आपला माणूस – कलायात्री!

>> प्रा. गजानन सीताराम शेपाळ

‘कला शिक्षणात विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट वाढेल’ अशा स्वाध्यायिकांचे नियोजन केल्यास विद्यार्थ्यांची कलेविषयक आवड वाढेल असे दीक्षित सर नेहमी सांगायचे. कलाध्यापक हा दीन होत चाललाय. मला तर हा ‘शिक्षक दिन’ फार नाराज करतो, कारण आमचे खूप प्रश्न प्रलंबितच राहिले आहेत, अशीही खंत ते व्यक्त करीत. अशा या ‘कलायात्री’ने 4 सप्टेंबरला म्हणजे शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला आपली कलायात्रा संपवावी हा कोणता योगायोग म्हणायचा?

प्रा. रवींद्र दीक्षित सर यांचे कोरोनामुळे अचानकरीत्या निधन होणे, या दुःखद घटनेवर विश्वासच बसत नव्हता. दुर्दैवाने, ऋद्धी सरांची कन्या यांनी सदर दुःखद वृत्त सत्य आहे हे सांगितल्यावर सारेच थिजले. सुमारे चाळीस वर्षांतील कलाध्यापनाचा पट भूतकाळात घेऊन गेला. जे. जे.मध्ये 40 वर्षांपूर्वी जीडी आर्ट ही पदविका मिळविल्यानंतर सरांनी सर ज.जी. उपयोजित कला महाविद्यालयात सहाय्यक अधिव्याख्याता, अधिव्याख्याता आणि सेवानिवृत्तीच्या अगदी अखेरच्या काही महिन्यांमध्ये व्याख्याता म्हणून शासन सेवा केली.

त्यांच्या एकूण 40 वर्षांच्या कलाध्यापनात जाने. 1968 ते जाने. 2000 या प्रदीर्घ काळाची म्हणजे तब्बल 32 वर्षे 1 महिन्याची सेवा त्यांनी शासनाच्या कला महाविद्यालयांना दिली. मुंबईतील सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालय, संभाजीनगरचे शासकीय कला महाविद्यालय आणि नागपूरचे शासकीय चित्रकला महाविद्यालय या तीनही ठिकाणी दीक्षित सरांनी कलाध्यापन केले. याशिवाय महाराष्ट्रातील बऱयाच कला महाविद्यालयांना त्यांनी कलाध्यापन आणि व्याख्याने दिली. एनआयडी अहमदाबाद आणि बडोद्याच्या महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीलाही त्यांच्या कलाध्यापनाचा लाभ झाला. मुंबई, नागपूर आणि संभाजीनगर येथील विद्यापीठांमध्ये त्यांनी ‘पेपर सेटर’, ‘पेपर चेकर’ आणि ‘परीक्षक’ म्हणून काम केले. 2000 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर तब्बल 20 वर्षे त्यांनी देश-विदेशातही कलापर्यटन केले. त्यांना विद्यार्थी घडविण्याचीच आवड होती. सतत नावीन्यांसह सुलभ आणि सोप्या वाटणाऱया कलाध्यापन पद्धती त्यांनी शोधल्या. त्यामुळे अवघड वाटणारे रंगलेपन किंवा रेखांकन त्यांनी फार सोपे करून सांगितले. उत्कृष्ट शिक्षक हा उत्कृष्ट प्रात्यक्षिक करून दाखवेलच असे नसते. मात्र दीक्षित सरांच्या बाबतीत ते अपवाद होते. ते फार स्पष्ट आणि विद्यार्थी, विद्यार्थिनींना लगेच आकलन होईल अशा शब्दांत कलाविषयक विचार मांडायचे त्याचवेळी त्यांच्या दणकट मोठय़ा हातातील डबल झीरो नंबरच्या ब्रशने वा एखाद्या 6 बी नंबरच्या सॉफ्ट पेन्सिलीच्या टोकाने, कागदावर रेखांकन, आकार घेत असे!

