
>> उत्तरा मोने
एखाद्या घरात जेव्हा दिव्यांग मूल जन्माला येतं तेव्हा सुरुवातीला नक्कीच एक धक्का बसतो, पण नंतर जेव्हा आईवडील त्या मुलाचा स्वीकार करतात आणि त्याच्या आयुष्यात आनंद कसा निर्माण करता येईल याचा विचार करून आपलं संपूर्ण आयुष्य त्या मुलाला केंद्रस्थानी ठेवूनच त्याची आखणी करतात, तेव्हाच त्या मुलाचा उत्तम विकास होऊ शकतो. हीच मुलं खूप मोठं यशही मिळवताना दिसतात. त्यामुळे कुटुंबाचा स्वीकार ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठी पालकांचं समुपदेशन, पालकांना योग्य मार्गदर्शन आणि त्यांच्याही आयुष्यात सुखाचे, आनंदाचे क्षण निर्माण करणं ही खरी गरज आहे. या आणि अशा अनेक विषयांचा उहापोह ‘गगनाला पंख नवे’ या पुरस्कारांच्या निमित्ताने होत असतो.
आपल्या समाजात वावरत असताना आजूबाजूला आपण अनेक व्यक्ती पाहतो, ज्यांनी त्यांच्या अडचणींवर मात करत आपलं आयुष्य अतिशय सकारात्मक बनवलंय. या वर्गात दिव्यांग व्यक्तींचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. काही शारीरिक अक्षमतांमुळे त्यांच्या काही क्षमता कमी होतात आणि मग आव्हानांची एक मालिकाच त्यांच्यासमोर उभी राहते. जन्मतःच किंवा काही अपघाताने जेव्हा त्यांच्या वाट्याला अपंगत्व येतं तेव्हा त्यावर मात करणं ही सोपी गोष्ट नसते, पण जे आपल्याकडे नाही त्याचा विचार न करता जे आहे त्याचा वापर आपल्याला प्रभावीपणे कसा करता येईल याचा विचार जेव्हा या दिव्यांग व्यक्ती करतात तेव्हा त्यांच्या आयुष्यातल्या यशाचा आलेख हा नेहमीच चढता असतो. म्हणूनच समाजातल्या या घटकाचा विचार आपण जाणीवपूर्वक करायला हवा. याच उद्देशाने माझ्या मिती क्रिएशन्स या संस्थेच्या दहाव्या वर्धापनदिनी एक संकल्प केला की, या दिव्यांग व्यक्तींना आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना दरवर्षी पुरस्कार द्यावा. तिथूनच ‘गगनाला पंख नवे’ या पुरस्काराची सुरुवात झाली.
गेली 6 वर्षे हे पुरस्कार दिले जातायत. पुरस्काराचं हे 7 वे वर्ष. आतापर्यंत जवळ जवळ 50 व्यक्ती आणि संस्थांना हे पुरस्कार दिले गेले. प्रत्येक वर्षी या पुरस्कार विजेत्यांच्या प्रवासाकडे पाहिलं की, आपल्यालाही एक नवं बळ, नवी उमेद मिळते. खरं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये काही क्षमता आणि मर्यादा असतात. आपल्या मर्यादा जाणून क्षमता सिद्ध करणं हे सर्वसामान्य व्यक्तीसाठीही कठीण गोष्ट असते तर दिव्यांग व्यक्तींसाठी ते अधिकच कठीण, पण परिस्थितीसमोर हार न मानता ही मंडळी पुढे जात असतात. स्वतःची प्रगती तर ते साधतात, पण आपल्याबरोबर इतरानांही पुढे घेऊन जाण्याचं बळ आणि वृत्ती त्यांच्याकडे असते. म्हणूनच त्यांच्या जीवन प्रवासातून प्रत्येकाने ती ऊर्जा घेतली पाहिजे असं नेहमी वाटतं.
