
>> डॉ. ज्योती धर्माधिकारी
‘विमुक्ता’ या सदरामध्ये आपण सामर्थ्यवान स्त्रियांचा शोध घेऊन त्यांची माहिती घेणे आणि त्यांचा प्रभाव व प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न केला. अर्थात, एक व्यक्ती म्हणजे एका देशाचा प्रतिनिधी असते याच न्यायाने महिलांचा राजकीय वावर, कर्तृत्व, ज्ञान आणि प्रतिष्ठा यांचा फायदा त्या देशाला झाला, देशाची व्यवस्था अधिक प्रगतिशील झाली हे सिद्धही झाले आहे. एकंदरच ‘विमुक्ता’ सदर जगभरातील प्रभावशाली महिलांची लेखमाला तर आहेच, पण देश-विदेशाच्या प्रगतीचा आलेख मांडणारी लेखमाला ठरली.
एका स्त्रीच्या कर्तबगारीने आणि सामर्थ्यवान नेतृत्वाने देशाची प्रगती कशी होऊ शकते त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे इंडोनेशिया हा देश आहे. नव्वदीच्या दशकापर्यंत दक्षिण आशियाई देशांमध्ये इंडोनेशिया या देशाची अर्थव्यवस्था अत्यंत कमकुवत होती. त्यातच 1997 मध्ये देश आर्थिक मंदीच्या तडाख्यात सापडला. हाच देश आज 2023 या वर्षामध्ये सर्वात वेगाने विकसित अर्थव्यवस्था असणारा देश आहे. इंडोनेशियाचा नंबर चीनच्या खालोखाल लागतो हे विशेष. हे कर्तृत्व इंडोनेशियाच्या वित्तमंत्री आणि जगातील प्रभावशाली स्त्राr श्री मुल्यानी इंद्रावती यांचे. त्यांच्या धोरणी निर्णयामुळे इंडोनेशिया आर्थिक संपन्नतेकडे घोडदौड करत आहे. इंद्रावती या पहिल्यांदा इंडोनेशियाच्या 2005 ते 2010च्या काळामध्ये वित्तमंत्री होत्या. 2016 नंतर त्यांची दुसरी टर्म सुरू झाली.
61 वर्षीय श्री मुल्यानी यांनी देशाच्या विकासासाठी अत्यंत कडक धोरणात्मक निर्णय घेतले. देशाला मंदीतून बाहेर काढण्यासाठी श्री मुल्यानी इंद्रावती यांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना तेथील राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान यांचे संपूर्ण सहकार्य लाभले ही उल्लेखनीय बाब आहे. तसे पाहायला गेले तर इंद्रावती या कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाहीत. तरीही इंडोनेशियाची गेल्या अठरा वर्षांची प्रगती देदीप्यमान ठरली. त्यांचा जन्म सुमात्रा येथील तनजुंग कारंग (लेप्युंग) येथे झाला. त्या त्यांच्या आई-वडिलांचे सातवे अपत्य. इंद्रावती यांचे वडील तज्ञ प्राध्यापक, विचारवंत म्हणून ओळखले जातात. 1986 मध्ये इंडोनेशियाच्या विद्यापीठातून इंद्रावती यांनी पदवी मिळवली. त्यानंतर अर्बना कॅम्पेन येथील विद्यापीठामध्ये अर्थशास्त्राची पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. पीएच. डी. संशोधनही त्यांनी याच विद्यापीठामधून 1992 मध्ये पूर्ण केले. दरम्यानच्या काळात व्याख्याता म्हणून त्यांनी इंडोनेशियन अर्थव्यवस्थेवर अनेक व्याख्याने दिली आणि लेख लिहिले.
2001 मध्ये त्यांची नियुक्ती संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय विकास कार्पामांमध्ये झाली. अटलांटा, जॉर्जिया येथील कार्यालयांमध्ये त्यांची नियुक्ती झी. इंडोनेशियाचा स्तर सुधारून इंडोनेशिया हा आर्थिक स्वायत्त व्हावा ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यामुळे अर्थतज्ञ असलेल्या इंद्रावती यांना इंडोनेशियाची अर्थव्यवस्था अभ्यासण्याची एक सुवर्णसंधी मिळाली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संचालक म्हणून 2002 मध्ये त्यांची नियुक्ती झाली. या वेळी त्यांच्याकडे दक्षिण आशियाई बारा देशांच्या अर्थव्यवस्थेचे काम संयुक्त राष्ट्रांनी सोपवलेले होते. साहजिकच दक्षिण आशियाई देश, अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्थेचे अडथळे आणि यशस्वी होण्यासाठी लागणारी ध्येयधोरणे याबद्दल इंद्रावती यांच्या मनामध्ये काही ठोकताळे होते. 2004 पर्यंत त्यांनी या पदावर काम केले.
