
डॉ. मुकुंद कुळे
लोकपरंपरेत जे जे काही आहे, त्या साऱयाचा मागोवा ‘लोकविधा’ या सदरात घेणार आहोत. लोकपरंपरा ही पिढय़ान् पिढय़ांच्या जगण्याची वाहक असते, मात्र म्हणून कायमच ती जशीच्या तशी स्वीकारार्ह नसते. तिचा विवेकानेच स्वीकार करावा लागतो. क्वचित कधी परंपरेचे नवे अन्वयार्थही लावायला हवेत… आजपासून पाक्षिक स्वरूपात प्रसिद्ध होणाऱया ‘लोकविधा’ या सदरात तोच प्रयत्न करणार आहे.
कितीही आधुनिक काळात जगत असलो, तरी शिव-पार्वती, राधा-कृष्ण आणि राम-सीता या दैवत-जोडप्यांची मोहिनी हिंदुस्थानी मनावरून उतरायला तयार नाही. ‘पुराणातली वानगी पुराणात’ असं म्हटलं जात असलं तरी आजची परिस्थिती तशी नाही. उलट आज अधिकाधिक आपण पुराणकाळाशी जखडले जात आहोत आणि एकदा का हे जखडलेपण आलं की, आपण परंपरेला प्रश्न विचारणं विसरून जातो. त्यातूनच दैवतांकडे आध्यात्मिक-धार्मिक भावनेनेच पाहतो, पण या जोडप्यांवरचं हे धार्मिकतेचं-पुराणाचं अवगुंठन मागे सारलं तर? प्रत्यक्षात काय दिसेल या नात्यांच्या पलीकडे, विशेषतः राम-सीतेच्या बाबतीत?
राम-सीतेचं नातं नेमकं कसं होतं? अभिजन परंपरा सांगते तसं आदर्शवादी की, लोकपरंपरा मानते तसं परंपरावादी? इतरांसाठी मुक्तीचा शब्द असलेला ‘राम’ सीतेसाठी जुलमाचा ‘राम’ का झाला? लोकसंस्कृतीतील महिलांच्या मनाचा मागोवा घेतला, तर आपल्याला राम-सीतेच्या नात्यातील वेगळय़ाच भावबंधांचं दर्शन घडतं. हे भावबंध नेहमीच सुखावह नव्हते, किंबहुना सीतेसाठी तर ते अनेकदा दुःखदायकच होते, परंतु आजवर रामाचंच कौतुक करणाऱया परंपरावाद्यांनी सीतेचं हे दुःख कधीच उजागर केलं नाही.
‘सोशिकतेचं मूर्तिमंत प्रतीक’ अशी सीतेची प्रतिमा आजपर्यंत हिंदुस्थानी जनमानसात कायम होती आणि ती तशीच राहावी यात परंपरावाद्यांचा एक मोठा डाव होता. कारण समाजात असे आदर्श उभे केले की, मागून येणाऱया स्त्र्ायांना त्यांचा दाखला देणं सोपं जातं. स्त्र्ायांचा पतिव्रता म्हणून जो गौरव केला जातो, त्यामागेही हेच कारस्थान आहे. जेणेकरून स्त्र्ााrने आवाज उठवू नये. मुळात स्वतःचं स्वतंत्र अस्तित्वच मानू नये. याच न्यायाने आजवर सीतेचा आवाज दाबला गेला, पण आता स्त्र्ाया बोलू लागल्यात. अगदी रामायण-महाभारतातल्या, पुराणातल्या स्त्र्ायाही! आपलं दुःख, आपल्या वेदना सांगायला त्या स्वतः अस्तित्वात नाहीत, पण त्यांच्या दैवतीकरणामागे दडलेल्या दर्दभऱया कथा-कहाण्यांना आता वाचा फुटलीय. आताच्या समविचारी स्त्र्ााr-पुरुषांच्या माध्यमातून त्या आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल समाजपुरुषाला जाब विचारतायत. सीता त्यापैकीच एक!
