अनुबंध : मुखवटा सोलताना

32


>> मलिका अमरशेख

वयानं आणि ज्ञानानं मोठं होता होता भावना खुरटय़ा होऊ लागतात. नव्या क्षितीजांना वाट देताना बरंच काही मागे सरतं. काही मुद्दाम सारलं जातं. पण हा बेगडी मुखवटा कधीतरी गळून पडतोच.

तप्त किरणांचे निखारे आकाशातून उधळणारे… सर्वभर… न् अशात माझ्या आईबापांचे डोळे आषाढघन झालेले. काळय़ाभोर डोळय़ात गच्च पाणी… न् मी पत्थर झालेलो. मला आठवलं नाही वा मी आठवू दिलं नाही की बालवाडीत जाताना मला शाळेच्या दारात सोडताना माझ्यापेक्षा जास्त ते कळवळले होते. आज मी त्यांना आयुष्याच्या शेवटच्या बालवाडीत सोडून जातोय. वृद्धाश्रमात… न् ते खूप मी व्यवहार्य मानतो. त्यांची एकच चूक होती की ते माझे आईबाप होते न् खूप लाडाकोडानं त्यांनी मला कष्टात दिवस काढून, परिणामी स्वतःची स्वप्नं, इच्छा मारून इंग्रजी शाळेत घातलेले. त्याचा खर्च अवाच्यासवा. आईबाप ग्रामीण भागातले शेतकरी. शुद्ध मराठी पण बोलता न येणारे. अर्थात आता शुद्ध मराठी राहिलीच कुठे? ‘यू नो, मला किनई मराठी पिक्चर जाम बोअरिंग…’ असं मराठी! तर म्हणजे गावचं मराठीच शुद्ध प्राकृत म्हणायला हवंय.

तर हळूहळू मला शिंगं फुटली. डब्यात चपाती-भाजी-शेंगदाण्याचा लाडू न्यायची लाज वाटू लागली. फी भरायला आई आलेली नऊवारी लुगडय़ातली मला आवडेना. माझ्या मित्रांच्या आया कशा स्मार्ट-बॉबकटवाल्या. पॅण्टशर्ट, सलवार कमीजवाल्या. त्यांच्या डब्यात सॅण्डविच, बर्गर, चायनीज असलं मला आवडू लागलं. घरी पण अभ्यास करताना मी इंग्र्रजी ज्ञान झाडू लागलो. आईबाबा धन्य होते. आपलं वाणी चिणीचं लेकरू कसं फाडफाड इंग्रजी बोलतंय न् किती हुश्शार आहे हे पाहून बाप मित्रांपुढे, शेजाऱयांपुढे माझं कौतुक करताना थकायचा नाही तर आई दिवसरात्र माझ्या मागेपुढे करायची. चांगलंचुंगलं खाऊपिऊ घालायची. मी बऱयापैकी शेफारलो.

‘‘बाबा, तुला काय कळत नाही. don’t talk with me…’’ बाप गप बसायचा वरमून. आईबाप माझी मर्जी सांभाळायला झटू लागले. माझं मन दुखू नये म्हणून ते माझं बोलणं गपगुमान खाऊ लागले.

पालकांच्या मीटिंगला त्यांना बोलवायला सांगितलं. डॅड पुण्याला बिझनेससाठी गेलेत न् मॉम आजारी आहे असं सांगितलं.

