सिनेमा : पठाण द स्पाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. अनिल कवठेकर

‘पठाण’ या चित्रपटात तसे नवीन काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला तर ज्यांनी हॉलीवूडचे चित्रपट पाहिलेले आहेत त्यांच्या लक्षात लगेच येते की, वेगवेगळ्या अॅक्शन चित्रपटात येऊन गेलेली सगळी अॅक्शन दृश्ये ‘पठाण’ चित्रपटात एकत्रित आणून दिग्दर्शकाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

इतिहास केवळ देशाला नसतो तर तो चित्रपटालाही असतो आणि चित्रपटांचा इतिहास जेव्हा अभ्यासला जातो तेव्हा त्यामध्ये कोणकोणत्या विषयांवरील चित्रपटांची निर्मिती झाली याचा विचार केला जातो. बॉलीवूडच्या चित्रपटांचा विचार करताना प्रामुख्याने जाणवते की, प्रेमकथेवर आधारित चित्रपटांची निर्मिती सर्वाधिक होताना दिसते. त्यानंतर भयकथा, विनोदी, सस्पेन्स -थ्रिलर यांची होताना दिसते. सगळ्यात कमी चित्रपटाची निर्मिती आपल्याकडे स्पाय मूव्हीजची झालेली आहे. मात्र आपल्या देशातील प्रेक्षकांना परदेशातील स्पाय मूव्हीज प्रचंड आवडतात. याचा अर्थ असा की, आपल्या देशातल्या सिनेरसिकांना त्यांना आवडतील अशा प्रकारच्या स्पाय मूव्हीज बनवणे इथल्या निर्मात्यांना परवडत नाही किंवा तशा प्रकारचे दिग्दर्शन करण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. बॉलीवूडमध्ये झालेल्या काही प्रमुख स्पाय चित्रपटांची नावे मला आठवतात, त्यामध्ये जितेंद्रचा ‘फर्ज’, महेंद्र संधू याचा 77 साली आलेला ‘एजंट विनोद’ आणि त्यानंतर पुन्हा त्याच नावाने सैफ अली खानचा 2012 मध्ये आलेला ‘एजंट विनोद.’ म्हणजे आपण जेव्हा स्पाय चित्रपटांचा विचार करतो तेव्हा त्या चित्रपटांची एक मालिका आपल्या समोर येते. जसे जेम्स बॉण्डच्या चित्रपटाचे आत्तापर्यंत 25 च्या वर भाग आलेले आहेत आणि त्या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर उत्तम बिझनेस केलेला आहे.

ज्याला खऱ्या अर्थाने द स्पाय मूव्ही म्हणता येईल असा 1979 साली आलेला ‘सुरक्षा’ हा मिथुन पावर्तीचा चित्रपट आणि त्याच मालिकेतला दुसरा ‘वारदात.’ पुढे 2012 ला सलमान खानचा ‘एक था टायगर’ आला आणि त्याचा पुढचा भाग 2017 आला ‘टायगर जिंदा है’ आणि त्याचा तिसरा भाग आता पुन्हा येत आहे.

सध्या शाहरुख खानची रोमँटिक हिरो म्हणून असलेली इमेज पूर्णपणे संपलेली आहे. अशा वेळी एका चांगल्या कथेची अन् एका चांगल्या भूमिकेची शाहरुख खानला गरज होती आणि म्हणून ‘द स्पाय पठाण’ आपल्यासमोर आला. पठाणमध्ये वेगवेगळ्या अॅक्शन चित्रपटात येऊन गेलेली सगळी अॅक्शन दृश्ये एकत्रित आणून दिग्दर्शकाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. जेम्स बॉण्डच्या ‘डाय अनादर डे’मध्ये स्फोट झालेल्या विमानातून हेलिकॉप्टर घेऊन जेम्स बॉण्डचे बाहेर पडणे, गोठलेल्या तलावावर कार पाठलगाचा सीन, सिक्रेट एजंटची बॉस महिला असणे या सर्व बाबी जेम्स बॉण्डच्या चित्रपटातून घेतलेल्या आहेत इतके त्यात साम्य वाटते. अॅक्शनदृश्य करताना चित्रपटातील नायकाने थोडीफार रिस्क घ्यायला हवी. सगळेच व्हीएफएक्सच्या माध्यमातून झाले तर त्याला चित्रपट म्हणण्यापेक्षा त्याला अॅक्शन गेम म्हणता येईल आणि बऱ्याच अंशी या चित्रपटाच्या बाबतीत तसेच झालेले आढळते.