खरं तर सीता-द्रौपदी काय, रुक्मिणी-भामा काय, सगळय़ा अभिजनांची परंपरा सांगणाऱया पुराण आणि महाकाव्यांतल्या चरित्रनायिका. साहजिकच त्यांच्याभोवती ग्रंथकर्त्यांनी स्त्र्ााr म्हणून असलेल्या मानमर्यादांचा, त्याग-नीतिमत्तेचा सुरेख कोष विणलेला, त्यामुळे त्यांची दुःख सर्वसामान्यांसमोर कधी पोचलीच नाहीत. मात्र अभिजन परंपरेला समांतरपणे वाहणाऱया बहुजनांची संस्कृती-साहित्य असं करत नाही. ती सुख असो किंवा दुःख सगळंच मोकळेढाकळेपणाने सांगून मोकळी होते. राम-सीतेच्या नात्याकडेही लोकपरंपरेने याच नजरेने पाहिलेलं आहे. त्यामुळे अभिजन परंपरेतल्या मर्यादापुरुषोत्तम रामाकडे लोकपरंपरेने क्वचित कधी खलपुरुष म्हणूनही पाहिलेलं आहे. कारण त्याने सीतेवर अन्याय केलाय, असं या लोकपरंपरेचं म्हणणं आहे आणि त्याचे अनेक दाखलेही लोकवाङ्मयात सापडतात, मात्र केवळ लोकवाङ्मयच नाही, तर सद्यकालीन वाङ्मयातही सीतेकडे तिच्या पारंपरिक सोशीक प्रतिमेच्या पलीकडे जाऊन पाहण्याचा प्रयत्न आता होताना दिसतो. विशेषतः अमिष त्रिपाठी यांची ‘सीता ः वॉरियर ऑफ मिथिला’ ही इंग्रजी आणि प्रसिद्ध कन्नड लेखक एस. एल. भैरप्पा यांची ‘उत्तरकांड’ ही कन्नड कादंबरी, या दोन कादंबऱयांनी सीतेला काहीशा वेगळय़ा रूपात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
अमिषने सीतेला वीरांगनेच्या रूपात रंगवलंय. आपल्या मिथिला नगरीचं अस्तित्व टिकवण्यासाठी लढणाऱया सीतेचं क्षात्रतेजच अमिषने उजळून टाकलंय, तर भैरप्पांनीही सीतेच्या वेगळय़ा पैलूचं दर्शन घडवलंय. ‘पर्व’ कादंबरीत त्यांनी ज्याप्रमाणे महाभारतातल्या सगळय़ा पात्रांना मानवी पातळीवर रेखाटलंय, तेच त्यांनी ‘उत्तरकांड’मध्ये केलंय. त्यामुळे सीता थेट आजच्या काळातली व्यक्तिरेखा वाटते.
रावणाच्या तावडीतून सुटका केल्यावर रामाने सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली, हा प्रसंग एकूणच स्त्र्ााrवादाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळेच सीता जशी रामापासून दूर होती, त्याप्रमाणेच रामही सीतेपासून दूर होता, मग जो न्याय सीतेला तोच रामाला का नाही? असा सवाल अनेकदा केला जातो. नेमका असाच सवाल भैरप्पांच्या ‘उत्तरकांड’ कादंबरीत रामाला करण्यात आला आहे. रामापासून दूर रावणाच्या बंदिवासात काही काळ राहिल्यामुळे सीतेच्या शीलाबद्दल जर संशय व्यक्त केला जात असेल, तर सीतेपासून तेवढाच काळ दूर असलेल्या रामाच्या शीलाचं काय? हा प्रश्न म्हणजे एका अर्थाने आजच्या समाजपुरुषाला दाखवलेला आरसा आहे.
सीतेसंदर्भातल्या कथांना-मिथकांना आता वेगळा आयाम दिला जात आहे, पण खरंच सीता कोण होती? वाल्मीकींच्या रामायणानुसार ती जनकाची कन्या होती, रामाची पत्नी होती, लवकुशाची आई होती, दशरथाची सून होती. जोडायची तर तिची अशी कितीतरी कुणाकुणाशी जिव्हाळय़ाची नाती जोडता येतील, पण जन्मापासून ते थेट जीवनाची अखेर होईपर्यंत तिचं एकच नातं तिला कायम चिकटून राहिलं, ते होतं मातीचं नातं. मातीचं तिच्याशी आणि तिचं मातीशी असलेलं नातं. ती मातीचीच लेक होती, म्हणून तर जिवंतपणी मातीत गेली, सन्मानाने!