वयाच्या दुसऱ्या वर्षी पोलिओने ग्रस्त झालेल्या चाळीसगावच्या मीनाक्षी निकम जिद्दीने आपल्या कुटुंबाची जबाबदारी तर स्वीकारतातच, पण त्याचबरोबर सामाजिक दायित्व सांभाळत अनेक महिलांसाठी त्या आधार बनतात. शिवणकाम आणि हस्तकलेच्या माध्यमातून दोन हजारांहून जास्त महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचं मोठं काम मीनाक्षी निकम यांनी केलंय. जन्मापासून कर्णबधिर असलेल्या मुंबईची अपूर्वा दामले जेव्हा स्पीच थेरपिस्ट म्हणून काम करते तेव्हा तिच्या कर्तृत्वाबद्दल अधिकच कौतुक वाटतं. कर्णबधिर असून ऑडिओलॉजिस्ट स्पीच लॅंग्वेज पॅथॉलॉजिस्टची पदवी घेणारी हिंदुस्थानातली ती पहिली मुलगी आहे. पोलिओमुळे दोन्ही पाय अधू असूनही शेती शिकून शेतीच्या क्षेत्रात मोठी कामगिरी करणाऱ्या मंडणगडच्या रुपेश पवार यांच्याही कामाला सलाम करावासा वाटतो. व्हीलचेअर क्रिकेटच्या क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करून आपल्याबरोबर इतरांनाही सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या राहुल रामुगडे याच्याकडे पाहिलं की, ऊर्जेचा एक वेगळाच स्रोत सगळ्यांच्याच मनात निर्माण होतो. सेरेब्रल पाल्सी असलेल्या संभाजीनगरच्या ओंकार वैद्यने उच्च शिक्षण घेत अनेक कलाकारांना सोबत घेऊन मोठमोठ्या कार्यक्रमांची आखणी आणि उत्तम आयोजन केलंय. आपल्या भाषेचा, संस्कृतीचा वारसा पुढे नेण्याचं मोलाचं काम आज तो करतोय.
आतापर्यंत कलाक्षेत्रातील अनेक मंडळी म्हणजे अवधूत गुप्ते, मधुरा वेलणकर, वैशाली सामंत, मृणाल पुलकर्णी, सोनाली पुलकर्णी, रेणुका शहाणे, माजी सामाजिक न्यायमंत्री माननीय राजपुमार बडोले, माजी आमदार माननीय नितीन सरदेसाई, उद्योजक मा. सचिन शिंदे, नवनीतचे सुनीलभाई गाला, नायपॅमचे राजन राजे ही मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिली आहेत. मुंबई विद्यापीठाच्या माजी पुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, लेखक, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले, समाजसेविका वर्षा पवार-तावडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष, नाट्य निर्माते प्रसाद कांबळी ही दिग्गज व्यक्तिमत्त्वं निवड समितीत कार्यरत असून डॉ. स्नेहलता देशमुख या निवड समितीच्या अध्यक्षा आहेत. निवड समितीचे मान्यवर सदस्य. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर या सर्वांच्या उपस्थितीत 18 डिसेंबरला संध्याकाळी 6 वाजता यावर्षीचा ‘गगनाला पंख नवे’ हा पुरस्कार सोहळा मिती ग्रुपच्या फेसबुक पेजवरून सादर होईल. सर्वांनी आवर्जून या सोहळ्याचं साक्षीदार व्हावं आणि दिव्यांगांच्या गगनभरारीला प्रोत्साहन द्यावं.
एखाद्या घरात जेव्हा दिव्यांग मूल जन्माला येतं तेव्हा सुरुवातीला नक्कीच एक धक्का बसतो, पण नंतर जेव्हा आईवडील त्या मुलाचा स्वीकार करतात आणि त्याच्या आयुष्यात आनंद कसा निर्माण करता येईल याचा विचार करून आपलं संपूर्ण आयुष्य त्या मुलाला केंद्रस्थानी ठेवूनच त्याची आखणी करतात, तेव्हाच त्या मुलाचा उत्तम विकास होऊ शकतो. हीच मुलं खूप मोठं यशही मिळवताना दिसतात. त्यामुळे कुटुंबाचा स्वीकार ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठी पालकांचं समुपदेशन, पालकांना योग्य मार्गदर्शन आणि त्यांच्याही आयुष्यात सुखाचे, आनंदाचे क्षण निर्माण करणं ही खरी गरज आहे. या आणि अशा अनेक विषयांचा उहापोह ‘गगनाला पंख नवे’ या पुरस्कारांच्या निमित्ताने होत असतो. या दिव्यांग व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी असे पुरस्कार दिले गेले पाहिजेत, त्यांनी तयार केलेल्या वस्तू आपण विकत घेतल्या पाहिजेत, त्यांच्या हातांना काम दिलं पाहिजे आणि त्यांचा योग्य तो सन्मान केला पाहिजे असं यानिमित्ताने नक्कीच सांगावंसं वाटतं.




























































