे पूर्वी ‘छायागीत’सारखे कार्यक्रम किंवा ‘साप्ताहिकी’ तेवढी आवर्जून पाहिली जायची ते चित्र आता इतिहासजमा झालं आहे. आजच्या मुलांना सगळं काही खटाखट हवं असतं. मुळात जन्मापासूनच पालक घरात कसे वावरतात त्यावरून मुलं घडत जातात. एखाद्या कुटुंबात आईवडील अजिबात वाचनाची आवड नसलेले असतील तर क्वचितच मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण झालेली पाहायला मिळते. असे घरातले संस्कार पुढे जाऊन फार मोलाचे ठरतात.
वाचनाची गोडी निर्माण करावी लागते. अगदी बालवयातच. ती ओरडून निर्माण होत नाही. रोजचं वर्तमानपत्र वाचण्याची सवय किती काही देऊन जाते. एखादी कादंबरी वाचताना आपण एका कल्पनेच्या जगात जातो. गाव, घर, शेत, डोंगरदऱया… आपल्या मनाने बघायला लागतो. म्हणून एखाद्या पुस्तकावर आधारित सिनेमा बनला आणि आपण ती कादंबरी वाचलेली असेल तर बऱयाचदा आपण वाचलेली कादंबरी आणि आपल्या कल्पनेतलं चित्र तसंच पडद्यावरचं चित्र हे कित्येकदा आपल्याला पटत नाही. कारण कादंबरी वाचतानाच आपल्या कल्पनेतलं गाव जास्त आवडून गेलेलं असतं.
आधुनिकतेने आणलेले फायदे बरेच आहेत. बऱयाच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पण त्याने वाचनाची आवड मागे पडली आहे. म्हणून घरचं वातावरण जर पुस्तकवेडं असेल तर जगणं निर्मळ झालं असतं. आज माझी बहीण अमेरिकेवरून बेंगलुरूमध्ये स्थायिक झाली. गेल्या काही वर्षांत तिच्या घरात ती 12-13 वयोगटातली मुलांना आठवडय़ातून एकदा जमा करते. बुक क्लब नावाचा उपक्रम तिने सुरू केला आहे, ज्यात ही मुलं आपल्या आवडत्या लेखकाची किंवा आवडत्या पुस्तकाबद्दल इतर मुलांसोबत वाचलेलं ज्ञान शेअर करतात. यामुळे चार लोकांसमोर उभं राहून आत्मविश्वासाने बोलायची कला अवगत होते. यालाच तर वेळेचा सदुपयोग करणे असं म्हणतात. असाच काहीसा उपक्रम आमच्या सोसायटीमध्ये सुरू केला आहे. ज्याला छान प्रतिसाद मिळतोय. भावी पिढीला वाचनाची गोडी लागावी याचा पाया आपल्यालाच रोवावा लागणार आहे. वाचले तर वाचाल!
z [email protected]
(लेखक fिक्रएटिव्ह हेड, अभिनेते आणि गायक आहेत.)