या अंगाने सीतेकडे पाहिलं, तर सीतेइतकी लोकप्रिय आणि जनमानसात रुजलेली पौराणिक व्यक्तिरेखा दुसरी सापडणार नाही. त्यामुळेच अभिजन परंपरेनं ‘रामायण’ सांगितलेलं असलं तरी लोकपरंपरेनं मात्र ‘सीतायन’च (सीतायन हा शब्द डॉ. तारा भवाळकर यांनी योजलेला आहे) गायलेलं आहे. उगाच नाही लोकपरंपरा म्हणत-
‘राम म्हणू राम, नाही सीतेच्या तोलाचा
हिरकणी सीतामाई, राम हलक्या दिलाचा’
सीतेवर झालेल्या अन्यायाची चूड लोकसंस्कृतीतल्या स्त्र्ायांच्या मनामनात पेटलीय. त्यांना तिचं दुःख पाहवत नाही. रामाने तिचा केलेला त्याग आणि रानात तिच्या वाटय़ाला आलेलं दुःख, त्या आपलंच दुःख मानून व्यक्त करताना म्हणतात-
‘सीता चालली वनाला, रडू लागली मनाला
एवढी होती माया, भूल पडली रामाला
सीताई सांगी कथा, आपल्या जलमाची परवड
लव-कुश बाळायाच्या, नव्हती न्हाणीला तरवड’
एवढंच कशाला? काही लोकभावना तर एवढय़ा पुढे जातात की, सीतेवर झालेल्या अन्यायाने क्षोभ पावून म्हणतात-
‘सीतेला वनवास, असे कितीदा येतील
लवू पोटाला येतील, सूड रामाचा घेतील’
महत्त्वाचं म्हणजे अयोध्येला वारसदार हवा म्हणूनच रामाने सीतेचा लवकुशासह स्वीकार केला, असंही काही गीतं सांगतात. ज्यांच्याशी आपण लढत होतो, ती आपलीच मुलं आहेत म्हटल्यावर राम जेव्हा लव-कुश-सीता सगळय़ांना घेऊन अयोध्येला जायला निघाला, त्याचं वर्णन करताना या लोकगीतातील सीता म्हणते-
‘आता कशाला जाऊ वाडय़ात गं,
कशाला जाऊ वाडय़ात गं
बाळ दिले त्यांच्या हाती गं,
बाळ दिले त्यांच्या हाती गं
सरलं अर्ध आयुक्ष गं,
सरलं अर्ध आयुक्ष गं
आयुक्षाची झाली माती गं,
आयुक्षाची झाली माती गं
वसार वसार तू धरतरी माते गं,
वसार तू धरतरी माते गं
तिथे धरतरी वसारली, सीता धरतरीत गेली गं’
या गाण्यात सीतेने काढलेले ‘आयुक्षाची झाली माती गं’ हे उद्गार खूप जहाल आहेत. पराकोटीचा छळवाद वाटय़ाला आल्यानंतरच असे उद्गार काढले जातात.
लोकवाङ्मयाची पानं चाळत गेलं, तर यापेक्षाही कितीतरी कठोर प्रहार लोकमानसाने रामावर केलेले दिसतात. अभिजन परंपरेने रामाचा गुणगौरव केला आणि सीतेला सोशीकतेची मूर्ती बनवून लोकांसमोर सादर केलं, पण जे अभिजन परंपरेला दिसलं नाही, ते लोकपरंपरेला दिसलं. म्हणून तर या परंपरेने सीतेचं पुन्हा जमिनीत जाणं, हा तिने केलेला विद्रोह मानला! एकूणच लोकपरंपरेच्या मनात डोकावलं, तर तिथे रामायणाऐवजी सीतायनच तर दडलेलं दिसतं.


























































