ऑल्टमनच्या घरवापसीचे कवित्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘ओपन एआय’चे सीईओ सॅम ऑल्टमन यांची बडतर्फी आणि नंतर त्यांची घरवापसी ही माहिती आणि तंत्रज्ञान जगाला अचंबित करून गेली.  किंबहुना, सोशल मीडियावर तर आाल्टमन आणि ग्रेग ब्रॉकमॅन यांना कामावरून काढून टाकल्यानंतर ज्या नाटय़मय घटना घडत गेल्या, त्यांना एकता कपूरच्या मालिकेची उपमा दिली गेली, पण या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याबाबत दाखवलेला निर्धार आणि मायक्रोसॉफ्टने त्यांना आपल्याकडे घेण्यासाठी दाखवलेली तत्परता यामुळे ओपन एआयला त्यांना पुन्हा सेवेत घेण्यावाचून पर्याय उरला नाही. ऑल्टमन यांचे झालेले पुनरागमन ही त्यांच्या कर्तृत्वाला मिळालेली सोनेरी पावती म्हटली पाहिजे. आाल्टमन यांना पुन्हा सेवेत घेऊन ओपन एआयने आपल्याला पुढील काळात उद्भवू शकणाऱ्या स्पर्धात्मक धोक्यांना पूर्णविराम दिला आहे.

सॅम ऑल्टमन… माहिती तंत्रज्ञानाच्या आधुनिक विश्वातलं अग्रणी व्यक्तिमत्त्व… कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटजीपीटी नामक जादुई जिनच्या निमित्ताने जगभरात चर्चिले गेलेले…पण यशाच्या शिखरावर असलेल्या, सर्वश्रेष्ठ गुणवत्ता असलेल्या व्यक्तीलाही काही वेळा कारकीर्दीतील बिकट प्रसंगातून जावे लागते. तसेच काहीसे ओपन एआय कंपनीचे सीईओ राहिलेल्या सॅम यांच्याबाबत झाले. अत्यंत तरुण, उत्साही, तडफदार असे मुख्याधिकारी राहिलेले सॅम हे एआय आणि चॅटजीपीटीच्या क्षेत्रात यशोशिखरावर आहेत. काही दिवसांपूर्वी अघटित घडले आणि त्यांच्या कंपनीने चक्क त्यांना कामावरून काढून टाकल्याचे कळवले, परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. त्यांना काढून टाकल्याची बातमी कर्मचाऱ्यांना समजली आणि त्यांनी त्याविरोधात भूमिका घेण्यास सुरुवात केली. कंपनीच्या संचालकांचे असे म्हणणे होते की, ऑल्टमन मोठय़ा उत्साहाने आणि जोमाने वाटचाल करत असले तरी काही गोष्टी ते लपवून ठेवत आहेत. तसेच त्यांना स्वतचे साम्राज्य तयार करायचे आहे. या प्रकारच्या गैरसमजामुळे त्यांची गच्छंती करण्याचा विचार पुढे आला आणि त्यानुसार हा निर्णय घेत ऑल्टमन यांना तडकाफडकी तसे कळवण्यातही आले.

एकेकाळी ऑल्टमन हे ओपन एआय या कंपनीच्या गळ्यातील ताईत बनले होते. हा ताईत अचानक डोईजड वाटू लागल्याने काढून टाकण्याची वेळ का आली हे आज नेमके सांगता येणार नाही, परंतु ऑल्टमन यांनी लिहिलेल्या एका लेखामध्ये स्पर्धक कंपनीबद्दल काही विधाने केली होती. नेमकी हीच मिरची त्या संचालकांना झोंबली. त्यांना असे वाटू लागले की,ऑल्टमन स्वतची वेगळी चूल तयार करण्याच्या विचारात आहेत. ते आक्रमक भूमिका घेऊन काही समीकरणे मांडत आहेत. अशा विचारांनी चक्क त्यांना काढून टाकण्याचे पत्र देण्यात आले आणि त्यांच्या जागी मीरा मुराती नावाच्या एका हिंदुस्थानी वंशाच्या महिलेला सीईओपदी बसवण्यात आले.

