
दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आलाय. कोरोनाचा धोका लक्षात घेता अत्यंत खबरदारीने, आरोग्याची काळजी घेऊन दिवाळी साजरी करावी लागणार आहे. अशातच कमीत कमी फटाके फोडून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरे करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मोठ्यांचे ठीक आहे, पण लहानांचे काय… फटाक्यांशिवाय लहानग्यांची दिवाळी कशी साजरी होणार? पण लहान मुलांनीच यंदा समजूतदारपणा दाखवत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाके न फोडण्याचे ठरवले आहे. प्रदूषणाला आळा घालण्याच्या मोहिमेत खारीचा वाटा उचलायचे ठरवले आहे.
दिवाळी आणि फटाके हे तर बच्चेकंपनीचे खास विषय. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यांपासून शाळा बंद आहेत. मुले घरातच आहेत. सध्या तर मुलांचा ऑनलाईन अभ्यास सुरू आहे. या सगळ्या वातावरणात आता दिवाळी येतेय. यंदाच्या वर्षी सण साजरे करण्यावर खूपच मर्यादा आल्यात. फटाक्यांमुळे वाढणारा धूर आणि प्रदूषण बघता दिवाळीत फटाके वाजवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. लहान मुले या आवाहनाला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत. त्यांनी यावर्षी फटाक्यांना बाय बाय करायचे ठरवले आहे. घरात, आईवडिल, भावंडांसोबतच नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने यंदाची दिवाळी साजरी करायचे ठरवले आहे.
निसर्गमित्रचा जागर
मुलांमध्ये प्रदूषणमुक्तीचे बीज रोवले जावे, यासाठी काही स्वयंसेवी संस्था प्रयत्नशील आहेत. कोल्हापूरची निसर्गमित्र संस्था गेली 24 वर्षे प्रदूषणमुक्त दिवाळीचा जागर करत आहेत.ज्या विद्याथ्र्यांनी दिवाळीत फटाके वाजवले नाहीत. त्यांना दोन दिवसीय सहल घडवून त्यांच्यात विज्ञानाचे बीज रोवले जात आहेत. मुले फटाके वाजवण्याचा अट्टहास करतात खरेदीसाठी बाजारात जातात. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण त्यांच्या लक्षात येत नाही. मुलांना प्रदूषणाचा पर्यावरणावर होणार परिणाम कळावा म्हणून निसर्ग मित्र चळवळ सुरू आहे, अशी माहिती संस्थेचे सेक्रेटरी अनिल चौगुले यांनी दिली.
गेल्या तीन-चार वर्षांपासून मी फटाके वाजवत नाही. ध्वनीप्रदूषण कमी करायचं आहे. त्याऐवजी आम्ही निसर्गमित्रच्या सहलीला जातो. जे फटाके वाजवत नाहीत, त्यांना निसर्गमित्रच्या सहलीला जायला मिळते. सहलीत आम्ही जंगलांची, रानभाज्यांची माहिती घेतो. – कस्तुरी जाधव, कोल्हापूर
यावर्षी मी जास्त घराबाहेर पडणार नाही. दरवर्षी आम्ही मित्र एकत्र जमून लहान फटाके वाजवतो. मात्र यावर्षी असे काहीही करणार नाही. मी स्वतः आईबाबांना फटाके नकोत.- शर्विल पारकर, कांदिवली
यंदा फटाक्यांच्या पैशांतून गरजूंना फराळ वाटप करायचे आम्ही ठरवलेय. या कामात माझे आईबाबादेखील मला मदत करणार आहे. दरवर्षी आमच्या शाळेत दिवाळीची पार्टी असते. यंदा व्हच्र्युअल सेलिब्रेशन असेल. – आयुष सानप, मुंबई सेंट्रल
प्रदूषण आणि पर्यावरणाची जाणीव ठेवून मी फटाके फोडते. कोरोनामुळे फटाक्यांवर बंदी घातली हा योग्य निर्णय आहे. प्रदूषण जाणीव राखत आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यावर्षी सर्वांनी फटाके न वाजवता दिवाळी साजरी केली पाहिजे. कोरोनाचे संकट टळल्यावर पूर्वीप्रमाणे दिवाळी साजरी करता येईल. – जान्हवी पाटील, दादर





























































