
अध्यात्म… आध्यात्मिक विचार. म्हणजे नेमकं काय? देवदर्शन… पूजा-कर्मकांड म्हणजे अध्यात्म? सोपे-सुलभ जगणे म्हणजे अध्यात्म. आपले आचारविचार, संस्कार, वागणूक म्हणजे अध्यात्म.
अध्यात्म सकारात्मक जगायला शिकवते. ‘अध्यात्म’ या शब्दाची फोड ‘अधि’ म्हणजे शरीर व त्यात वास असणाऱयाचे ‘अयन करणे’ म्हणजे शिकणे ते अध्यात्म अशी केली जाते. अध्यात्मातील व्यक्ती वरकरणी वेडगळ वाटली तरी आतुन ती अत्यंत ज्ञानी असते व इतरांचे अज्ञान न्याहाळत असते व ते दूर करण्याच्या प्रयत्नात असते आपण आपली पात्रता वाढवण्यास शिकावे. पात्रता वाढवण्यासाठीच अध्यात्मातही प्रतिस्पर्धी हवा.
परमेश्वराने निर्मिलेल्या सर्वच गोष्टी सकारात्मक. त्या गोष्टीस जे आपले मन नकारात्मक विचाराने किंवा गोष्टीने झाकू पाहते तेव्हा त्या नकारात्मक गोष्टी किंवा विचार नष्ट करण्यास लागणारे सत्य व कृती म्हणजेच अध्याम होय.
साधारणपणे आपला देहच मन चालवत असतो. त्या मनात येईल ते आपण करत असतो. ते बरोबर की चूक हे त्याचा परिणाम ठरवत असते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा परिणाम चांगलाच व्हावा यासाठी त्या मनालाच चालवायला आपण शिकले पाहिजे. ते शिकवणारे शास्त्र म्हणजेच अध्यात्म.
मन शांत व स्वत:ला स्थिर करण्याची व एकाच परमानंद भावनेत राहण्याची कला म्हणजे अध्यात्म. मनासारखे कोणालाच जगता येत नसते, परस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म.
सत्य जाणून घेणे. वस्तुस्थिती ही सत्य आणि माया ही असत्य… तेव्हा मायेच्या मोहातून बाहेर पडण्याचा अभ्यास करणे आवश्यक असतेच म्हणून खरे सुख काय व कशात आहे हे जाणण्याचा सराव म्हणजे अध्यात्म.
द्विधा मनस्थितीत माणूस बेचैन राहतो तर एकच मनोमन पटलेली गोष्ट करण्यास तो केव्हाही तयार असतो. अशा द्वैताकडून अद्वैताकडे म्हणजे मी श्रद्धायुक्त अंतःकरणाने कोणत्याही देवाला कोठेही, केव्हाही नमस्कार केला तर तो माझ्या मनोदेवतेलाच असतो हा विश्वास शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म.
– कुठलीही धार्मिक गोष्ट नाही.
– वरिष्ठाबद्दल आदरभाव असणे.
– कनिष्ठांच्या प्रती करुणाभाव बाळगणे.
– आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेणे.
– वेद वाचण्यापेक्षा वेदना समजून घेणे.
– कुठलेही काम प्रामाणिकपणे करणं.
– आपलं कौटुंबीक आणि सामाजिक कर्तव्य पार पाडणं.
– मुक्या प्राण्यांवर, पशु-पक्ष्यांवर प्रेम करणे.
– निरपेक्ष सत्कर्म करत राहणे.
– निःस्वार्थी सेवाभाव जोपासणे.
– सदैव कृतार्थ भाव अंगी बाळगणे.
– कुठलीही अपेक्षा न ठेवता कौतुक करणे.
– आपण प्रत्येकाशी सद्भाव बाळगून त्याच सद्भावाने रहाणे.
– ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत सदैव असणे.
– आपण या समाजाचं काही देणं लागतो, ते आपण दिलेच पाहिजे अशी मानसिकता मनाशी सतत बाळगणे.
– गरजवंतांना आर्थिक किंवा शाब्दिक मदत करणे.
– आपल्या बरोबर इतरांची देखील प्रगती होवो हा भाव अंगी असणे.
– साधं, सोप, सरळ आणि निर्मळ असणं, दिसणं आणि वागणं.
-फक्त पूजा पाठ, प्रार्थना आणि भक्ती नक्हे तर… अध्यात्म म्हणजे केलेली पूजा-पाठ, प्रार्थना आणि भक्ती या प्रमाणेच कृती असणे.
– राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रीय संताचं सदैव स्मरण असणे. थोडक्यात अध्यात्म म्हणजे सकाळपासून रात्री झोपेपर्यंत नित्य कर्म, कर्तव्य पारदर्शक पद्धतीने पार पाडणे.


























































