सिनेमा – चित्रपटातील माझा देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. अनिल कवठेकर

मनमोहन देसाई यांचा ‘देशप्रेमी’सारखा युद्धपट म्हणजे आपल्या हिंदुस्थानी सैन्यांच्या शौर्याची गाथाच आणि या गाथा सदैव आपल्याला देशभक्तीची प्रेरणा देत असतात.

चित्रपटातील गाणी आपल्याला जगण्याचं भान तर देतच असतातच; पण त्यासोबत आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीमधील अनेक सणांना ते अधिक सुंदर करतात. देशप्रेमाची भावना काही क्षणांमध्ये आपल्या मनात निर्माण करतात. अशी त्या गाण्यांची द्विमितीय प्रभावी प्रतिमा आहे. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की, चित्रपटाचा समाजावर परिणाम होतो.

चित्रपट आपल्याला देशभक्त बनवतात, देशप्रेमी बनवतात. ‘बॉर्डर’सारखा एखादा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांना सैन्यांमध्ये भरती व्हावंसं वाटतं. म्हणजेच देशातील नागरिकांनी सैन्यामध्ये भरती व्हावं म्हणून परदेशामध्ये काही डॉक्युमेंटरी केल्या जातात आणि त्या डॉक्युमेंटरी पाहिल्यानंतर नागरिकांच्या मनामध्ये देशप्रेमाची भावना जागृत होते आणि ते सैन्यामध्ये भरती होतात; पण आपल्याकडे अनेकदा अनेक युद्धपटांमुळे सैन्यामध्ये तरुणांनी भरती व्हायचं प्रमाण वाढलेलं आहे. इतपं चांगलं काम या युद्धपटांनी केलेलं आहे. काही युद्धपट म्हणजे आपल्या हिंदुस्थानी सैन्यांच्या शौर्याची गाथा असतात आणि या गाथा सदैव आपल्याला प्रेरणा देत असतात. त्यामुळे सण आल्यानंतर जशी सणाची गाणी सर्वत्र ऐकू येतात, तसे आपले राष्ट्रीय सण म्हणजे स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आल्यानंतरही आपल्या कानावर राष्ट्रीय गाणी अर्थात राष्ट्रभक्तिपर, देशभक्तिपर गाणी त्या कालावधीमध्ये ऐकायला मिळतात.

26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन आणि यानिमित्ताने दिल्लीला होणारे सैनिकांचे संचलन, आपल्या देशातील प्रत्येक राज्याच्या विविधतेचे अत्यंत सौंदर्यपूर्ण रीतीने मांडलेले चलचित्र आणि त्याचे रथ, आपल्या देशाने विविध क्षेत्रांत केलेली प्रगती हे सगळं ज्यांना प्रत्यक्षपणे पाहता येत नाही, त्यांना अशा गाण्यांतून ते पाहता येतं आणि तो अनुभव घेता येतो.

मनमोहन देसाई यांचा 1982 साली आलेला चित्रपट होता ‘देशप्रेमी’. गीतकार होते आनंद बक्षी आणि संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल…नायक होता अमिताभ बच्चन.

या चित्रपटातील एका दृश्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई यांच्यात कोणत्या तरी कारणावरून भांडण चाललेले आहे आणि त्या भांडणाचे परिवर्तन एकमेकांना मारण्यामध्ये सुरू आहे. अशा वेळी अमिताभ बच्चन तिथे येऊन त्यांना गाण्यामधून समजावून सांगतो. ते हे विचार करायला लावणारे अप्रतिम असे गीत म्हणजे…

‘नफरत की लाठी छोडो
लालच का खंजर फेको
जिद के पीछे मत दौडो
तुम प्रेम के पंछी हो
देशप्रेमीयों, आपस मे प्रेम करो
मेरे देशप्रेमीयों…’

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने चित्रपटावरचा लेख लिहिताना माझ्या मनात अशी एक भावना आली की, चित्रपटात जी परिस्थिती दाखवलेली आहे आणि ज्या परिस्थितीकरिता हे गाणे लिहिलेले आहे. ती परिस्थिती आज आपल्या देशात निर्माण झालेली आहे की काय? अनेक वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत, एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होत, एकमेकांच्या सुखदुःखांत सहभागी होणारे, ओळखीचा असो की ओळखीचा नसो, अगदी कुणालाही रक्ताची गरज पडली तर जात, धर्म, पंथ यांचा भेद न पाहता एकमेकांना रक्त देणारे आपण आज अशी कोणती परिस्थिती झालेली आहे की, आपण एकमेकांचे रक्त सांडायला तयार झालेलो आहोत? हे गाणं त्यांना सांगण्याची वेळ आलेली आहे. अरे बाबांनो, तुमच्या मनात ही नफरत, हा तिरस्कार, ही तिरस्काराची अत्यंत तीव्र भावना इतक्या प्रखरपणे कुठून आली? ज्यामुळे तुम्ही ज्या देशांमध्ये अत्यंत प्रेमाने, बंधुभावाने राहत होता, तिथे तुम्ही एकमेकांविरुद्ध लढायला तयार झालेले आहात. हा स्वार्थाचा खंजीर तुमच्या हातामध्ये कसा आला? कोणी तुम्हाला प्रवृत्त केलं तो खंजीर हातामध्ये घेण्यासाठी? फेकून द्या तो. कारण हा देशप्रेमाची भाषा बोलणारा देश आहे.