जेम्स बॉण्डसच्या स्पर्धेत स्पाय म्हणून अवतरताना टॉम ाtढजने स्वतला ज्या पद्धतीने घडवले ते पाहण्यासारखे आहे. दोघेही स्पाय आहेत, पण दोघांचीही इमेज वेगळी आहे. दोघांचीही स्टाईल वेगळी आहे. टॉम ाtढजचा स्वतचा एक जबरदस्त प्रेक्षक वर्ग संपूर्ण जगामध्ये आहे. यासाठीचे कसब आणि हिंमत आपल्याकडील नायकांमध्ये नसल्यामुळे त्यांच्या चित्रपटात तो थरार कुठेही जाणवत नाही.

बुर्ज खलिफासारख्या जगातील सर्वात उंच इमारतीवर शूट करणारा टॉम क्रूज, विमानाच्या बाहेर स्वतला ठेवून शूट करणारा टॉम क्रूज किंवा आत्ता त्याच्या नव्या ‘डेड रेकनिंग’ या चित्रपटात अत्यंत उंच डोंगरावरून मोटरसायकलवरून उडी मारणारा टॉम क्रूज… हा सगळा टॉम क्रूजचा प्रवास पाहिल्यानंतर त्याच्या आसपास जाणारा स्पाय म्हणून काम करणारा एकही अभिनेता उपलब्ध नाही, असेच खेदाने म्हणावे लागेल. मोटारसायकल क्रॉस जंपचे आपले शूट चांगले व्हावे म्हणून टॉमने तेराशे वेळा मोटर क्रॉस जंप केलेली आहे. पाचशे वेळा स्काय डायव्हिंग केलेली आहे. याचा सराव दिवसातून 30 वेळा केलेला आहे आणि याचा व्हिडीओ यु-टय़ूबवर टाकल्यानंतर त्याला लाखो प्रेक्षकांनी पाहिल्यानंतर हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता निश्चितच त्यांच्या मनात निर्माण होते. असे आपल्या देशातील कोणत्याही स्पाय चित्रपटाबाबत, त्याच्या शूटिंगबाबत आणि त्या शूटिंगमध्ये नायकाने घेतलेल्या मेहनतीबाबत कधीही लिहून येत नाही, कारण ते सगळे कुठल्या तरी स्टुडिओमध्ये ‘व्हीएफएक्स’च्या माध्यमातून केले जाते आणि म्हणूनच हिंदुस्थानामध्ये हॉलिवुडच्या तोडीचा स्पाय चित्रपटाची निर्मिती होणे अवघड आहे.

आपण जर चित्रपटावर आणि नायकावर प्रेम करत असू तर त्या चित्रपटातील कोणत्या घटनेला भौतिक शास्त्राच्या किंवा विज्ञानाच्या नियमात बसवत नाही. किंबहुना असे ठरवूनच तो चित्रपट पाहतो. अन्यथा ‘पठाण’ चित्रपटात शाहरुख एका मोठय़ा गोडाऊनमधून निघतो, हेलिकॉप्टर डायरेक्ट नाइंटी डिग्रीत आकाशात घेऊन जातो. हे अशक्य आहे, पण लोकांना ते आवडले. पठाण म्हणजे जादूगार. तो केवळ हाताने नटबोल्ट काढू शकतो. केवळ एका झटक्याने हातातील बेडय़ा काढू शकतो. त्याला मारणारा प्रचंड शक्तिशाली व्हिलनसुद्धा थकून जातो, पण पठाणला काहीही होत नाही. यातून पठाण हा किती तयारीचा नायक आहे हे दाखवण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न आहे. पण तो चाणाक्ष प्रेक्षकांवर प्रभाव टाकू शकत नाही हे मात्र नक्की.

हिंदुस्थानचे संगणकीय तंत्रज्ञान इतके विकसित झालेले आहे की, पॅरिसमधल्या रेल्वे स्टेशनचा सिक्युरिटी कॅमेरा हिंदुस्थानातील रॉ एजंट कनेक्ट करू शकतात. दिल्ली विमानतळावरून उडणाऱ्या विमानात असलेला व्हायरस नष्ट करण्यासाठी सोडलेले मिसाईल थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर सांगितले जाते की ते आपल्या नियंत्रणाच्या, नियंत्रण कक्षाच्या बाहेर आहे. म्हणजे भारतातल्या मिसाईल भारतात असलेल्या नियंत्रण कक्षातून नियंत्रित करता येत नाहीत? पण त्याच वेळी अफगाणिस्तानातून शाहरुख खान रिमोट कंट्रोलच्या साह्याने दिल्ली शहरावरच्या विमानात असलेला व्हायरसचा बॉम्ब सहजपणे नियंत्रित करू शकतो.

