
>> राहुल गोखले
सानाए ताकाईची यांची जपानच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या जपानमध्ये एका महिलेकडे पंतप्रधानपद येणे ही उल्लेखनीय घटना ठरते. मात्र देशांतर्गत राजकीय अस्थैर्य, ढेपाळलेली अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय संबंध या तीन आघाडय़ांवर ताकाईची यांना लढावे लागेल. त्यांच्यासाठी हे निश्चितच आव्हानात्मक आहे.
जपानच्या पंतप्रधानपदाची धुरा नुकतीच सानाए ताकाईची यांनी स्वीकारली. जपानच्या 104 व्या पंतप्रधान असल्या तरी त्या पहिल्याच महिला पंतप्रधान असल्याने जपानमध्येही ती अप्रूप वाटावी अशी घटना आहे. याचे कारण जपानमध्ये असणारा कमालीचा लिंगभेद. अर्थात जपानसमोर असणारी आव्हाने लक्षात घेता हे अप्रूप साजरे करण्याचा वेळ ताकाईची यांच्यापाशी नाही. त्यांना लगेचच कारभारास सुरुवात करावी लागेल. देशांतर्गत राजकीय अस्थैर्य, ढेपाळलेली अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय संबंध या तीन आघाडय़ांवर ताकाईची यांना लढावे लागेल. ताकाईची या जपानच्या गेल्या पाच वर्षांतील चौथ्या पंतप्रधान आहेत. राजकीय संगीत खुर्चीच्या या वातावरणात पुढील तीन वर्षे तग धरणे हे ताकाईची यांच्यासमोरचे सर्वांत मोठे आव्हान. याचे कारण त्यात त्या यशस्वी ठरल्या तरच जपानसमोरील आव्हानांना त्या भिडू शकतील.
ताकाईची यांच्यासमोरील आव्हानांचा धांडोळा घेण्याअगोदर त्यांच्या सरकारच्या वैशिष्टय़ांची नोंद घ्यायला हवी. त्या ज्या लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे (एलडीपी) नेतृत्व करतात तो पक्ष जपानमध्ये काही अपवाद वगळता गेली सात दशके सत्तेत आहे. मात्र गेल्या काही काळापासून त्या पक्षाला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्यातील प्रमुख समस्या म्हणजे त्या पक्षाच्या सदस्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप. त्यापैकी एक सदस्य कोईची हॅगिउदा यांना ताकाईची यांनी आता पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्त केले. एलडीपी पक्षाच्या या धोरणाने नाराज झालेल्या कोमेइटो पक्षाने एलडीपी पक्षाशी गेल्या सव्वीस वर्षांपासून असणारी युती तोडली. साहजिकच पंतप्रधान म्हणून संसदेची मान्यता मिळवायची तर एलडीपी पक्षाला अन्य एका पक्षाशी युती करणे क्रमप्राप्त ठरले.
इनोव्हेशन पक्षाने एलडीपी पक्षाला टेकू दिला आणि संसदेच्या कनिष्ठ सभागृहात बहुमतापेक्षा अवघी चार जास्त मते मिळवून ताकाईची पंतप्रधान म्हणून निवडून आल्या. हे बहुमत अगदीच निसटते आहे; शिवाय इनोव्हेशन पक्ष व एलडीपी पक्षाच्या तत्त्वज्ञानात एकवाक्यता नाही. मुख्यत आर्थिक धोरणांच्या मुद्दय़ावर या दोन पक्षांच्या विचारांत मोठी तफावत आहेच; पण इनोव्हेशन पक्षाने आपल्या अनेक मागण्या आताच पुढे ठेवल्या आहेत. त्यांत संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या सदस्यसंख्येत दहा टक्के कपात; कॉर्पोरेट विश्वाकडून राजकीय पक्षांना मिळणाऱया देणग्यांवर निर्बंध आणि अन्नावर आकारला जाणाऱया कराला स्थगिती अशा काही मागण्या आहेत. या मागण्या पूर्ण होणे कठीणच; पण ताकाईची यांची टोकाची उजवी विचारसरणीदेखील इनोव्हेशन पक्षाला कितपत आणि कुठवर मान्य होईल ही शंका आहेच. तेव्हा ताकाईची यांच्या डोक्यावर अनिश्चिततेची टांगती तलवार कायम राहणार. मात्र मुळात ताकाईची यांची उजवी विचारसरणी सर्वश्रुत असूनही एलडीपीसारख्या मुख्यत मध्यममार्गी पक्षाने ताकाईची यांच्या पारडय़ात नेतृत्वपदाच्या लढतीत वजन का टाकले हेही पाहणे गरजेचे. त्याचे उत्तर जपानच्या घसरत्या अर्थव्यवस्थेत सापडेल.
