
>> नीती मेहेंदळे
एक साहस हातात घ्यावं आणि चाफ्याने अचानक सोबत करत ते सोपं करावं हा शिरस्ताच. त्याच्याशी जडलेला हा ऋणानुबंधआयुष्यभर सोबत करणारा ठरला… हा केवळ सोबतीचा प्रवास नव्हता तर ती होती आठवणींची पखरण…
पहाटेची वेळ. नुकती जाणवू लागलेली गुलाबी थंडी वगैरे. म्हणून फिरायला आपण बाहेर पडलेलो. एका 30-40 फुटी का काय अशा मोठय़ाशा रस्त्याला आपण लागतो आणि बारीक सारीक गल्ल्या शेजारी आपोआप उमटत जातात. एकेका गल्लीत डोकावून बघायचं दिसतोय का एखादा चाफा डवरलेला. मग साळसुदासारखं शिरायचं तिथे आणि नेमकी पावलं मोजून बरोब्बर थडकायचं ते थेट जमिनीला नुकतीच मिठी मारायला आलेल्या नवजात फुलाशी. त्या अर्ध्या उमलत्या नाजूक फुलाला अलगद घ्यायचं आपल्या तळहातावर. गोंजारायचं जरा आणि नाकाचं टोक पाकळ्या हळूच सारत घुसवायचं त्याच्या गूढ गर्भापर्यंत. ते फुलातलं पिवळंधम्मक बिंब निरखत खोल हुंगायचं. डोळे मिटले की, यापुढे माझा एकटीचा प्रवास सुरू होतो. काय करू! त्याला कारणंच तशी आहेत.
चाफ्याचा गंधच मुळात मला आठवण करून देतो एकेका साहसाची. त्याचं नातं मग आपोआप जोडलं गेलंय ते साहस आणि पराक्रमांशी.
काही मोजके चिमुरडे फ्रॉक आणि काही त्याच वयाच्या अर्ध्या विजारी आजोबांचा पांढराशुभ्र लेंगा पकडून रस्ता ओलांडत असतात. हळूहळू गर्दी विरळ होत तुरळक होत जाते आणि आत्तापर्यंत आजीच्या गोष्टीत ऐकलेलं घनदाट अस्सं जंगल समोर येतं. गच्च हिरवी झाडी, दाटीवाटीने कैऱयांनी सज्ज अशा आमराया, अपुरा होत गेलेला सूर्यप्रकाश, सगळं साहसी वातावरण. आनंद आणि थोडी भीतीवजा उत्सुकता अशी संमिश्र एक फ्रॉकवाली आजोबांकडे उंच बघते आणि मग त्यांच्यासारखीच बिनघोर रस्ता तुडवू लागते. आता फक्त घनं अरण्य आणि गावठी पायवाटाच.
आजोबा आपण बरोबर चाललोय ना?
हो, अगं माझा रोजचा फिरायचा रस्ता आहे हा.
असं म्हटल्यावर डोळे विस्फारून ती मुलं आजोबांच्या साहसाला दाद देतात. छोटंसं गावदेवीचं देऊळ या जंगलात लपलेलं. टुमदार बांधून काढलेलं… कौलारू छप्पर, छोटा हॅण्डपंप, समोरच अंगणात चाफा फुलं सांडून बसलेला, देवळामागची लहानशी सुबक बाग आणि हिरवळ… सगळ्या पायपिटीचा शीण या सगळ्या हव्याशा वातावरणाने कुठच्या कुठे जातो. आज भले तिथे सडक बांधलीय, रस्त्याला दिवे लागलेत, वाहनांची वर्दळ असते.
पण 40 वर्षांपूर्वी ते साहसी ठिकणातच मोडायचं आणि चाफ्याची ती अवचित गवसलेली चाहूल त्या माझ्या मनाला वाटणाऱया साहसाला नकळत स्पर्शून गेली. मग जाणवत राहिली नेहमीच.
एप्रिल-मेचं रणरणतं ऊन. एक जगावेगळे डोंगर किल्ले चढाई उतराई करायचे डोहाळे लागलेली तरुण आई आणि ते साहसी डोहाळे पूर्ण करायला मदत करणारा अजब बाप शिवनेरीच्या पायथ्याशी येऊन घामाघूम पोचलेले. तशा फारशा नसल्या तरी अंगावर येणाऱया त्या काळ्या दगडी पायऱया बघत ती एकदा त्याच्याकडे पाहते. किंचित कपाळावर आठी क्षणभर आणत तोही तिच्याकडे पाहतो. पण तिची दीड अवस्था बघून त्याला तिची काळजी जास्त आणि तेवढंच कौतुक वाटतं.
चला, म्हणत तिला तो चढायला सांगतो. 15 एक पायऱया झाल्यावर उजव्या बाजूस एका पुरातन देवळाकडे जाणाऱया पायवाटेकडे ती बघत राहते. त्याचा हात ओढून ती बोट दाखवते. चाफ्याची पिवळी पांढरी फुलं सतत त्या वाटेवर वर्षाव करत असतात. मागे एक मध्यम दगडी देऊळ पायऱया अंगणात टाकून वाट पाहात असतं. एखाद्या चित्रपटाचं चित्रीकरण चालू असावं असा सगळा थाट. ती चप्पल उतरवत मग त्याचा हात हातात घेऊन त्या मखमली सुगंधी पायघडय़ांवर चालू लागते. बघ लग्नापेक्षा भारी झालं न हे काम!
तो नाटकी मुजरा करतो आणि दोघे खळखळून हसत देवळाशी येतात. इतक्या उन्हाच्या काहिलीत हे सगळं थंडगार कोणी करून टाकलं? असा विचार करत ती पहिल्या पायरीखालच्या ओलसर मातीत पावलं उमटवते. मागे वळून पाहते तो एव्हाना पूर्ण आवार चाफ्यांनी झाकून गेलेलं. प्रसन्न मनाने ती देवळात शिरते. देवळात भक्तिभाव ओसंडून वाहतोय नुसता. जिथे तिथे सुंदर छोटे छोटे विविध पाळणे बांधलेले. देवीच्या पायावर डोकं ठेवत तिचा बांध कोसळतो. पुजारी तिला प्रसाद देतो आणि बायकोला खूण करतो.
तिची विचारपूस होते, काय गं पोरी, पहिलटकरीण हायस? कोण सोबत हाय का न्हाई? बरी उन्हाची आलीस गं. देवी नवसाला पावते बरं! शिवाई देवी तुझ्या पोटी शिवबा आणलं सांगते मी. ती नमस्कार करून बाहेर येते आणि कृतकृत्य होऊन हात जोडत त्याच्यासमोर उभी राहते. तिच्या हातांवर हात ठेवत तिला धरून तो बाहेर घेऊन येतो. लांबवर पाहत म्हणतो, जिजा, राहशील ना या मुलखात एकटी बाळराजांना संभाळून?
ती तितकीच तत्पर उत्तरते, व्हय जी. हिथं मज्जेत ऱहाईन मी. तर तर!
त्यांच्या स्वप्नाळू हास्यविनोदात भर दुपारी चाफ्यात बर्फ पडल्याचा गारवा पसरतो.
एक साहस हातात घ्यावं आणि चाफ्याने अचानक सोबत करत ते सोपं करावं हा शिरस्ताच होऊन गेला पुढे पुढे. त्याचा हा साहसी ऋणानुबंध फार जुना, माझ्या आयुष्याला समांतर राहिलेला. मनात कायम आठवणींची पखरण घालून सजलेला…





























