रशियातील रेल्वे अॅक्शन दृश्यात खूप चांगला प्रभाव टाकता आला असता. त्यादृष्टीने प्रारंभ खूप छान केलेला आहे, पण रेल्वेच्या डब्याचे छत सलमान खान कसे फाडतो ते अजिबात कळत नाही आणि तिथून सलमान खान उतरतो. इथे चित्रपट जाहिरात करताना जाणवते. त्यामुळे चित्रपटाची जी बलस्थाने असतात ती झाकली जातात. असे अनेक तंत्रज्ञानाचे चमत्कार या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतात. सलमान खानच्या नव्या चित्रपटाची जाहिरात करण्यात दिग्दर्शकाला काहीही वाटत नाही. तसेच काही संवादांमुळे चित्रपटाची परिणामकारकता कमी होते हे दिग्दर्शकाच्या लक्षात का येत नाही? जॉन अब्राहम स्विमिंग पूलमधून बाहेर येतो, पण त्याचे अंग कोरडे आहे आणि त्याच्या कपडय़ातून पाणी निथळत नाही असाही चमत्कार या चित्रपटात होतो.

शाहरुखने जॅकी चॅनसारखा विनोदी एजंट रंगवण्याचा प्रयत्न केलेला आहे; पण त्याच्या लूकला ती कॉमेडी शोभत नाही. कारण त्याने, नायकाने स्वीकारलेला लूक हा विनोदी माणसाचा लूक नाही. त्याचे ते वाढलेले केस, अनेकदा ते कधी कमी दिसतात. कधी जास्त वाढलेले दिसतात, त्याचा रंगही बदललेला असतो. त्यातल्या कंटिन्युटीकडे दिग्दर्शकाने थोडे दुर्लक्ष केल्याचे जाणवते. पठाणमध्ये सर्वात जमेची बाजू म्हणजे प्रभावी संवाद होय. चित्रपटातील अॅक्शन दृश्य पाहण्याच्या आनंदात बहुतेकांनी या संवादाकडे दुर्लक्ष केलेले आहे. पठाणचे आपल्या हिंदी भाषेवर असणारे प्रेम. ‘अबे हिंदी मे बोल, अरबी मे तुझे गाली देने मे मजा नही आयेगा.’ जपानमध्ये असणाऱ्या किंत्सुगी या विषयावरचा संवादाचा संदर्भ म्हणून अत्यंत सुंदर पद्धतीने संवाद लेखकाने आणलेला आहे किंत्सुगीया शब्दाचा अर्थ असा आहे. जो डिंपल कापडिया सांगते, ‘कोई किमती चीज टूट जाये तो जपानी उसे पिघले हुए सोने से जोडते है, इसे उसकी खूबसूरती और मजबुती जादा निखर जाती है और वो पहले से ज्यादा किमती माना जाता है.’

अनेक मिशनवर काम करताना जखमी झालेल्या सैनिकांना सरकारने सेवानिवृत्त केलेले आहे आणि अशा सेवानिवृत्त जखमी सैनिकांची एक संघटना शाहरुख खान बांधतो या सर्व जखमी, अवयव तुटलेल्या सैनिकांना जोडण्याचे काम किंत्सुगी होऊन डिंपल कापडियाने करावे असा संदर्भ आलेला आहे. अत्यंत प्रभावी संवाद ही या चित्रपटाची जमेची बाजू. या संवादाची ताकद कुठल्याही अॅक्शन दृश्यापेक्षा अधिक प्रभावी आहे. अर्थात पाहताना संवाद गांभीर्याने घेतला तरच कळू शकते. अन्यथा आपण सर्व अॅक्शन दृश्यामध्येच गुंतून जातो आणि संवाद बाजूला राहतात.

स्पाय मूव्हीजची तुलना करताना जेम्स बॉण्ड हा डोळय़ासमोर येणारच. जेम्स बॉण्डच्या चित्रपटात असलेले संवाद, कॅमेरा अँगल्स, जगभरातील प्रसिद्ध लोकेशन्सचा केलेला प्रभावी उपयोग, एडिटिंग, कथेचा वेग, त्यातील अत्यंत महत्त्वाचे म्हणजे संगीत, त्याचे टायमिंग, प्रत्येक क्षणाला ताण वाढवणारे संगीत, विजयानंतर परत क्षणभराने येणारा नवा संघर्ष, त्याचा बॅकअप प्लॅन, त्याच्या डोळ्यांमध्ये उमटणारे भाव, त्याच्या चेहऱ्यावर येणार छद्मी हास्य या सगळ्या गोष्टी जेम्स बॉण्डच्या चित्रपटात ज्या पद्धतीने येतात. तशाच पध्दतीने हिंदुस्थानी स्पाय मूव्हीजमध्ये यायला हव्यात. पठाणच्या निमित्ताने आशा करूया की, आपल्या देशात तयार झालेले असे इंटरनॅशनल पातळीवरील सिनेमे पाहायला मिळतील. तोपर्यंत पठाण पाहून समाधान मानूया.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)