मुद्दा – पाटी, पेन्सिल ते टॅब … एक हरवलेला प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> टिळक उमाजी खाडे 

साधारणपणे  30-40 वर्षांपूर्वी 7 जूनला दोन गोष्टींना हमखास सुरुवात व्हायची. त्यातील एक म्हणजे सुखावणारा, तनामनाला गारवा देणारा मृग नक्षत्राचा पाऊस आणि दुसरी म्हणजे नव्या पाटी, पेन्सिलच्या साक्षीने शाळेची सुरुवात! आता या दोन्ही गोष्टी बदलल्या. ग्लोबल वार्मिंग, अल निनो फॅक्टरमुळे ऋतुचक्र बदलले. पाऊस लांबला. तो अवेळी पडू लागला. बहुतांशी शाळांची तारीख 7 जून ऐवजी 15 जून झाली. वाढत्या तापमानामुळे विदर्भात तर ती 30 जून झाली. काळय़ा पाटीऐवजी मुलांच्या हातात टॅब आले. काळाचा हा अगाध महिमा… दुसरे काय?

वेगवेगळय़ा कव्हरच्या रंगीबेरंगी वह्यांऐवजी पुस्तकातच वह्यांची पाने जोडली गेली. वह्यांवरील रंगीत चित्रे निरखून पाहण्याचा बाल हक्क ‘राजहट्टा’ने हिरावून घेतला. म्हणे दप्तराचे ओझे कमी करणार, पण वाढलेल्या विषयांच्या संख्येमुळे मुलांच्या मनावर आलेले ओझे कसे कमी करणार? ‘गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी!’ चिखल-माती तुडवत शाळेची वाट पकडणाऱ्या  अनवाणी पायांची जागा चकचकीत बूट व सँडलने घेतली. ठिगळे लावलेल्या खाकी हाफ पंटची जागा कडक इस्त्री केलेल्या रंगीत फुलपँटने घेतली. काळय़ा रंगाच्या एकाच छत्रीत तीन-चार मुलांनी शाळेत भिजत जाण्याचा आनंद रंगीबेरंगी रेनकोटने कायमचाच हिरावून घेतला. शाळेतील पितळेच्या टाकीतील वा मोठय़ा घागरीतील पाणी ‘वॉटर बॉटल’मध्ये कायमचे बंदिस्त झाले. घरून फडक्यात गुंडाळून आणलेल्या शिदोरीची जागा ‘लंच बॉक्स’ने घेतली, तर  सरकारी शाळांत सरकारी हट्टापायी ‘शालेय पोषण आहारा’ने घेतली! ‘गुरुजी-बाईं’च्या जागी ‘सर-मॅडम’ आल्या! संध्याकाळी शाळा सुटताना एका तालासुरात म्हणावयाच्या पाढे पाठांतराची जागा ऍबॅकसने घेतली. डिजिटल बोर्ड व प्रोजेक्टरने वर्गातील काळय़ा कुळकुळीत फळय़ाला व पांढऱ्या खडूला हद्दपार केले. नदीकाठी, माळरानावर जाणाऱ्या शाळेच्या सहली चकचकीत रिसॉर्ट व वॉटर पार्कमध्ये जाऊ लागल्या. परीक्षेत नापास होण्याचा ‘आनंद’ व पाठीत दोन रट्टे मारण्याचे ‘सुख’ शिक्षण हक्क कायद्यातील नापास न करण्याच्या धोरणाने कायमचे हिरावून घेतले.

मधल्या सुट्टीत शाळेच्या व्हरांडय़ात खेळले जाणारे ‘डोंगर की पाणी’, ‘मामाचं पत्र हरवलं’, ‘तळय़ात मळय़ात’, ‘वाघोबा वाघोबा’ हे खेळ तर इतिहासजमा झाले. पूर्वी गुरुजी मुलांची तक्रार घेऊन त्यांच्या घरी जायचे. आता पालकच ‘टीचर’ची तक्रार घेऊन ‘स्कूल’मध्ये येऊ लागले. पूर्वी 2 + 2 चा जमाना होता. म्हणजे शाळेत गुरुजींनी दोन धपाटे पाठीत लगावल्यावर घरी वडिलांकडून अजून दोन रट्टे मिळायचे, पण आता काळ बदलला तसे ‘टीचर्स’ही बदलले व ‘पॅरेंटस्’ही बदलले!  शनिवारी सकाळी शाळा सुटल्यावर गावातून शेण गोळा करून वर्ग सारवण्याचे कर्तव्य वर्गात बसवलेल्या फरशीने कालबाह्य ठरवले. हा बदल इष्ट असला तरी त्याने मुलांची श्रम प्रतिष्ठा कमी केली. गोष्टींचा तास, तालासुरात कविता म्हणणे, घरातील लुगडे व धोतर वापरूनच शाळेतील नाटिकेत काम करणे, ‘सामुदायिक जीवन’ नावाच्या विषयाच्या परीक्षेचा एक भाग म्हणून शाळेतील सर्व मुलांनी चार-आठ आणे गोळा करून एकत्र भेळ करून खाणे, शनिवारी सकाळी कोवळय़ा उन्हात बसून मोकळय़ा वर्गात शिकणे, शाळेत न आलेल्या मुलाला त्याच्या घरी जाऊन आणणे (लपून बसला असेल तर त्याला उचलून आणणे) या गोष्टी जणू आज कालविसंगत (आऊटडेटेड) ठरल्या आहेत.

बदल हा निसर्गाचा नियम आहे. स्थित्यंतर हा मानवी प्रगतीचा पाया आहे, पण जुन्या काळातील शाळेच्या जुन्या आठवणी मनात ‘घर’ करून आहेत एवढे मात्र नक्की! आठवणींचा रंगीबेरंगी पिसारा सावरत बदललेल्या पावसात नाइलाजाने का होईना, पण चिंब भिजण्याशिवाय या मनमोराला दुसरा पर्यायच शिल्लक राहिला नाही. कालाय तस्मै नमः, दुसरं काय?