कडू- गोड आठवणींचा लॉकडाऊन

>> राहुल भंडारे (दिग्दर्शक)

आयुष्यात पहिल्यांदा एवढा मोठा वेळ मला मिळाला. महाविद्यालयीन जीवन, स्ट्रगलचा काळ यामध्ये स्वतःकडे कधीच लक्ष दिलं नाही. अंतर्मुख होऊन स्वतःकडे आणि आपल्या कुटुंबाकडे अगदी जवळून बघण्याची संधी या काळाने आपल्याला दिली. व्यवहार सगळे बंद, फक्त स्वतःला वाचवणं, जगवणं, टिकवणं हीच सगळ्यांची अवस्था होती, आजही आहे. या स्थितीत माझं कुटुंब, माझी वसाहत किंवा माझी मुंबई, माझा महाराष्ट्र, माझा देश याविषयीच्या भावना जास्त तीव्रतेने मनात येऊ लागल्या. कोरोनामध्ये माझं सगळ्यात मोठं नुकसान झालं ते म्हणजे माझ्या सगळ्यात जवळचे रत्नाकर काका, लेखक रत्नाकर मतकरी गेले. त्यावेळी मला अश्रू अनावर झाले.

या काळात बऱयाच गोष्टी शिकलो. आपण कुठे चुकलो, काय योग्य-अयोग्य, काय करायला हवं या सगळ्या गोष्टींचा आढावा यावेळी घेता आला, कुटुंबाकरिता वेळ देण्याची संधी मिळाली. माझी मुलगी तीन वर्षांची आहे. नाटक आणि इतर कामांच्या धावपळीमुळे तिच्याकडे वेळ देता यायचा नाही. रोज सकाळी आणि रात्री घरी गेल्यावरच भेट व्हायची, पण या वेळी तिच्याकडे लक्ष देता आले, तिच्याकडूनही मला काही गोष्टी शिकता आल्या. ती कसे प्रश्न विचारते, बोलते, काय सांगते हे अनुभवता आलं. मुलीच्या, कुटुंबाच्या काय अपेक्षा असतात याची जाणीव झाली.

बऱयाचशा गोष्टी लॉकडाऊन काळात वाचनात आल्या. एक छान पुस्तक वाचून झालं. लोककलावंतांच्या आयुष्यावरील अप्रतिम पुस्तक आहे. लावणी कलावंतांचं आयुष्य कसं असतं ते वाचायला मिळालं. पडद्यामागचं आयुष्य यामध्ये अत्यंत रोखठोक पद्धतीने मांडलंय. या विषयावर भविष्यात काहीतरी करावं असा विचार सुरू आहे.

नाटकाला पर्याय म्हणून डिजिटल व्यासपीठाचं दालन सध्या खुलं झालंय. काळाबरोबर आपण बदललं पाहिजे. नाटक हा माझा श्वास आहे. त्यासोबत आपल्याला डिजिटल माध्यमाकडेही वळावं लागेल. त्यासाठी आमचं सध्या वेब सीरिजवर काम सुरू आहे. तसेच भविष्यात एखादी नवीन मालिका करण्याचा माझा मानस आहे. जी मंडळी आज रंगमंचापासून वंचित झाली आहेत, त्यातल्या काही लोकांना डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून रोजगाराची संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे.

घरी मला लॉकडाऊनमध्ये आई, बहीण, पत्नीकडून दररोज वेगवेगळ्या डिशेस खायला मिळाल्या. ती माझ्यासाठी एक पर्वणी होती. कुटुंबासोबत फार वेळ मिळाला. महत्त्वाचं म्हणजे स्वतःकडे लक्ष द्यायला हवं याची जाणीव झालं. शरीर आणि मन निरोगी आहे ना, तुमच्या कामामुळे कुटुंबाची फरफट होत नाही ना हे बघायला, कशासाठी पैसे कमवतोय, सगळ्या धावपळीत माझं कुटुंब सुरक्षित आहे का या सगळ्या बारीकसारीक गोष्टी समजून घ्यायला वेळ मिळाला.

कुठलंही यश-अपयश, पैसा यांच्यात न गुंतता त्याच्याही पुढे आपल्याला जायचं असतं. अद्वैत थिएटर परिवारातर्फे नक्कीच येणाऱया काळात आपण चित्रपट माध्यमाकडे वळणार आहोत. काही वेळा मोठं संकट मोठी संधीही घेऊन येतं हे या काळाने मला शिकवलं.

आपली प्रतिक्रिया द्या