वाढती महागाई, खर्चिक होत असलेले जीवनमान, येन चलनाची घसरण; जपानच्या जीडीपीच्या तुलनेत स्फोटक स्तरावर पोचलेले राष्ट्रीय कर्जाचे प्रमाण या सर्वांमुळे एलडीपी पक्षाच्या लोकप्रियतेत घट होत होती. याचे द्योतक म्हणजे गेल्या वर्षभरात कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहांच्या निवडणुकीत एलडीपी पक्षाने गमावलेले बहुमत. आर्थिक संकटाच्या काळात राष्ट्रवादाची भावना उफाळून येत असते. जपानमध्ये तेच घडले व सन्सेईतो या अतिउजव्या पक्षाचा जनाधार वाढला. एलडीपी पक्षाला ही धोक्याची घंटा वाटली आणि सन्सेईतो पक्षाचा वारू रोखायचा तर ताकाईची यांच्यासारख्या उजव्या विचारसरणीच्या नेत्याला पक्षाची व पर्यायाने सरकारची धुरा सोपविणे त्या पक्षाच्या नेत्यांना सयुक्तिक वाटले. ताकाईची यांनी पंतप्रधान म्हणून निवडून येण्यामागे ही पार्श्वभूमी आहे. अर्थात त्यातच ताकाईची यांच्यासमोरील आव्हानेही दडलेली आहेत.
अर्थव्यवस्था सावरायची तर सरकारी खर्च वाढविणे; करांमध्ये कपात करणे अशा उपाययोजना ताकाईची राबवतील. स्थलांतरितांच्या विरोधात ताकाईची यांनी सतत भूमिका घेतली असली तरी टोकाची भूमिका घेण्याऐवजी ताकाईची यांना संतुलित भूमिका घेण्यावाचून पर्याय नाही.
आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेशी संबंध बळकट ठेवणे हे ताकाईची यांच्यासमोरील आव्हान. अमेरिका-जपान व्यापार करार झाला असला तरी जपानने अमेरिकी उद्योगांत 550 अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक करावी अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. ताकाईची यांना तो शब्द पाळावा लागेल. रशियाकडून तेलाची खरेदी थांबवावी असा जपानवर दबाव आहे. मात्र जपानच्या एलएनजीच्या एकूण आयातीपैकी नऊ टक्के आयात रशियामधून होते. ती थांबविणे जपानला सोपे नाही. चीन व दक्षिण कोरिया या दोन्ही देशांत ताकाईची यांच्याबद्दल संशय आहे. जपानच्या युद्धवीरांच्या स्मृत्यर्थ उभारण्यात आलेल्या यासुकूनी स्थळाला ताकाईची वारंवार भेट देतात; पण या दोन राष्ट्रांना ती जपानच्या साम्राज्यवादाची खूण वाटते. चीन व दक्षिण कोरियाशी संबंध तणावपूर्ण झाले तर ताकाईची यांना अमेरिकेचे पाठबळ लागणार यात शंका नाही. आणि म्हणून अमेरिकी प्रशासनाची मर्जी सांभाळणे हे ताकाईची यांच्यासाठी निकडीचे.
ताकाईची यांच्या रूपाने जपानने उजवे वळण घेतले आहे. जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा मान सानाए ताकाई यांनी अवश्य पटकावला; पण कठीण काळात जपानच्या तारणहार ठरण्याचा मान त्या पटकावतात का हे पाहणे औत्सुक्याचे.
(लेखक आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आहेत.)




























































