
>> दुष्यंत पाटील
अडाजिओ म्हणजे अत्यंत संथ लयीत असणारी एखादी संगीत रचना. अल्बिनोनीची अडाजिओ ही रचना आजपर्यंत कित्येक चित्रपटांमध्ये, टीव्हीवरच्या कार्यक्रमांमध्ये, जाहिरातींमध्ये खूप वेळा वापरण्यात आली. ऐकल्या ऐकल्याच ही रचना मनाची पकड घेते.
पाश्चात्त्य संगीताच्या दुनियेतल्या लोकप्रिय असणाऱ्या रचनांपैकी सर्वात वादग्रस्त असणारी रचना म्हणून ‘Albinoni’s Adagio in G Minor’ या रचनेचा उल्लेख करता येईल. ही रचना टोमॅसो अल्बिनोनी या रचनाकाराच्या नावानं आज जगभर प्रसिद्ध असली तरी वास्तवता काही वेगळीच आहे!
अडाजिओ म्हणजे अत्यंत संथ लयीत असणारी एखादी संगीत रचना. अल्बिनोनीची अडाजिओ ही रचना आजपर्यंत कित्येक चित्रपटांमध्ये, टीव्हीवरच्या कार्यक्रमांमध्ये, जाहिरातींमध्ये खूप वेळा वापरण्यात आली. ऐकल्या ऐकल्याच ही रचना मनाची पकड घेते.
अल्बिनोनी 1671 मध्ये एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी जन्मला. त्याचा संगीताकडं असणारा कल लहानपणापासूनच स्पष्ट जाणवत होता. फक्त 23 वर्षे वय असताना त्यानं ऑपेरासाठी संगीत रचलं. आयुष्याच्या शेवटपर्यंत (1751) त्यानं कित्येक ऑपेरांना संगीत दिलं, वाद्यसंगीतातल्या कित्येक रचना केल्या. इटलीमधल्या त्या काळाच्या प्रसिद्ध संगीतकारांमध्ये त्याची गणना व्हायची, पण दुर्दैवानं अल्बिनोनीच्या आयुष्याविषयी फारसं लिखाण उपलब्ध नाही.
अल्बिनोनीच्या मृत्यूनंतर त्याचं बरंचसं अप्रकाशित संगीत जर्मनीमधल्या ग्रंथालयात आलं. तिथं ते नीट जतन करून ठेवण्यात आलं. हा काळ सतराव्या शतकातला होता. अल्बिनोनी आणि त्याचं संगीत एक प्रकारे काळाच्या पडद्याआड गेलं.
अल्बिनोनीच्या मृत्यूनंतर जवळपास पुढची दोनशे वर्षे काहीच झालं नाही. इटालियन अभ्यासक जिझोटो यानं 1945 च्या दरम्यान इटलीमधल्या व्हेनिसमधल्या पूर्वीच्या काळच्या हौशी संगीतकारांच्या व्हॉयोलिनच्या संगीतावर एक पुस्तक लिहायला घेतलं. यात इतर संगीतकारांसोबत अल्बिनोनीचाही समावेश होता. अल्बिनोनीच्या आयुष्याचा, त्याच्या संगीताचा जिझोटोनं अभ्यास सुरू केला. त्याला अल्बिनोनीच्या आयुष्यासोबत त्याच्या अप्रकाशित रचनांचाही अभ्यास करायचा होता.
या काळात दुसरं महायुद्ध चालू होतं. अल्बिनोनीचं अप्रकाशित संगीत जर्मनीमधल्या ज्या शहरातल्या ग्रंथालयामध्ये होतं त्या शहरावर ब्रिटिश आणि अमेरिकन वायुसेनेनं 1945 मध्ये बॉम्बवर्षाव केला. दुर्दैवानं या बॉम्बहल्ल्यात त्या ग्रंथालयाचं बरंचसं नुकसान झालं. अल्बिनोनीच्या अप्रकाशित संगीताची हस्तलिखितं या ग्रंथालयात होती. ती सारी हस्तलिखितं या बॉम्बहल्ल्यात उद्ध्वस्त झाली.
नंतरच्या काळात बॉम्बहल्ल्यामुळं उद्ध्वस्त झालेल्या ग्रंथालयाच्या भग्नावशेषांमध्ये जिझोटोनं अल्बिनोनीच्या हस्तलिखितांचे तुकडे शोधायला सुरुवात केली. हे काम सोपं नव्हतं. त्याला एक कागदाचा तुकडा मिळाला. त्यावर संगीताची एक ओळ लिहिली होती. ती अल्बिनोनीची असल्याचं त्यानं ओळखलं. जिझोटो संगीत रचनाही करू शकायचा. त्याचा बरोक कालखंडातल्या संगीत रचनांचा चांगला अभ्यास होता. त्याला सापडलेल्या छोटय़ाशा संगीताच्या तुकडय़ावरून त्यानं बरोक कालखंडातली वाटेल अशी एक संगीत रचना केली. ही एकप्रकारे अल्बिनोनीला त्यानं वाहिलेली आदरांजली होती.
ही रचना आज ‘अल्बिनोनीचा अडाजिओ’ नावानं प्रसिद्ध आहे. प्रत्यक्षात ही रचना ‘अल्बिनोनी-जिझोटो यांचा अडाजिओ’ या नावानं प्रसिद्ध व्हायला हवी होती. पण आयुष्याच्या नंतरच्या काळात जिझोटोनं सारी कहाणी बदलली. अल्बिनोनीच्या रचनेतली ओळ घेऊन त्यानं पूर्ण संगीत रचना केली ही गोष्टच तो आता नाकारू लागला. या रचनेची अमाप लोकप्रियता बघून त्याला आता आर्थिक बाजूची जाणीव झाली होती असं काही जणांना वाटतं. ही रचना पूर्णपणे आपण केल्याचं आणि या रचनेचा अल्बिनोनीशी काही संबंध नसल्याचं आता तो सांगू लागला! तो कागदाचा तुकडा (ज्यावर अल्बिनोनीनं या रचनेचा छोटासा भाग लिहिला होता) कुणालाच दिसला नाही! त्यामुळं या रचनेचं श्रेय नेमपं कुणाला द्यायचं हा नेहमीच वादाचा प्रश्न बनून राहिला.
काही झालं तरी आज ही रचना अल्बिनोनीच्या नावानंच ओळखली जाते. ही रचना इतकी लोकप्रिय का व्हावी हे पाहण्यासाठी आपण यू टय़ूबवर जाऊन एकदा ही रचना ऐकायलाच हवी!
[email protected]































































