Fathers Day बाबा नावाचा वटवृक्ष

711

विद्या सहदेव

अहो बाबा, बाबा तुम्ही पासून तर ए बाबा, बाबा तु पर्यंतचा प्रवास दोन वेगळ्या कालखंडाचं वर्णन करतो. बाबा, बाप, वडील या शब्दांमद्धे एक भक्कम आधार, एक तटबंदी, एक दृढ विश्वास जाणवतो. बाबा म्हणजे एक दरारा असं नातं आता बदलून ते मैत्रीपूर्ण झालंय. आपल्या घरासाठी, लेकराबाळांसाठी जीवाचं रान करणारा, आपल्या इच्छा मारून सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सतत धडपड करणारा, आपलं दुखणं खुपणं लपवत अखंड कष्ट करणारा, हळव्या क्षणी स्वतःचे अश्रू सगळ्यांपासून लपवत स्वतःला कणखर दाखवणारा हळवा बाबा, कसोटीच्या अडचणीच्या क्षणी सगळ्यांना आपल्या पंखाखाली सुरक्षित ठेवणारा बाबा म्हणजे आयुष्यातील सगळ्यात मोठं सुख. घराचा पाया, भिंती, छत सगळं असतो बाबा. नोकरी करणारा असो वा रिक्शा चालवणारा, शेती करणारा असो किंवा कचऱ्याच्या गाडीवर काम करणारा, लखपती असो वा भिकारी ध्येय मात्र एकच…. मुलांचं सुख. मुलांच्या जन्माआधीपासूनच त्यांच्या भविष्यासाठी तरतूद करणारा प्रसंगी कर्ज काढून मुलांच्या शिक्षणाची सोय करणारा बाबा म्हणजे त्यागाचं उदाहरण. शिस्तप्रिय, वरवर कठोर वाटणारा बाबा आपल्याला दिसतो पण त्याच्या आत त्याने लपवून ठेवलेला हळवा बाबा आपण किती वेळा बघतो? मुलांसाठी उपास, नवस करणारा बाबा कधीच समोर येत नाही. पण तो असतो. कायमच…. बाबाच्या कुशीत किती सुरक्षित वाटायचं. त्याने दाखवलेली वाट किती सुकर वाटायची. त्याचं बोट धरून चालताना कशाचीही काळजी नसायची. पायी चालताना थकवा आला की तो लगेच कडेवर घ्यायचा. मुलांच्या आजारपणात घाबरलेला बाबा कुणाला दिसतो का? ऐन तारूण्यात गेलेल्या मुलाला अग्नी देताना त्या बापाचं मुक आक्रंदन कुणाला दिसतं? पण तो आपलं दु:ख उराशी कवटाळून सगळ्यांचा आधार होतो.

मुलगी वयात आल्यावर तिचं लग्न होऊन ती परक्या घरी जाणार या विचाराने अस्वस्थ होऊन कितीतरी रात्री जागणारा बाबा तिच्यासाठी योग्य जोडीदार मिळविण्यासाठी खुप आटापिटा करतो. मुलीच्या लग्नात कशाचीही कमी राहू नये म्हणून कायम झटतो बाबा. आपल्या काळजाचा तुकडा असा परक्याच्या हाती देताना त्याला काय वेदना होतात हे फक्त तोच जाणतो. मुलीचा सुखी संसार पाहताना त्याला जो आनंद होतो तेही फक्त तोच जाणतो. मुलगी माहेरी आली की तिच्या डोळ्यांत तिच्या सुखाचा शोध घेणारा, तिला काय हवं काय नको ते बघणारा बाबा मुलीचं माहेरपण स्वतःही अनुभवतो. मुलीच्या सासरी गेल्यावर मुलगी समोर येईस्तोवर भिरभिरत्या नजरेने मुलीचि वाट बघणारे बाबा येताना तिच्यासाठी काही तरी खाऊ आणतात आणि तिच्या हातात देताना खूप सुखावतात.