गाण्याच्या पुढच्या ओळी खूपच अर्थपूर्ण आहेत, म्हणजे गाणं असा विचार करायला लावते, परिस्थितीशी समरस व्हायला लावते, संदर्भ जोडायला भाग पाडते आणि विचार येतो, इतपं सगळं सुंदर असताना हे असं का होतंय?

मीठे पानी मे
ये जहर ना तुम घोलो
जब भी कुछ बोलो
ये सोच के तुम बोलो
भर जाता है गहरा घाव
जो बनता है गोली से
पर वो घाव नही भरता
जो बना हो कडवी बोली से
दो मीठे बोल कहो

या देशाच्या वाहणाऱया नद्यांमधून प्रेमाचं, सद्भावनेच पाणी वाहत होतं. अशा या गोड पाण्यामध्ये विष कालवण्याचं काम तुम्ही करू नका हे पण आपल्याला सांगायला हवं. या विष कालवणाऱया माणसांना या देशाच्या सांस्कृतिक सौंदर्याचे सत्य सांगण्याचा प्रयत्न केला किंवा सांगण्याची हिंमतही केली तर सांगणाराच बदनाम होतो अशी परिस्थिती आहे. कारण विष कालवणाऱयांचं प्रमाण जरी कमी असलं तरी त्यांना घाबरणाऱयांचं प्रमाण मात्र जास्त आहे.

गाणं अगदी स्पष्ट शब्दांत सांगते की, एखादी जखम जर खोलवर असेल, जी बंदुकीच्या गोळीने झालेली असेल तीसुद्धा कालांतराने भरून जाते; पण कोणाचं मन जर आपल्या कडवट शब्दांनी दुखावलं गेलं असेल तर त्या मनाला झालेली जखम मात्र आयुष्यभर तशीच राहते.

पुढच्या कडव्यात आपण का भांडू नये हे सांगताना गीतकार म्हणतो…

देखो ये धरती हम सबकी माता है
सोचो आपस मे क्या अपना नाता है
हम आपस मे लड बैठे तो
देश को कोन संभालेगा
कोई बाहरवाला अपने
घर से हमे निकालेगा
दिवानो होश करो

मित्रांनो, जर धरणीच आपली माता आहे. ही मातृभूमीच आपल्या सगळ्यांची आई आहे, तर आपलं वेगळं नातं सांगण्याची आवश्यकता नाहीये. आपण सगळी एकमेकांची भावंडेच आहोत आणि भावंडे जर अशी एकमेकांशी भांडत बसली तर आपल्या देशामध्ये असणाऱया परकीय शक्तीच आपल्याला इथून घालवून टाकतील आणि म्हणून वेळेवर जागं होणं फार महत्त्वाचं आहे.

या ओळींना समांतर अशा केशवसुतांच्या कवितेच्या ओळी मला आठवतात.

नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे
कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे
ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा
तेच पतित की जे आखडीती प्रदेश साकल्याचा

केशवसुतांच्या कवितेमधील हा ‘नवा शिपाई’ प्रत्येक घरात निर्माण व्हायला हवा. त्यासाठी ही कविता पुन्हा लिहिण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.

या गीताच्या शेवटच्या कडव्यात गीतकार जे म्हणतात ते विचार करण्यासारखं आहे…

तोडो दिवारो ये चार दिशाओं की
रोको मत राहे इन मस्त हवाओं की
पूरब पश्चिम उत्तर दक्षिणवालों मेरा मतलब है
इस माटी से पूछो
क्या भाषा क्या इसका मजहब है
फिर मुझसे बात करो
मेरे देशप्रेमीयों…

आपल्या देशात येणाऱया विज्ञानाच्या, तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या वाऱयाला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. याउलट त्या विचारांना अडथळा आणणाऱया ज्या विचारांच्या भिंती तुमच्या मनामध्ये असतील त्या तुम्ही स्वतःहून तोडून टाका. कारण देशाला आपल्याला प्रगतीच्या पथावर घेऊन जायचं आहे. जातीजातीत आणि धर्माधर्मात जर आपण भांडत बसलो तर आपण प्रगतीच्या उंचीवर पोहोचणार कसे? अरे, या मातीला जर विचारलं तर ही माती सांगेल की, तिचा धर्म, तिची भाषा. कारण मातीला श्रेष्ठत्व नसतं. त्या मातीमध्ये निर्माण झालेल्या वीर, विचारवंत, तत्त्वज्ञानी आणि संतमहात्मे, समाजसेवक यांच्या कार्यकर्तृत्वामुळे त्या मातीला श्रेष्ठत्व प्राप्त होते.

चित्रपटातील काळाला वर्तमानकाळात घेऊन येणारं हे गाणं आपल्या सगळ्यांना विचार करायला लावणारं आहे. ती ताकद चित्रपटांच्या गाण्याची आहे. म्हणून गाणी ही केवळ मनोरंजनासाठी नसतात, तर ती बुद्धीला विचारांचं अंजनसुद्धा देतात.
शेवटी राज कपूर यांच्या गाण्यांचा संदर्भ घेऊन हा लेख संपवतो. राज कपूर आपल्या ‘जिस देश में गंगा बहती है’ या चित्रपटात म्हणतात…

‘होठो पे सच्चाई रहती है
जहां दिल मे सफाई रहती है
हम उस देश के वासी है
जिस देश मे गंगा बहती है’

गंगेच्या शुद्ध, पवित्र, निर्मळ पाण्यासारखा हा आपला देश आहे आणि त्याला तसाच ठेवण्याचा आपण सगळे मिळून प्रयत्न करू या.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)