हळूहळू वयानं नाही, पण माझ्याच मस्तवालपणानं आईबाप थकत थकत, मिटत विझत चालले. मी दुर्लक्ष केलं. लवकरच शिक्षण संपलं. व्यवहारचातुर्यामुळे मला नोकरीही मिळाली न् बायकोही. आता आईबापांची गरज संपली होती. मला नवी क्षितिजं खुणावत होती. ‘इंडिया में रखा ही क्या है’ असं मला वाटू लागलेलं, पण आईबाप? त्यांचं काय करायचं? हा मोठा प्रश्न बायकोनेच सोडवला. वृद्धाश्रम कशाला असतात? ठेवू त्यांना तिकडे. मलाही तिचा विचार व्यवहार्य वाटला. यांना साधं मराठी धड बोलता येत नाही. शिवाय राहण्याखाण्याचा खर्च, आजारी पडले तर कोण बघणार? परदेशात डॉक्टरांना दाखवायलाच 50-60 हजार मोजावे लागतात. म्हंजे दोघांना एक-दोन लाख वायाच जाणार. मी त्यांना कल्पना दिली. आई नुस्ती माझ्याकडं बघत राहय़लेली. तिची नजर माझी चामडी सोलत होती. बाप मात्र गप्प, शून्य नजर. जरा वेळाने त्याची नजर हलली. पुतळा होऊन उभ्या राहिलेल्या आईकडे वळला. ‘‘आगं यशवदे, तुझा क्रिष्ण आता फकस्त तुझा नाहीये. त्याला उडू दे. पाखरं पघ ना घरटं बांधत्यात काडी काडी जमवून पिल्लान्ले खाया घालायला सात दिशा धुंडाळतात. चोचीत अनपाणी देत्यात. तीच पाखरं पंख फुटल्यावर उडून जातात. पाखरं मागतात का पिल्लांना की बाबा आता मी थकलोय, बघ आता आम्हाले. नाय ना. आपण पण निसर्गाची लेकरं. चल, मी हाये ना. कुटं का आसना, सुकात असा समदे एवडीच इच्छाय.’’

अचानक आई बापाकडं वळली. लहानपणी चुलीत भाकरी थापताना ती लाकडं जास्त फुकून फुलवायची तेव्हा लाल लाल तेजस्वी ठिणग्या उडत जाळ भडकायचा. आता तोच जाळ न् ठिणग्या तिच्या डोळय़ातून तडातड उडत होत्या.

‘‘काश्याला बाजू घेताय त्येची? दुख हे नाही की तो आपल्याले दूर करून राहय़ला. दुख हे है की त्याले आपली लाज वाटती. फार ना विंग्लिश साळत टाकायचं म्हनताना वरीस वरीस सोताला नवी कापडं ना चांगलचुंगलं खाल्लं पण नाही. निस्तं याच्या साळंची फी भराची म्हनून… न् आता आता याला आयबापाची लाज वाटती. बापाच्या घामाची न् आयच्या मायेची लाज नाही वाटती का रे?

ती कालची आऊ तुला प्यारी झाली का? यस फस करती म्हून? पण खातात ते बरबाट न् रोटीच नं पिता ते पाणीच नं. त्याले नाव काय बी द्या नं, काय फरक पडतुया…’’

‘‘आता बास कर यशवदे – यापुढं एक सबूद बोलू नको. लेकरानं सांगितलंनं का तुला की मला कसंबी करून तुमच्या पोटी यायचं हाय – नाय ना, मंग आता त्याला त्येचं आयुष्य निस्तरू दे.’’

असं म्हणत घरातलं महाभारत-रामायण संपलं आणि आम्ही निघालो. वृद्धाश्रमात जाताना आमचं पाच-सहा वर्षांचं पोर महाइब्लिस इंग्लिशमध्ये Noughty असा फार गुळगुळीत निसरडा फसवा शब्द आहे. ते बरोबर होतंच.

तो आतापर्यंत गप्प होता. त्याला ते अजिबात समजत नाहीये हा आमचा ग्रह होता.

वृद्धाश्रमात फॉर्म, पैसे फॉर्मेलिटीज पुऱया करताना तो बरोबर होता. तो एकटक लक्षपूर्वक बघत होता. त्याचं कुतूहल वाटून क्लार्कनं विचारलं.

‘‘काय रे – एवढं काय बघतोय?’’

‘‘Oh… अब्रॉडला काय माहीत नाही, पण जर उद्या माझ्या मॉम न् डॅडला तिथं नाही आवडलं तर? मग मी मॉम न् डॅडला इथं ठेवू शकतो..! तर मला कळायला नको का हे कसं प्रोसेस असते ते?’’

तो क्लार्क माझ्या चेहऱयाकडे न् मी माझ्या बायकोच्या चेहऱयाकडे बघत राहय़लो, जेव्हा की बाहेर माझे आईबाप पूर्ण पावसाळा डोळय़ात घेऊन बाहेर उन्हात उभे होते!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या