एखाद्या गायकाने गायनाबरोबरच हार्मोनियम वा तबला साथीला घेऊन सूर-स्वरसाजांनी मैफलीला रंगत आणावी असं सरांचं प्रात्यक्षिक असायचं. थेट शब्दांत वर्णन आणि अचूक हावभाव पकडून केलेलं रेखांकन पाहताना कला विद्यार्थी थक्क होऊन, भान हरखून पाहतच बसायचे. गायकाच्या आलाप-तानांच्या स्वर-सूर मेळय़ात समेवर आल्यावर जशा-श्रोत्यांच्या-कानसेनांच्या टाळय़ा तो गायक वसूलच करतो, इकडे दीक्षित सरांच्या प्रात्यक्षिकाच्या वेळीही विद्यार्थी टाळय़ा वाजवून दाद द्यायचे.

‘टायपोग्राफी’ हा विषय शिकविताना, ‘टाइम्स रोमन’ या नावाच्या इंग्रजी अल्फाबेटस्मध्ये ‘ए’ टू ‘झेड’ या अक्षरांच्या वळणांचा आकार एका विशिष्ट ‘ग्रीड’ वा ‘साच्या’मध्ये अत्यंत शास्त्र्ाशुद्ध रीतीने बसविलेला असतो. हे जेव्हा दीक्षित सर बोर्डवर प्रत्येक अक्षर, त्याची जाड-पातळ वळणे, रेषा अशा, वक्र रेषा, वर्तुळाकार रेषा अशा सर्वच प्रकारच्या रेषांचं अस्तित्व त्या आलेखावर कसं निश्चित ठरतं हे ते फळय़ावर दाखवायचे. आजचे काही कलाध्यापक या पद्धतीला ‘कालबाहय़ कला पद्धती’ म्हणतात; परंतु ज्याला ही कंपनी कालबाहय़ म्हणते त्याच पद्धतीतून ‘टायपोग्राफी’ शिकलेले त्यांचे विद्यार्थी जगभर आहेत.

एकदा तर स्टुडिओच्या वर्गात ते सेवानिवृत्त झाल्यानंतर मी त्यांना ‘डेमॉन्स्ट्रेशन’साठी बोलावले होते. तेव्हा स्टुडिओचे प्रमुख प्रा. जी. ए. दांडेकर होते. ते ऍब्स्ट्रक शैलीचे पुरस्कर्ते होते. दीक्षित सरांचे अत्यंत प्रभावी वास्तववादी रेखांकन पाहून सर्व विद्यार्थी रवींद्र दीक्षित सरांकडे आकर्षिले गेले. दांडेकर सर खूप खूश झाले. त्यांना वास्तववादी शैलीचं महत्त्व पटलेलं होतं. त्या दिवशी दीक्षित सरांनी एक स्केच करताना समोरच्या ड्रॉइंग पेपरवर ‘मॉडेल’कडे पाहत-पाहत रेखांकनाला सुरुवात केली. जेथून पेन्सिलीचे टोक रेखांकनासाठी कागदावर टेकवले होते, तब्बल 20-25 मिनिटांपर्यंत म्हणजे समोरच्या मॉडेलचे रेखांकन पूर्ण होईपर्यंत पेन्सिल त्यांनी उचलली नाही आणि जेथून रेखांकनास सुरुवात केली होती त्याच जागी आणून त्यांनी पेन्सिल आणून उचलली. आम्ही सारे थक्क झालो होतो.

‘कला शिक्षणात विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट वाढेल’ अशा स्वाध्यायिकांचे नियोजन केल्यास विद्यार्थ्यांची कलेविषयक आवड वाढेल असं ते नेहमी सांगायचे. शिक्षक दिनाच्या 5 सप्टेंबरला मागच्या वर्षी मला ते म्हणाले होते, कलाध्यापक हा दीन होत चाललाय. मला तर हा ‘शिक्षक दिन’ फार नाराज करतो. कारण आमचे खूप प्रश्न प्रलंबितच राहिले आहेत, अशीही खंत ते व्यक्त करीत. अशा या ‘कलायात्री’ने 4 सप्टेंबरला म्हणजे शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला आपली कलायात्रा संपवावी हा कोणता योगयोग म्हणायचा?

z [email protected]
(लेखक सर ज.जी. उपयोजित कला महाविद्यालय, मुंबई येथे प्राध्यापक आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या