ऑल्टमन यांच्या तडकाफडकी बदलीमुळे आयटी विश्वासह जगभरातच चर्चेची लाट उसळली, पण या नाटय़मय घडामोडींनंतर काही तासांतच ऑल्टमन यांना पुन्हा त्यांच्या पदावर रुजू करण्यात आले. हे नाटय़ कसे घडले याची कथा तेवढीच उद्बोधक आणि रंजक आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हे आज जगात सर्वात परवलीचे आणि सर्वश्रेष्ठ सेवा क्षेत्र आहे. एआय आणि चॅटजीपीटीने जगाला झपाटून टाकले आहे. त्यामुळे जग झपाटय़ाने बदलत आहे आणि बदलत राहील असे लोकांना वाटते. असे असताना नेमके याच कंपनीच्या संचालकावर  असे गंडांतर का आले याची काही कारणे आहेत आणि त्याचे काही परिणाम आहेत. त्याचा उलगडा करणे आवश्यक आहे.

सॅम ऑल्टमन हे मायक्रोसॉफ्ट समर्पित ओपन एआय या श्रेष्ठ कंपनीचे सीईओ आणि चॅटजीपीटी या संकल्पनेचे निर्माते म्हणून जगभरात कमालीचे लोकप्रिय ठरले. अग्रगण्य अशा अमेरिकन कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात त्यांनी नाव कमावले. विशेषत या फर्मचे सहसंस्थापक म्हणून त्यांनी आपले नाव प्रस्थापित केले होते. त्यांचे या कंपनीमध्ये पुनरागमन करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या आठवडय़ातील चिंतेच्या ढगातून त्यांची मुक्तता झाली आहे. हा त्यांच्या नेतृत्व गुणांचा आणि व्यवस्थापकीय कौशल्याचा विजय म्हणावा लागेल. गेल्या आठवडाभरात चाललेल्या नाटय़मय घडामोडींनंतर त्यांना आलेले यश म्हणजे एक अद्भुत अर्थात, सॅम ऑल्टमन पुनप्रस्थापित कसे झाले आणि नेमक्या काय घडामोडी घडल्या हे जाणून घेण्यासारखे आहे. बहुलोकप्रिय अशा चॅटजीपीटी तंत्राची निर्मिती करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळेच ओपन एआयमध्ये त्यांनी नाव कमावले. गतवर्षी चॅटजीपीटी बाजारात अवतरला तेव्हा जगभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत चॅटजीपीटीचा वापर करणाऱ्यांची संख्या तब्बल 100 दशलक्षवर पोहोचली होती. तथापि नंतरच्या काळात आाल्टमन यांची वागणूक तसेच मंडळाशी त्यांचा असलेला संवाद यामुळे एआयच्या विकासावर देखरेख करण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे, असे ओपन एआय मंडळाचे संचालक इलया सुत्स्केव्हर यांनी म्हटले होते.  त्यांच्या हकालपट्टीनंतर कंपनीने लिहिलेल्या एका ब्लॉगमध्ये तर  ‘ओपन एआय’च्या मंडळाचा आाल्टमन यांच्यावर आता विश्वास राहिला नाही, असे स्पष्टीकरणही दिले. पण कंपनीच्या व्यवस्थापनाचा हा निर्णय कर्मचाऱ्यांना रुचला नाही. कंपनीच्या या निर्णयाला विरोध करत ‘ओपन एआय’चे अध्यक्ष ग्रेग ब्रोकमॅन यांनीही पदाचा राजीनामा दिला. या घटनेनंतर तंत्रज्ञान उद्योगात तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली.

