खाऊच्या गोष्टी – खासमखास खीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रश्मी वारंग

पितृपक्ष आणि पितरांना आवडते अन्न यात देशभरात कोणती गोष्ट सामायिक असेल तर खीर. जवळपास सगळय़ाच प्रांतांमध्ये तयार होणारी खीर खास आहे. शुभ आणि अशुभ दोन्ही प्रसंगांमध्ये मान मिळवणाऱया खिरीची ही गोष्ट.

खीर या शब्दाचा उगम शोधण्याचा प्रयत्न केला तर संस्कृतमधील ‘क्षीर’ या शब्दाशी तो नाते सांगतो. क्षीर म्हणजे दूध आणि खिरीचे घट्ट नाते आहे. भोजनकुतूहल ग्रंथात ‘क्षिरीका’ असा तिचा उल्लेख होतो, तर ऋग्वेदात ‘क्षीरौदन’ असा संदर्भ मिळतो. याचाच अर्थ ती अतिप्राचीन आहे.

‘मानसोल्लास’ ग्रंथात आलेले खिरीचे वर्णन पहा. सावे, राळे, देवभात, सुगंधी तांदूळ यांपैकी कोणत्याही प्रकारच्या तांदळाची खीर बनवावी. आपल्या संस्कृतीत भोज्य, मस्य, चोष्य पेय, लेह्य असे प्रकार सांगितले आहेत. खिरीला चक्क पेय नाही, तर लेह्य म्हणजेच चाटून खाण्याच्या पदार्थात मोडलेले आहे. खीर कशी असावी, तर या पानांवरून न पळता ती चाटून खाण्याइतपत घट्ट असावी असे म्हटले आहे.

हिंदुस्थान हा दूधदुभत्याचा देश आहे. नैवेद्य संकल्पना असो किंवा पितृभोजन, त्यात दुग्धजन्य पदार्थ हवेच. दाक्षिणात्य लग्नसमारंभात ‘पायसम’ म्हणजे खीर हवीच. अंबालापुझ्झा मंदिरातील प्रसादरूपी खिरीशी एक कथाही जोडली गेली आहे. असे म्हणतात की, भगवान कृष्ण एका वयस्कर ऋषींचे रूप धारण करून अंबालापुझ्झा येथील राजासमोर प्रगट झाले. त्यांनी बुद्धिबळ खेळण्यासाठी राजाला आव्हान दिले. राजा बुद्धिबळात कुशल होता. त्याने आव्हान स्वीकारले. ऋषींनी त्याला खेळात हरल्यावर मला काय देणार, असा प्रश्न विचारला. त्यावर असे ठरले की, राजा हरल्यास बुद्धिबळाच्या घरांइतके तांदूळ ऋषींना राजाने द्यायचे. मात्र बुद्धिबळाच्या पहिल्या घरात एक दाणा, दुसऱया घरात त्याच्या दुप्पट, तिसऱया घरात त्या दुपटीच्या दुप्पट आणि पुढे तशीच 64 घरांकरिता जी संख्या निश्चित होईल ती राजाने तांदळाच्या रूपात द्यायची असे ठरले. अर्थात खेळात ऋषीरूप श्रीकृष्ण जिंकले आणि ठरलेल्या पैजेप्रमाणे राजाला द्यावे लागणार होते 18,447,744 महासंख टन इतके तांदूळ. राजा हतबल झाला. तेव्हा भगवान कृष्ण मूळ रूपात प्रकटले आणि त्यांनी राजाला सांगितले की, हे तांदूळ याक्षणी द्यायची गरज नाही तर माझ्या मंदिरात येणाऱया यात्रेकरू वा बेघरांना तू प्रसाद रूपाने दे. तेव्हापासून राजाच्या हरलेल्या पैजेचे ते तांदूळ खीर रूपात भाविकांना दिले जातात. दाक्षिणात्य जेवणात खिरीचा मानही वाढला.

पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या. खीर आणि वडे पितरांसाठी घरोघरी बनतीलच. मनातला आदरभाव आणि पूर्वजांशी असलेली नाळ आटीव खिरीप्रमाणेच घट्ट जोडेल हे नक्की!

देशाबाहेरही प्रसिद्ध

खीर देशाबाहेरही लोकप्रिय आहे. फक्त तिथली नावे वेगळी असतात. पर्शियात याच खिरीची ‘फिरनी’ होते. चीनमध्ये खीरसदृश्य पदार्थ बनतो. त्यात मधात बुडवलेली फळे वापरली जातात. व्हिएतनाममध्ये ‘चे दाऊ त्रांग’ नामक पदार्थ अगदी खिरीसारखाच मात्र तांदळाच्या जोडीला साबुदाणा, कमळबिया आणि नारळ घालून ही खीर बनते.