2005 मध्ये तेथील राष्ट्राध्यक्ष सुसिलो बमबंग युद्धयोनो यांनी त्यांना जॉर्जियावरून आपल्या देशात बोलावून घेतले आणि त्यांच्याकडे वित्तमंत्री हे पद सोपवले. 2005 ते 07 हा काळ इंद्रावती यांच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक असा काळ ठरला. कारण वर उल्लेखल्याप्रमाणे 1997 मध्ये इंडोनेशिया आर्थिक मंदीच्या खाईत सापडला. त्यातून बाहेर येण्यासाठी ज्या उपाययोजना सुरू होत्या त्या सर्व यशस्वी ठरत नव्हत्या. मुख्य म्हणजे देश भ्रष्टाचाराने संपूर्ण पोखरलेला होता. अशा अटीतटीच्या काळामध्ये त्यांच्याकडे वित्तमंत्री हे पद आले. देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये असणारे अडथळे त्यांना माहीत होते. संयुक्त राष्ट्र संघांच्या कार्पामांतर्गत काम करताना त्यांना हे अडथळे जवळून बघता आले. 2005 मध्ये जेव्हा त्यांची नियुक्ती वित्तमंत्री या पदावर झाली, त्या वेळी सर्वात पहिल्यांदा त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात मोहीम काढली. अत्यंत कडक कारवाई करण्याचे धोरण राबवले. विशेष म्हणजे करप्रणालीमध्ये काम करणारी संपूर्ण व्यवस्था ही भ्रष्टाचारी होती. वित्तमंत्री होताच त्यांनी टॅक्स प्रणालीतील सर्व उच्चपदस्थ अधिकाऱयांना बडतर्फ करून त्या जागी नवीन नियुक्त्या केल्या. कस्टम ऑफिसला शिस्त लावली. 2009 पर्यंत इंडोनेशियाचा जीडीपी 6.6 राखण्यात त्यांना यश आले. वेगाने होणारी प्रगती असून त्याची नोंद जगभरात घेतली गेली.
2007 चा ‘युरो-मनी फायनान्स मिनिस्टर ऑफ द इयर’ हा पुरस्कार त्यांना मिळाला 2008 पासून ते 2023 पर्यंत सातत्याने त्या जगभरातील सामर्थ्यवान स्त्राr ठरल्या आणि ‘फोर्ब्स’मधील आपले स्थान अढळ ठेवले. देशाच्या अर्थव्यवस्थेला शिस्त लावून देशाची प्रगती होत नसते. त्यासाठी उत्पन्नाची विविध साधने निर्माण करावी लागतात याची जाणीव इंद्रावती यांना होती. विविध कंपन्या त्यांनी शासन अर्जित करून घेतल्या. देशामध्ये उत्पन्नाची नव्याने साधने निर्माण झाली. कारखानदारी वाढली, लोकांच्या हाताला काम मिळाले आणि अर्थव्यवस्था ही प्रगतीच्या रुळावर धावू लागली.
जागतिक बँकेच्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. उच्चपदस्थ सल्लागार समितीमध्येही त्यांचे नाव होते. जवळ जवळ 74 देशांच्या अर्थव्यवहाराचे काम 5 मे 2010 रोजी इंद्रावती यांच्याकडे आले. त्या जागतिक बँक समूहाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमल्या गेल्या. या काळामध्ये इंडोनेशियाची अर्थव्यवस्था पुन्हा गडगडली. 2016 मध्ये त्यांच्याकडे वित्तमंत्री हे पद पुन्हा सोपवण्यात आले.
देशाला मंदीच्या खाईतून बाहेर काढून प्रगतीपथावर नेण्याचे हे विलक्षण उदाहरण श्री मुल्यानी इंद्रावती यांनी घालून दिले. दक्षिण आशियातील एका परजिवी अर्थव्यवस्था असणाऱया देशाला स्वयंपूर्ण करण्याचे उल्लेखनीय कार्य इंद्रावती यांनी केले. त्याबद्दल इंडोनेशियन इतिहासामध्ये श्री मुल्यानी इंद्रावती यांचे नाव अजरामर होईल. अर्थात, त्यांच्या कार्यकाळाची अनेक वर्षे अजून शिल्लक आहेत आणि देश विविध प्रकारचे अर्थव्यवस्थेचे मैलाचे दगड पार करेल यात शंका नाही. एका अत्यंत प्रभावशाली स्त्राrचा उल्लेखनीय प्रवास प्रेरणादायक आहे.
[email protected]
(लेखिका राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय, जालना येथे इंग्रजी विभागप्रमुख आहेत.)






























