कॉर्पोरेट विश्वात प्रतिभावंत, निष्णात बुद्धिवंतांना नेहमीच मोठी मागणी असते. त्यामुळेच अशा दिग्गजांना आपल्याकडे खेचण्यासाठी  गळेकापू स्पर्धाही पाहायला मिळते. ऑल्टमन यांच्यासारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील दादा व्यक्तिमत्त्वाबाबत अशी चढाओढ नसती तरच नवल! ओपन एआयमधून त्यांची हकालपट्टी केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर तात्काळ मायक्रोसॉफ्टने त्यांना आपल्याकडे सेवेत सामावून घेण्यासाठी पावले टाकली. विशेष म्हणजे मायक्रोसॉफ्टची ओपन एआय कंपनीत अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आहे. असे असूनही मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी सॅम आाल्टमन आणि ग्रेग ब्रोकमॅन हे दोघेही सहकारी म्हणून आमच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीत रुजू होणार आहेत. ते आमच्या नव्या आणि प्रगत अशा एआय संशोधन टीमचे नेतृत्व करतील, अशी माहिती सोशल मीडियावरुन जाहीर केली.    या वृत्तानंतर ऑल्टमन यांच्या घरवापसीबाबतची चक्रे गतिमानतेने फिरू लागली.

ऑल्टमन यांच्या पुनरागमनाच्या प्रक्रियेमध्ये सर्वात मोठा वाटा आहे तो तेथील कर्मचाऱ्यांचा. एक कुशल कार्यकारी व्यवस्थापक  म्हणून ऑल्टमन यांनी दोन गोष्टी केल्या होत्या. एक म्हणजे त्यांनी संचालकांपेक्षाही आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांचा विश्वास अधिक संपादित केला होता. प्रेम, सहकार्य, सद्भावना या भावनेतून त्यांनी आपल्या कंपनीमध्ये एक वेगळी कार्यसंस्कृती निर्माण केली होती. त्यामुळेच जेव्हा त्यांना काढून टाकल्याची बातमी प्रसृत झाली तेव्हा ओपन एआयच्या पाचशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाला साकडे घातले. त्यांना काढत असाल तर आम्ही कोणीही कामावर येणार नाही, असे सांगत एक प्रकारे त्यांनी इशाराच दिला. इतकेच नव्हे तर आम्ही सर्व जण ऑल्टमन यांच्या बरोबरीने मायक्रोसॉफ्टमधील नवीन विभागात सामील होऊ अशी पुष्टीही त्यांनी जोडली. त्यांच्या या एकजुटीचा विजय झाला आणि ओपन एआयच्या व्यवस्थापनाला ऑल्टमन यांना पुन्हा बोलावण्याशिवाय पर्याय उरला नाही. यावरून ऑल्टमन यांच्या कार्यकुशलतेची झलक लक्षात येते. कुठल्याही प्रकारच्या सामाजिक, आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या सीईओला आपल्या कामाला गती देत असताना लोकमताचे संघटन करावे लागते आणि लोकप्रियतेबरोबरच स्वतच्या क्षमताही विकसित कराव्या लागतात.

ऑल्टमन यांचे कार्यही असेच राहिले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात त्यांनी नव्या संकल्पना तयार केल्या, नवी कार्यसंस्कृती तयार केली. त्यामुळे त्यांना त्या संस्थेविषयी एक समर्थन निर्माण करता आले. परिणामी त्यांच्या क्षमता सिद्ध झाल्या. ओपन एआयचे सीईओ म्हणून ऑल्टमन यांचे झालेले पुनरागमन ही त्यांच्या कर्तृत्वाला मिळालेली सोनेरी पावती म्हटली पाहिजे. ऑल्टमन यांना पुन्हा सेवेत घेऊन ओपन एआयने आपल्याला पुढील काळात उद्भवू शकणाऱ्या स्पर्धात्मक धोक्यांना पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंचे समाधान करत हे पेल्यातील वादळ निवळले आणि ऑल्टमन यांच्या नाटय़ाची कहाणी सुफळ संपूर्ण झाली.

(लेखक आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक आहेत)