संचित – सौजन्यमूर्ती!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

एस. एम. जोशी हे समाजवादी नेते. लोकशाही, समाजवाद हेच जीवनध्येय मानणाऱया ‘एसेम’ म्हणजेच एस. एम. जोशी यांच्या ध्वनिमुद्रणाच्या या आठवणी…

संयुक्त महाराष्ट्राचा लढा जोरात सुरू असतानाची गोष्ट. त्या आंदोलनातल्या आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, डांगे अशा नेत्यांसह एक ‘सौजन्यमूर्ती’, पण कणखर नेताही होता. त्यांचे नाव साथी एस. एम. जोशी (श्रीधर महादेव जोशी ऊर्फ एसेम) हे समाजवादी नेते. 1904 मध्ये त्यांचा जन्म झाला. शाळा-कॉलेजच्या काळातच ते स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेऊ लागले.

… तर आधी उल्लेख केलेल्या, मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू झालेल्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सर्वपक्षीय नेते आणि महाराष्ट्रातील अन्य क्षेत्रांतले मान्यवरही सहभागी झाले होते. सी.डी. देशमुख यांनी तर याच प्रश्नावर नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. आमच्या बालपणीचे ते दिवस आठवतात. घरीदारी एकच चर्चा चालायची… ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र’.

त्यातच एकदा मुंबईतल्या दादर स्टेशनजवळ आंदोलक मोठय़ा संख्येने जमलेले असताना जमावाने अडवाणी नावाच्या पोलीस अधिकाऱयाला घेरले. त्याबद्दल स्वतः ‘एसेम’ यांनी सांगितले, ‘‘मी तिथे होतो, जमाव चिडलेला असणे स्वाभाविक होते, पण त्या अधिकाऱयाला काही झाले असते तर अनवस्था प्रसंग निर्माण झाला असता. शिवाय आमचे आंदोलन सनदशीर मार्गाने सुरू होते. त्या अधिकाऱयाला जमावाने घेरलेले पाहताच अचानक काहीतरी सुचले आणि मी त्वरित त्या इन्स्पेक्टरला पाठीशी घातले. जमाव आणि अधिकारी यांच्यामध्ये ठामपणे उभे राहून म्हटले, त्याला मारण्याआधी तुम्हाला मला मारावे लागेल. याचा योग्य तो परिणाम झाला. आंदोलकांनी माझे ऐकले आणि एक वाईट प्रसंग टळला. त्यावेळी त्या इन्स्पेक्टरला काही झाले असते तर हिंसाचार भडकला असता. कदाचित आमच्या लढाईवर त्याचा विपरीत परिणाम झाला असता.’’

लोकशाही लढय़ातला हा पराक्रम 1985 मध्ये मी घेतलेल्या आणि ध्वनिमुद्रित केलेल्या मुलाखतीत ‘एसेम’ सहज सांगत होते…‘‘अरे, लढा म्हटला की, असे प्रसंग येणारच. एकदा एका सभेत भाषण करत असताना कोणीतरी मागून डोक्यात लोखंडी पट्टी मारण्याचा प्रयत्न केला. तेवढय़ात एका कार्यकर्त्याने त्याचा हात वरच्यावर पकडला, नाहीतर तेव्हाच आमचा कपाळमोक्ष झाला असता!’’ असे जीवावर बेतणारे प्रसंग आले म्हणून ‘एसेम’ कधीच डगमगले नाहीत. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात तर ते स्वतःच्या पक्षाविरुद्धच भूमिका घेऊन सामील झाले होते. महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्याविषयी त्यांना आदर वाटत होता, पण संयुक्त महाराष्ट्राच्या बाबतीत पंडितजीसुद्धा त्यावेळी पुरेसे लोकशाही पद्धतीने वागले नाहीत. आम्ही मराठी राज्याच्या निर्मितीचा लढा लढत असताना त्यावेळी चाललेल्या चर्चांमध्ये त्यांनी आम्हाला सहभागी करून घ्यायला हवे होते अशी त्यांची खंत होती.

म्हणूनच प्रतापगडावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे अनावरण करायला 1956 मध्ये नेहरू येणार असे समजल्यावर संयुक्त महाराष्ट्र समितीने उग्र निदर्शने केली. त्यासाठी वाई-प्रतापगड मार्गावर राज्यातून हजारो लोक एकवटले. ‘एसेम’नी पोलिसांना सांगितले, आंदोलन करणे हा आमचा लोकशाही हक्क आहे, पण नेहरू आमचेही पंतप्रधान  आहेत. आम्ही घोषणा देताना ते आम्हाला दिसले पाहिजेत आणि आंदोलक सहकाऱयांनाही समजावले की, जोरदार घोषणा देऊ, पण शिस्तीने.  दोघांनी ‘एसेम’चे म्हणणे ऐकले आणि नेहरूंना समजावे म्हणून ‘‘वुई वॉन्ट बॉम्बे’’ (आम्हालाच मुंबई पाहिजे) या घोषणेने परिसर दुमदुमला. नेहरूंनी शेजारी बसलेल्या यशवंतरावांना विचारले, ‘‘ते काय म्हणतायत?’’ यशवंतराव उत्तरले, ‘‘त्यांची मागणी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची आहे. त्यावर नेहरू म्हणाले, ‘‘कान्ट दे वेट फॉर समटाइम? ते थोडी वाट का पाहत नाहीत?’’ हे संभाषण स्वतः यशवंतरावांनी ‘एसेम’ना सांगितले होते. नेहरूंची मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राबद्दलची मानसिकता तयार होत असावी. कारण इंदिरा गांधींनी या चळवळीला पाठिंबा दिला होता.

मात्र इंदिराजींनी 1975 मध्ये आणीबाणी जाहीर करताच ‘एसेम’ पुन्हा लढय़ात उतरले. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी ते राजीव गांधी यांच्या काळापर्यंतच प्रदीर्घ राजकीय संक्रमण ‘एसेम’नी पाहिले. त्यांना अनेकदा अपयश आले. यावरही आम्ही बोललो. ते आजारी असूनही बोलत जिन्यापर्यंत आले. ‘‘अरे, आम्ही लोकशाही तत्त्वांसाठी लढलो. यश-अपयशापेक्षा त्यासाठी लढण्यातले समाधान महत्त्वाचे होते’’, असे त्यांनी शेवटी सांगितले.                           [email protected]