
>> अरुण जोशी
1996 मधली गोष्ट. बारा वर्षांची एक गोड गळय़ाची चुणचुणीत मुलगी ‘सारेगम’च्या अंतिम फेरीत गात होती. परीक्षक होते कल्याणजी आनंदजी. सूत्रधार सोनू निगमही खूपच तरुण होता. बालकलाकारांची ती स्पर्धा. त्यात श्रेया घोषाल नावाच्या या मुलीने ‘प्यार झुकता नहीं’ या मिथुन-पद्मिनीच्या सिनेमातलं ‘तुमचे मिलकर ना जाने क्यूं’ हे गाणं पेश केलं. ते परीक्षकांसह प्रेक्षकांनाही बेहद्द आवडलं. मग आनंदजींनी कल्याणजींकडे वळून श्रेयाला विचारलं, ‘यांचं एखादं गाणं आठवतंय?’ ती खुदकन हसली. कल्याणजी म्हणाले, ‘तुझ्या आवडीचं गाणं गा…’ आणि श्रेया लता मंगेशकर यांनी गायलेलं तिच्या दृष्टीने बऱ्याच जुन्या ‘जहांआरा’ चित्रपटातलं ‘वो चूप रहे तो मेरे दिल के दाग जलते है’ हे भावस्पर्शी गाणं अप्रतिमरीत्या सादर केलं. श्रेयाने ती स्पर्धा जिंकली. त्यानंतर तिला मागे वळून पाहायची गरजच भासली नाही. सुविद्य घोषाल कुटुंबातल्या या मुलीने शिक्षण सांभाळून आपलं कला क्षेत्रातलं स्थान इतकं पक्क केलं की, आज चाळिशी उलटायच्या आतच ती जागतिक कीर्तीची गायिका झालेली आहे. नम्र स्वभावाच्या श्रेयाला एकदाच भेटण्याचा योग आला. ‘ग्रंथाली’तर्फे अनुराधा हरकरे आणि अंजली कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ या पुस्तकातील मान्यवरांपैकी एक असलेली श्रेया तिच्या आईवडिलांबरोबर आली होती आणि सर्वांशी नम्रपणे बोलत होती.
श्रेया मूळची बंगालमधली. मुर्शिदाबाद जिल्ह्यातला तिचा जन्म, परंतु बालपण गेलं ते राजस्थानात कोटय़ाजवळच्या रावतभाटा गावात. तिने वयाच्या चौथ्या वर्षी स्टेजवरून गाणं सादर करून वाहव्वा मिळवली. शिक्षण सुरू असतानाच तिच्या वडिलांची बदली भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर अर्थात ‘बीएआरसी’मध्ये झाली आणि श्रेया मुंबईकर बनली. एका बाजूला तिची स्वरसाधना सुरूच होती. कल्याणजी भाईंसारख्या विख्यात संगीत दिग्दर्शकाचं मार्गदर्शन तिला लाभलं आणि शास्त्रीय संगीताची आणखी तयारी करून घेतली श्रेयाच्या गुरू मुक्ता भिडे यांनी.
तशी तिच्या गाण्याच्या कार्यक्रमांची सुरुवात चौथ्या वर्षीच झाली असली तरी मुंबईतल्या ‘बॉलीवूड’ने तिची दखल घेतली ती संजय लीला भन्साळी यांनी. श्रेयाच्या आवाजाची किमया त्यांनी जाणली आणि नंतर खूप गाजलेल्या माधुरी-ऐश्वर्या-शाहरुख यांच्या ‘देवदास’मध्ये त्यांनी ‘पारो’साठी श्रेयाचा स्वर घेतला. त्यातलं ‘बैरी पिया’ ध्वनिमुद्रित करताना भन्साळी म्हणाले, ‘श्रेया एकदा रिहर्सल करूया.’ आणि श्रेयाने ते गाणं अशा काही नजाकतीने गायलं की सारेच चकित झाले. भन्साळी म्हणाले, ‘तुझा हा पहिलाच ‘टेक’ ओके झालाय.’ याच चित्रपटातल्या प्रसिद्ध ‘डोला रे डोला’मध्येही कविता कृष्णमूर्ती यांच्यासह श्रेयाचा आवाज आहेच.
