
>> प्रशांत गौतम
परभणीतील साहित्यिक कार्यकर्ते देविदासराव कुलकर्णी म्हणजे साहित्य चळवळीतील एक धडाकेबाज मात्र तेवढेच प्रसिद्धी पराङमुख व्यक्तिमत्त्व. परभणीला संमेलननगरी अशी ओळख त्यांनी करून दिली होती. साहित्य, कला, संस्कृती या चळवळींना गतिमान करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान कुणीही विसरणार नाही. त्यांच्या निधनाने या चळवळीची अमरिमित हानी झाली आहे. सततची उपक्रमशीलता, संवाद आणि संवाद साधण्याची विलक्षण हातोटी, सर्वांशी असलेला स्नेह आणि वाङ्मय कला, संस्कृतीवर असलेली निष्ठा या गुणविशेषांमुळे त्यांचा नावलौकिक सर्वदूर पसरला होता. स्वतः लेखक/ कवी असून, त्याचा बडेजाव त्यांनी कधी मिरवला नाही. व्यासपीठावर पुढे पुढे करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. देविदासराव म्हणजे संमेलनाच्या मंडपात अहोरात्र काम करणारा. पु.लं.च्या भाषेत सांगायचे तर नारायण होता, जो जो त्यांच्या सहवासात आला तो त्यांचाच होऊन गेला. परभणी आणि साहित्य संमेलन असे जणू समीकरणच बनले होते. एखाद्या साहित्य संमेलनाचे आयोजन कसे नीटनेटके करावे, याचा उत्तम परिपाठ म्हणजे देविदासभाऊ.
संमेलनाच्या स्मरणिकेचे नियोजन करताना काय काय साहित्य असावे, त्याचे साक्षेपी संपादन कसे असावे याचे उदाहरण म्हणजे देविदासराव. परभणीत अ.भा. मराठी साहित्य संमेलन, नाटय़, संगीत, दलित आणि बालकुमार, स्त्र्ााr साहित्य आणि मराठवाडा साहित्य संमेलनाचे कमालीचे यशस्वी आयोजन करण्यात, संमेलनांना वाङ्मयीन उंची प्राप्त करून देण्यात देविदासरावांचा सिंहाचा वाटा होता. संमेलनाचे नाव काढताच पहिले नाव अर्थात त्यांचेच समोर येत असे. संमेलनाच्या नांदीपासून ते सूप वाजण्यापर्यंत देविदासभाऊ उदंड उत्साहाने कामाला लागायचे आणि कामाला लावायचेदेखील.
देविदासराव मराठवाडा ग्रामीण बँकेत व्यवस्थापक पदावरील अधिकारी हेते. अर्थव्यवहारात रूक्ष आकडेवारी करण्याचे त्यांचे कार्यक्षेत्र असले तरी साहित्य चळवळीतून मिळणाऱया ऊर्जेमुळे सतत उपक्रमशील असायचे. शिवाय मराठवाडा साहित्य परिषदेत त्यांनी तीस-चाळीस वर्षे आधी कार्यकर्ता म्हणून, नंतर कार्यवाह व अलिकडच्या काळात कोषाध्यक्ष म्हणून आपली वाङ्मयीन भूमिका बजावली, एवढेच नाही तर साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या ‘प्रतिष्ठान’च्या संपादन कार्यात त्यांचा सतत सहभाग राहिलेला आहे. बँकेतील नोकरीत रुजू होताच, त्यांनी विविध ग्रामीण साहित्य संमेलनांच्या आयोजनावर भर दिला. छोटय़ा छोटय़ा साहित्य मेळाव्याच्या आयोजनातून ते तीस चाळीस वर्षांपूर्वी मराठवाडा साहित्य परिषदेशी जोडले गेले. त्यांच्या कार्याची दखल घेत साहित्य महामंडळावर कार्य करण्याची संधी मिळाली. साहित्य संमेलनास थेट ग्रामीण भागात घेऊन जाण्याचे श्रेय देविदासरावांकडेच जाते.
साहित्य हा देविदासरावांचा श्वास होता आणि संमेलन हा ध्यास होता. त्यानुसार ते आपल्या कामात व्यस्त असत. 1994 च्या सुमारास त्यांनी स्त्र्ााr साहित्य मेळावा घेतला होता. याच दरम्यान पेडगाव येथे 16 वे मराठवाडा साहित्य संमेलन डॉ. यू. म. पठाण यांच्या अध्यक्षतेखाली जोरदार यशस्वी झाले. त्यातूनच देविदासरावांना परभणीत 68 वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन घेण्याची प्रेरणा मिळाली. 1995 साली ते झाले. त्यानंतर 2000 च्या सुमारास 80 वे अ.भा. मराठी नाटय़संमेलन ‘वऱहाड’कार डॉ. लक्ष्मण देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली दणक्यात झाले.
परभणीतील तरुण साहित्य मंडळाचे अध्यक्ष, बी. रघुनाथ स्मारक समितीचे प्रमुख कार्यवाह, बी. रघुनाथ साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष, गावकरी वाचनालय बाभळगावचे अध्यक्ष, कल्पक संमेलन सुकाणू समितीचे अध्यक्षपद देविदासरावांनी भूषवले. देविदासराव जसे साधे कपडे वापरत तसेच त्यांचे वागणे नि बोलणेही होते. अर्थात साहित्य संमेलन चळवळीत कार्य करीत असताना त्यांच्यातील लेखक आणि कवी मात्र फार प्रकाशझोतात येऊ शकला नाही. कारण प्रसिद्धीपासून दूर राहणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांची वैयक्तिक साहित्य संपदा सांगायची तर एक कथासंग्रह,रानशिन्या, एक कवितासंग्रह ‘संदर्भ तुझे डोळे’, एक संपादन, ‘परभणी जिल्हय़ाची कविता’, एक पुरस्कार बस्स एवढेच. साहित्य चळवळीत एवढय़ा नितळ मनाने, पारदर्शीपणाने काम करणाऱया मोजक्या सच्च्या उपासकांत देविदासरावांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.





























































