रंगनाटय़ – शौर्यगाथेची प्रयोगशील अभिव्यक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राज चिंचणकर 

मराठी रंगभूमीवर परिचित विषयांसोबतच वेगळय़ा धाटणीचे विषय घेऊनही काही नाटय़कृती सादर होत असतात आणि अशा नाटय़कृतींमुळे मराठी रंगभूमी अधिकच समृद्ध झाली आहे. विशिष्ट संकल्पना, विषयाचे अचूक आकलन, आशयघनता असा पाया भक्कम करत काही नाटय़कृती अनेक कलावंतांनी रंगभूमीवर सादर केल्या आहेत. अशा नाटय़कृती त्यांच्या चाकोरीबाहेरच्या विषयांमुळे रंगभूमीवर विशेषत्वाने लक्ष वेधून घेतात. ‘त्या तिघी – स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा’ या नाटकानेही असाच काहीसा वेगळा मार्ग स्वीकारला आहे.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या घराण्यातल्या तीन स्त्रियांची, अर्थात वीरांगनांची शौर्यगाथा अपर्णा चोथे हिने या नाटय़प्रयोगात उठावदार पद्धतीने मांडली आहे. या नाटकात तीन मुख्य व्यक्तिरेखा रंगमंचावर दृगोचर झालेल्या दिसतात, परंतु हे साध्य करण्यासाठी योजलेला मार्ग मात्र एकल आहे. एकाच कलाकाराने अशा व्यक्तिरेखा रंगमंचावर सादर करणे, म्हणजे यात त्या कलावंताचा कस लागतो. अपर्णा चोथे हिने मात्र हे आव्हान स्वतच्या खांद्यांवर सक्षमतेने पेलत हे नाटय़ रंगवले आहे. विशेष म्हणजे या नाटकाचा विषय नेहमीच्या वाटेवर मार्पामण करत नसल्याने या विषयाच्या निवडीपासूनच तिने तिची वाट वेगळी असल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्या पतींच्या राष्ट्रकार्याची धुरा निष्ठेने सांभाळणाऱया सावरकर घराण्यातल्या वीरांगनांचा जीवनपट या नाटकातून समोर येतो. ‘त्या तिघी’ या डॉ. शुभा साठे लिखित मूळ कादंबरीवर हे नाटक आधारित असून ‘अभिव्यक्त, पुणे’ या नाटय़संस्थेने ते रंगभूमीवर सादर केले आहे.

आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढय़ातले सावरकर बंधूंचे योगदान, पराम, त्याग सर्वांनाच ज्ञात आहे, पण हा लढा सुरू असताना या सावरकर बंधूंच्या सहचारिणी म्हणजेच यशोदा गणेश सावरकर (येसू वहिनी), यमुना विनायक सावरकर (माई) आणि शांता नारायण सावरकर (ताई) यांचे स्वातंत्र्यलढय़ातले योगदान मात्र दुर्लक्षित राहिले. पतीविरह, अपत्यविरह, उपासमार, सामाजिक अवहेलना आदी गोष्टींचा सामना करत अतिशय कष्टप्रद आयुष्य जगूनही, आपल्या पतींच्या कार्याची धुरा या तिघींनी अतिशय निष्ठेने आणि धीरोदात्तपणे सांभाळली. अशा या तीन वीरांगनांचे कार्य समाजासमोर यावे आणि आजच्या युवा पिढीपर्यंत ते पोहोचावे, असा सार्थ उद्देश या नाटकामागे असल्याचे दिसून येते. ाढांतिकारकांचा संसार आनंदाने करत या तिन्ही वीरांगनांनी त्यांचे स्वतचे अस्तित्व अढळ ठेवले. पत्नी म्हणून त्या श्रेष्ठ आहेतच, पण स्त्राr म्हणूनही त्यांनी त्यांचे स्वतचे अस्तित्व अबाधित राखले. या तिघी जणी नात्याने एकमेकींच्या जाऊबाई असूनही त्या कायम एकमेकींची सावली बनून राहिल्या आणि या नातेसंबंधांचा हा पट हे नाटक उत्कटतेने मांडते.

या नाटकाची संकल्पना, संहिता लेखन, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शन व अभिनय अशी जबाबदारी अपर्णा चोथे हिने पेलली आहे. या सर्वच घटकांचा परिपूर्ण विचार या प्रयोगशील सादरीकरणाच्या मागे असल्याचे या प्रयोगातून स्पष्ट होत जाते. वास्तविक हे एकपात्री नाटक असतानाही व्यक्तिरेखांच्या अनुषंगाने ते बहुपात्री झाले आहे. यात तीन मुख्य व्यक्तिरेखांचे रेखाटन करताना एक कलावंत म्हणून अपर्णा चोथे स्वतचा संपूर्ण कायापालट घडवून आणते आणि ते लक्षवेधी आहे. विषयाचा शास्त्रशुद्ध अभ्यास असल्याशिवाय हे सर्व सादर करणे शक्य नाही याचे प्रतिबिंब या प्रयोगातून पडते. ज्या आत्मविश्वासाने ती हे सर्व रंगमंचावर सादर करते, ते पाहता तिने यासाठी घेतलेले श्रम सत्कारणी लागल्याचे स्पष्ट होत राहते.
नाटकात प्रॉपर्टी म्हणून वापरलेली पितळेची जुनी भांडी, देव्हारा, लाकडी खुर्ची आदी सामग्री काळाचा संदर्भ अजिबात सुटू देत नाहीत. अजित यशवंत यांचे संगीत व संकेत पारखे यांची प्रकाशयोजना नाटकाचा आशय उठावदार करणारी आहे. एकूणच नेहमीची चाकोरी मोडून वेगळे काही करू पाहणे आणि तेही एक प्रकारचा ध्यास घेऊन हे सोपे काम नाही. वीरांगनांची शौर्यगाथा सांगणारी ‘ती’, म्हणजेच अपर्णा चोथे हिला आजच्या काळात हे सर्व नाटकाच्या माध्यमातून मंचित करावे असे वाटणे यातच सर्व काही आले.

राष्ट्रकार्याची धुरा निष्ठेने सांभाळणाऱया सावरकर घराण्यातल्या वीरांगनांचा जीवनपट मांडणारी नाटय़कृती.
❚ [email protected]