आपला माणूस : दिलीप जोशी बहुआयामी!

>> दिलीप जोशी

‘बरंच काही करावंसं वाटतं, पण जमत नाही,’ अशी कित्येकांची व्यथा असते. वयाची पंच्याऐंशी गाठलेले सुधाकरराव बक्षी जिद्दीने आपल्या इच्छा पूर्ण करतात. कोळशाच्या खाणीत केबलसीटवरून जमिनीखाली तीन-चारशे फूट ये-जा करीत वयाची आठ दशके ओलांडलेला हा माणूस तरुणांपेक्षा उत्साही असतो. मनस्वी जिद्दी आणि मनमोकळय़ा अशा या बहुआयामी माणसाचा वावर सभोवतालच्या लोकांना प्रसन्न करतो.

नागपूरचे सुधाकर बक्षी. त्यांचे निकटवर्तीय त्यांना बाबासाहेब म्हणतात. पण कोणी नुसते ‘बाबा’ म्हटलं तर त्यांना अधिक भावतं. वागण्या-बोलण्यात वैदर्भी अगत्य आणि रसिकता असलेले सुधाकरराव पंच्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करताना तीन पिढय़ांचे मित्र असतात. त्यांचे विचार ऐकायला तरुणही उत्सुक असतात. याचे कारण म्हणजे कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाऊन त्याचं तर्कसंगत विवेचन ते करतात. गोंधळलेल्या किंवा निराश मनांना त्यांच्या बोलण्यातून नवसंजीवनी लाभते. गेले अर्धशतक हे ‘काऊन्सेलिंग’चे कार्य ते हा शब्द रूढ होण्याच्या आधीपासून तन्मयतेने करीत आहेत. ते अर्थातच विनाशुल्क असते हे सांगण्याची गरज नाही. कारण तो त्यांचा व्यवसाय नाही, तर जीवनक्रत आहे. भौतिकशास्त्र्ा, गणित या विषयांत पदवी मिळवल्यावर सुधाकररावांनी लायब्ररी सायन्स आणि फाइन आर्ट्सचं शिक्षण घेतलं. शिवाय नाटय़शास्त्र्ाातही त्यांना विशेष रस होता. त्यामुळे त्यासंबंधीचे अध्यापनही त्यांनी केले. नागपूर आकाशवाणीसाठी गीतलेखन, नाटय़लेखन करत असतानाच शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या संघटनेचेही अनेक वर्षे नेतृत्व केले. हे सगळे करत असताना प्रत्येक क्षणी त्यांचा आत्मशोध अंतर्मनात सुरूच होता. माणसाचे मन आणि त्याचा व्याप या विषयीचे चिंतन अधिकाधिक गहिरे होत गेले. त्यातूनच ‘मनपासष्टी’सारखं काव्य साकारलं. त्यांच्या हिंदी-मराठी प्रासादिक ‘रामगीते’चे मान्यवर कलाकारांनी सादर केलेले प्रयोग झाले. स्वतःला ‘श्रद्धाळू नास्तिक’ म्हणवणाऱया सुधाकररावांची जीवनातील मांगल्यावर श्रद्धा आहे, पण कर्मकांड रूढीवादावर नाही. आपली ही भूमिका त्यांनी त्यांच्या अनेक लेखांमधून वेळोवेळी स्पष्ट केली आहे. मनाच्या अगाध शक्तीचा विचार करता करता त्यांना ते विचार जनसामान्यांपुढे मांडावे असे प्रकर्षाने वाटले आणि ‘सामना’मधून त्यांचे ‘मनसंपदा’ हे सदर वर्षभर प्रसिद्ध झाल्याचे वाचकांना आठवत असेल. याच लिखाणाचे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘आवाजी’ रूपांतर करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. कॉम्प्युटर आणून त्याच्याशी बऱयापैकी मैत्री केली. उत्तर आयुष्यात नित्यनवे शिकण्याची त्यांची ऊर्मी अनुकरणीय आहे. सुधाकररावांच्या सहवासात आलेली मंडळी वयाचा हिशेब न ठेवता त्यांची ‘मित्र’ झाली याचे श्रेय काळाबरोबर चालण्याचे सहज जमणाऱया बक्षी यांचेच.

पुढच्या पिढीशी त्यांचा संवाद कसा चालतो याचे उदाहरण म्हणजे एकदा एक पालक त्यांच्या तरुण मुलाला घेऊन सुधाकररावांकडे आले. आपले न ऐकणाऱया या मुलाला आता ते चार गोष्टी सुनावतील, अशी त्यांची अपेक्षा. परंतु सुधाकररावांनी त्या मुलाचे म्हणणे जाणून त्याचीच बाजू घेतली. पालक चकित! पण त्याचा परिणाम असा झाला की त्या मुलाने त्याच्या शिक्षणात पालकांना अपेक्षित असलेले यश सहज मिळवले. तरुण वर्गाला केवळ ‘उपदेश’ करण्याऐवजी त्यांचे मन जाणून संवाद साधला तर प्रश्न सुटू शकतात हे त्यातून सिद्ध झाले, अशी अनेक उदाहरणे आहेत. सुधाकरराव ‘परोपदेशे पांडित्य’ कधीच दाखवत नाहीत. इतरांना चार गोष्टी सांगताना ते स्वतःकडेही अलिप्तपणे पाहतात. ‘प्रकाश काजव्याचा’ या त्यांच्या आत्मकथनात त्यांनी आपले स्वभावदोष आणि पूर्वायुष्यात घडलेल्या चुका निःसंकोचपणे मांडल्या. आत्मगौरवात रममाण होणे हा मनुष्यस्वभावच आहे; परंतु आत्मदोष जाहीरपणे स्वीकारायला जे धैर्य लागते ते बक्षी यांच्याकडे आहे. त्या अनुषंगाने ते स्वतःमध्ये सुधारणाही करतात. अशा या मनस्वी माणसाची जिद्द अफाट आहे. हृदयाची एक झडप निकामी झालेली असताना त्यांनी मुंबईकर मित्रांना भेटण्याचा ध्यास घेतला. अशा भेटीगाठी हेच त्यांचे ‘टॉनिक’ हे त्यांच्या पत्नीनेही ओळखले आणि लगेच हे दाम्पत्य एका तरुण जोडप्यासोबत सुहृदांच्या भेटीला आले. विशेष म्हणजे घरी परतल्यावर सुधाकररावांची खालावलेली प्रकृती सुधारली. डॉक्टर म्हणाले, ‘आता तुम्ही शंभरी गाठू शकाल.’ उत्साह मनात असणे आणि त्याचे कृतीत रूपांतर करणे या भिन्न गोष्टी. ‘बरंच काही करावंसं वाटतं, पण जमत नाही,’ अशी कित्येकांची व्यथा असते. वयाची पंच्याऐंशी गाठलेले सुधाकरराव बक्षी जिद्दीने आपल्या इच्छा पूर्ण करतात. कोळशाच्या खाणीत केबलसीटवरून जमिनीखाली तीन-चारशे फूट ये-जा करीत वयाची आठ दशके ओलांडलेला हा माणूस तरुणांपेक्षा उत्साही असतो. या वयात स्कूटर चालवणे त्यांनी कालपरवापर्यंत सोडले नव्हते. मनस्वी जिद्दी आणि मनमोकळय़ा सुधाकररावांचे जीवन पारदर्शी आहे. अशा बहुआयामी माणसाचा वावर सभोवतालच्या लोकांना प्रसन्न करतो. त्यांना भेटलं की आपणही आपोआप आत्मपरीक्षण करू लागतो.

– khagoldilip@gmail.com