त्यानंतर तिच्या गानकारकीर्दीचा आलेख सतत चढतच राहिला तो आजतागायत. तिने आतापर्यंत गायलेल्या हिंदी आणि अन्य भाषांमधली गाणी आणि त्या गाण्यांचे संगीतकार यांची यादी खूप मोठी होईल. ‘धीरे जलना’ गाण्यासाठी नॅशनल फिल्म अॅवॉर्ड तर ‘पल पल’साठी पहिला फिल्मफेअर अॅवॉर्ड मिळविणाऱ्या श्रेयाने एकूण सात वेळा या पुरस्कारावर आपलं नाव नोंदवलंय. ‘अग्निपथ’मधल्या अजय-अतुल यांनी संगीत दिलेल्या ‘चिकनी चमेली’ गाण्याने घातलेला धुमाकूळ आठवत असेलच. तो स्वरही श्रेयाचाच.
मराठीतही श्रेयाने अनेक गाणी म्हटली आहेत. अजय-अतुल यांनी संगीत दिलेली सं. कृ. पाटील यांची दोन गाणी श्रेयाने गायलीत. ‘जीव रंगला दंगला गुंगला असा’ आणि ‘मन रानात गेलं गं, पानापानात गेलं गं’ ही दोन्ही गाणी ‘जोगवा’ चित्रपटातली. याशिवाय अजय-अतुल यांचंच संगीत असलेल्या ‘सैराट’मधलं त्यांनीच लिहिलेलं ‘हळद पिवळी पोर कवळी, जपून लावा लाली’ हे गाणंही खूप गाजलं आणि गाजतंय.
प्रसिद्ध लेखिका, कवयित्री अरुणा ढेरे यांची मिलिंद जोशी यांनी संगीत दिलेली आणि श्रेयाने गायलेली दोन भावगीतं म्हणजे ‘चंचल हा मनमोहन गं, याला कसले बंधन गं’ आणि ‘अजून तरळते दृष्टीपुढती ते मोराचे पीस निळे’, श्रेयाने गायलेलं अजय-अतुल यांच्याच संगीतातलं ‘निळपंठ मास्तर’ चित्रपटातलं गजेंद्र अहिरे यांचं ‘अधीर मन झाले, मधुर घन आले, धुक्यातुनी नभातले’ हे श्रेयाचंच गाणं. ‘खुलता कळी ही खुलेना’ हे श्रेयाचं मालिका गीत समीर साप्तीस्कर यांचं आणि संगीतही त्यांचंच. ‘सूर आले, शब्द ल्याले, माझ्या आर्जवी मनात मैत्र लाघवी जागले’ हे ‘सुंदर माझे घर’ चित्रपटातलं श्रेयाने गायलेलं गीत लिहिलंय निखिल आखवे यांनी आणि संगीत आहे मधुराणी गोखले-प्रभुलकर यांचं.
टीव्हीवरच्या गायन स्पर्धा ते परीक्षक होणं, हिंदी आणि अनेक भाषक चित्रपटातली यशस्वी गायिका म्हणून विविध सन्मान मिळवणं, देशविदेशात सतत कार्यक्रम करणं हे आता श्रेयाला नवीन नाही, पण तिचं पहिलं रेकॉर्डेड गाणं होतं एका अल्बमसाठी लतादीदींनी अमर केलेलं आणि शांता शेळके यांचे शब्द असलेलं ‘गणराज रंगी नाचतो’ या ध्वनिमुद्रणाने श्रेयाच्या स्वरप्रवासाचा श्रीगणेशा झाला. ती लतादीदींना ‘मां सरस्वती’ मानते. त्यांना श्रद्धांजली वाहताना तिने भरल्या मनाने त्यांच्या अनेक गाण्यांचं सादरीकरण केलं होतं. तिचं महाराष्ट्राशी अतूट नातं जुळलं आहे.






























