दुर्दैवाने मुलीला सासरी सासुरवास असेल, ती सुखी नसेल तर त्या बापाच्या काळजाला किती चरे पडतात हे कुणी नाही समजू शकत. आपल्या हट्टापायी पळून जाणाऱ्या, नैराश्येपोटी आत्महत्या करणाऱ्या, सासर सोडून माहेरी येऊन राहणाऱ्या, अकाली वैधव्य आलेल्या मुलींचे वडिल मरणासन्न यातनेत होरपळून जातात. ही झाली मुलीच्या वडीलांची कथा. मुलाच्या वडिलांनाही त्याची तितकीच काळजी असते. मुलगा शिक्षण, नोकरी, वळण या सगळ्या आघाड्यांवर चांगला निघाला तर आईवडिलांसाठी आनंदी आनंद. अन्यथा व्यसनांच्या, नैराश्याच्या विळख्यात गुरफटलेला मुलगा म्हणजे जिवंतपणी मरणयातनाच. मुलगा नोकरीला लागला की वडिलांना वाटतं की आता जबाबदारीचं ओझं जरा हलकं होईल पण तोच मुलगा जेव्हा परदेशात जाऊन तेथेच स्थायिक होण्याचा निर्णय वडिलांना सांगतो तेव्हा त्याला पाठिंबा देतो तो बाबा. आयुष्यभराची कमाई, पेंशन किंवा रिटायरमेंटनंतर मिळालेला फंड सगळं मुलाच्या स्वाधीन करताना त्या वडिलांना खात्री असते की उतारवयात माझा मुलगा आम्हाला अंतर देणार नाही. पण बरेचदा दुर्दैवाने असं होत नाही. औषधं, दैनंदिन गरजांसाठी मुलांकडे हात पसरावे लागतात. लाचार होऊन जगावं लागतं. प्रसंगी वृद्धाश्रमाची वाट दाखविली जाते. जो बाप मुलासाठी आपलं आयुष्य पणाला लावतो, जो बाबा मुलगा शाळेतून आल्यावर त्याची तोतड्या भाषेतील बडबड ऐकत त्याच्याशी खेळण्यात रमून जातो, त्या बाबासाठी पैसा तर सोडा पण त्या बाबासोबत घालवायला थोडा वेळही नसतो मुलाजवळ. मुलींना तरी आपले बाबा हवे असतात पण नवऱ्याच्या बाबांचा दुस्वास करतात. कशाला पण??? मुलींना त्यांच्या वहिनीने त्यांच्या आईवडिलांसोबत चांगलं वागावं अशी अपेक्षा असते. तीच अपेक्षा त्यांच्याकडूनही असते हे त्या का विसरतात?

सगळ्यांच्या आयुष्यात हे पित्रृसुख, पितृछत्र असेलच असं नाही. दारू पिऊन मारझोड करणारा, व्यसनी, चोर दरोडेखोर, परिस्थितीसमोर हात टेकून आत्महत्या करणारा बाबा नको असतो कोणालाही. डोंगरभर सुखाची अपेक्षाच नाही. ओंजळभर सुखही पुरे आहे पण ते बाबाच्या सान्निध्यातच मिळावं. ICU मध्ये श्वासांसाठी मृत्यसोबत झुंजणारा बाबा पाहिला की भिती वाटते की खूप काहीतरी गमावतोय. जे बोट धरून आपण चालायला शिकलो त्या हाताला आता कंप सुटतोय. सायकल शिकवताना जे पाय मागे धावले ते सांधे आता खिळखिळे झालेय. त्या पायांमध्ये आता पूर्वीसारखा जोर नाही.

आपण मोठे होत जातो. स्वतःमध्ये रमत जातो. आपल्या प्रत्येक अडचणीत, संकटात आपण बाबाला गृहीत धरतो. कारण तो आपल्याला कधीच एकटं पडू देत नाही. पण आपण एक विसरतो की आता आपला बाबा सुद्धा थकलाय. आता त्याला आपल्या आधाराची गरज आहे. फादर्स डे तर एक निमित्त. बाबाला गृहीत धरता धरता तो मनाच्या कप्प्यात कुठेतरी ओझरता झाला होता. त्याला हे सगळं सांगायचं होतं. मला जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा तेव्हा तु न बोलावता सुद्धा माझ्याजवळ होता. पण तुला गरज असताना प्रत्येक वेळी मी नव्हते यासाठी माफी मागायची होती म्हणून या फादर्स डे चं निमित्त. बाबा नावाचा एक वटवृक्ष ज्याच्या सावलीत धगधगतं मन शांत होतं, जखमांमुळे विव्हळत असलेल्या मनावर फुंकर घातली  जाते ती या वटवृक्षाखाली. आज वटपौर्णिमा. पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाकडे मागणं मागतात. हा पती एक पिता असतो. त्याच्या दीर्घायुष्यासाठी देवाला प्रार्थना. माझी माऊली, वटवृक्षाची सावली ही उपमा वडिलांसाठी पण अगदी समर्पक आहे. या वटवृक्षाला शतश: नमन!!!!!

(लेखिका या महिलांविषयक कायद्याच्या अभ्यासिका आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या