
>> डॉ. हर्षवर्धन कांबळे
प्राथमिक शिक्षण हा सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार आणि गुणवत्तेचे असावे. शिवाय प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की, ते पूर्णपणे गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावे. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे, असे मत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडले होते आणि त्यासाठी संविधानात तशी तरतूद करून ठेवली. समाजाच्या सर्व थरांपर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बुद्धीने सशक्त होतो. व्यक्तीला चांगले, वाईट यातला फरक समजू लागतो. प्रज्ञा, शील, करुणा या गुणांना प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज आहेच, असे सातत्याने ते सांगत असत.
हिंदुस्थानात जातींच्या ठरवलेल्या नियमानुसार कनिष्ठ जातींना शिक्षण घेण्याचा कोणताच अधिकार नव्हता. जर समजा शिक्षणविषयक कोणत्या गोष्टी कनिष्ठ जातीतील लोकांनी ऐकल्या तर त्यांना मनुस्मृतीच्या दंड विधानांतर्गत शिक्षा होत असे. ज्यांनी जात चोरून किंवा लपून छपून शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कठोर शिक्षा देण्याचे प्रावधान होते. स्त्रियांना हेतुपुरस्सर शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले होते. अशा विषम परिस्थितीमध्ये उच्च शिक्षण घेऊन साऱया समाजाला शिक्षणाचा मार्ग दाखवणे हे श्रेष्ठ कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे 19 जून 1950 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली. तेव्हाची शिक्षणाची परिस्थिती जर पाहिली तर लक्षात येते की, निजाम प्रांत म्हणजेच हैदराबाद संस्थानामध्ये पूर्वी मराठवाडा भाग समाविष्ट असायचा. या प्रांतात शालेय शिक्षणविषयक परिस्थिती फारच खराब होती. 1931 मध्ये या प्रांतात साक्षरतेचे प्रमाण केवळ 5 टक्के होते. 1941 मध्ये 9.3 टक्के होते. सन 1948-50 यादरम्यान हैदराबाद संस्थानात केवळ 17 महाविद्यालये आणि केवळ 7 हजार 615 विद्यार्थी होते. याच कालखंडात मुंबई राज्यात 50 महाविद्यालयांमध्ये 50 हजार 359 विद्यार्थी शिक्षण घेत होते. शिवाय माध्यमिक शिक्षणाचा प्रसार-प्रचार फारच धीमा होता आणि त्यातल्या त्यात तर दलितांची शाळेतील उपस्थिती तर नगण्यच होती. या सर्व परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून संभाजीनगरच्या 150 एकरच्या विस्तीर्ण परिसरात मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली व या परिसरास ‘नागसेन वण’ हे नाव दिले. हे कॉलेज साऱया वंचित लोकांसाठी हक्काचे शिक्षणाचे केंद्र बनलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या शिक्षण संस्थांना ‘मिलिंद’, ‘सिद्धार्थ’, ‘नागसेन वण’ आणि ‘पीपल्स एज्युकेशन’ अशी सुंदर नावे दिली, जे विचार स्वातंत्र्य, लोकशाही यांचे प्रतीक आहे. लोकांमध्ये शिक्षणाविषयी प्रचंड चेतना निर्माण होईल असे बुद्ध धम्माशी जुळलेले नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुढील तीन गुरूंना अग्रस्थानी मानायचे ते म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध, महात्मा जोतिबा फुले आणि संत कबीर. तिन्ही आदर्श महापुरुष साऱया मानवजातीला आदिकल्याण आणि अंतिम कल्याण मार्गाकडे घेऊन जाणारे आहेत. तसेच जोतिबा फुले म्हणायचे, ‘विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येsने केले.’ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा अनर्थ टाळण्यासाठी जीवनभर कार्यरत राहिले. शाळा, कॉलेज, वसतिगृह, शिष्यवृत्ती आणि आरक्षण यांची सांगड घालत अविद्येतून विद्यकेडे सर्व मागास वंचितांना घेऊन गेले. आज परिस्थिती बरीच सुखद झालेली आहे. शिकून सवरून मागास जातींची मुले-मुली मोठमोठय़ा पदांवर कार्यरत आहेत. सर्वांनीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘वाचाल तर वाचाल’ किंवा ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हे मंत्र अंगिकारलेले दिसतात. डॉक्टर, वकील, प्राध्यापक, सनदी अधिकारी आणि इंजिनीअर झालेले चहूबाजूंनी बघावयास मिळत आहेत. सर्वत्र शिक्षणाची अव्याहत गंगा वाहत आहे. शिक्षणाची टक्केवारी उच्च स्तर गाठत आहे याचे सारे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाते.





























































