लेख – धर्म : सर्व कलांचा उद्गाता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>मेधा पाध्ये<<

[email protected]

सर्व प्रकारच्या कला या मानवी जीवनाचा आविष्कार आहे. मानवी जीवन जसजसे विकसित होत गेले त्याचबरोबर धर्म संकल्पना आणि परंपरा विकसित होत गेल्या आणि त्याचीच अभिव्यक्ती म्हणून कला आकाराला येऊ लागल्या. त्यामुळे जगभरात कुठेही जा, कोणत्याही कला या शेवटी धर्मजीवनातूनच उदयाला आलेल्या आहेत असाच आपल्याला अनुभव येईल.

आपल्या हिंदुस्थानात काय किंवा प्राचीन जगतात काय, बहुतांश कलांचा जन्म, विकास हा धर्माचे बोट धरून झाला आहे. अगदी मानव रानटी अवस्थेत होता तेव्हाही गुहांमध्ये भयानक प्राणिमात्रांची, शिकारीची चित्रे काढून मानवाने वेळोवेळी आपली भीती वा श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. जीवघेण्या शिकारीतला जयसुद्धा लयदार आवाज काढत, पदन्यास करत साजरा करत असे हा मानव. तसेच भयकारी प्राण्यांना घाबरवायलादेखील हाच मानव तऱहेतऱहेची शिंगे लावून, कातडी पांघरून, चेहऱ्यावर रंगरंगोटी करत असे. कालांतराने शेतीचा शोध लागला, मानव स्थिरावला, कुटुंबव्यवस्था गरजेची काटत स्थिरावली. भाषा आली, भावना आली. भीतीची कारणे जरा वेगळी झाली आणि मग स्थैर्यासाठी, शांततेसाठी माणूस स्थलांतर करू लागला.

गटागटाने सर्वदूर पांगल्यामुळे परत वेगळय़ाच चालीरीतींचा अंगीकार झाला. स्थानिक अशी वेगळीच संकटं उभी राहिली. आभाळातून येणाऱ्या उैन, पाऊस, वाऱ्याची, नैसर्गिक कोपाची दहशत निर्माण झाली. म्हणजे म्हटले तर निसर्ग कृपाळू आहे, पण कधीकधी विध्वंसवही आहे याची जाणीव मानवाला झाली. त्यातूनच मग निसर्ग, देवदेवता ही कल्पना उदयाला आली. मग स्वरक्षणासाठी, स्वजातीच्या भल्यासाठी या देवाला खूश करणे, देव कोपू नये म्हणून या निसर्गदेवतांची पूजा करणं, त्यांच्या मूर्ती करणं, त्यांना पुजणं अशा चालीरीती सुरू झाल्या. कुटुंबव्यवस्था असली तरी त्यातल्या हेवेदाव्यांनी, असुरक्षिततेतून, एकीचं महत्त्व पटल्यामुळे हळूहळू धर्माची रुजवण व्हायला सुरुवात झाली.

लोकसंख्या वाढली. स्थिरता आली तशी सुबत्ताही आली. मग वाढलेल्या लोकसंख्येला एका परम पण एकछत्री वर्चस्वाखाली ठेवण्यासाठी म्हणून धर्म, धर्माचा नियंता, देव-परमेश्वर, त्याच्या कृपा-कोप या भावना प्रबळपणे तत्कालीन समाजात रुजल्या. विविधांगी कारणांमुळे पांगलेली प्रजा एकत्रित आणण्यासाठी, धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मंदिरे, प्रार्थनास्थळे निर्माण झाली. याही गोष्टी स्थिरावून कमी, लहान पडू लागल्या, नगण्य वाटू लागल्या. त्यामुळे मग एकाच धाटणीची भव्य मंदिरं, प्रार्थनास्थळं निर्माण झाली. त्यांची प्रांतवार, समजुतीनुसार ठरावीक रचनाच सर्वमान्य झाली. अशा समजुतीतूनच मग शिखर असलेली मंदिरं, चर्चेस वा घुमटाकार मस्जिदी निर्माण झालेल्या, अजूनही होताहेत. मग जसा जसा धर्माचा प्रसार होऊ लागला, धर्माचे फायदे लक्षात येऊ लागले, तशा तशा या इमारती अनन्यसाधारण महत्त्वाच्या, सत्ताकेंद्रं ठरू लागल्या. समाजाचं, अर्थकारणाचं एकत्रीकरण या वास्तूत होऊ लागलं. त्यामुळे या इमारतींचं बांधकाम, सुशोभीकरण वा इथल्या ईश्वराप्रतिच्या कथा-वाक्य यांना बहर येऊ लागला. मग ईश्कराप्रति प्रेम-आदर व्यक्त करणारी गीते, काव्य रचली गेली. जोडीला वाद्यांचाही मेळ जमला. प्रार्थनास्थळी परमेश्वराचं अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करणारी चित्रं काढली गेली. नृत्य-नाटय़ रचली गेली. पृथ्वीवर जिथे जिथे प्राचीन वसाहती स्थिरावल्या तिथे तिथे आपल्याला तत्कालीन धर्माच्या, देवाच्या प्रभावानेच अनेक कला वृद्धिंगत झालेल्या दिसून येतील.

अगदी मग ती प्राचीनतम इजिप्तची मिश्र संस्कृती असो वा दोन हजार वर्षांपूर्वीची बुद्धधर्मीय संस्कृती असो. हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू वा बुद्धिस्ट वा इतर धर्म असो, थोडय़ाफार फरकाने एकाच सूत्राने त्या-त्या धर्माच्या अधिपत्याखाली स्थानिक स्रोतानुसार प्राचीन कलांचा विकास झालेला आपल्याला आढळेल.

हिंदू धर्मात मोठाली, दगडी, रचित मंदिरं उभारण्यात आली. निसर्गातल्या बहुतेक घटकांच्या देवदेवता निर्माण झाल्या, केले गेले. त्या देवतांच्या वैशिष्टय़पूर्ण मूर्ती तयार झाल्या. त्या देवतांची आराधना करणारी कवनं रचण्यात आली. देवतेची महत्ता अधोरेखित करणारी कथनं नाटय़रूपांतरित करण्यात आली. नृत्यात बसवण्यात आली. मंदिराच्या भिंती देवाची महानता दर्शवणाऱ्या चित्ररूपात रंगवण्यात आल्या. म्हणजे एका मंदिराच्या निमित्ताने बऱ्याच कलांना ओळख मिळाली, अनेक कला प्रवाहित झाल्या. अशाच पद्धतीने जगातली एक प्राचीन आणि अद्भुत अशी मिश्र संस्कृतीसुद्धा भरभराटीला आली. सूर्याचे उपासक असणाऱ्या या मिश्र संस्कृतीच्या पालकांनी देवदेवतांच्या नावे प्रचंड मोठी दगडी मंदिरे उभारली. देवाच्या नावे समारंभ आयोजित केले. देवाला, सूर्याला परमोच्च स्थानी ठेवून मानवी मृत्यूनंतरदेखील देवासारखे अमर होण्याचे मार्ग धुंडाळले गेले. त्यासाठी भव्यदिव्य पिरॅमिडस् उभारले. आज जगातले एक आश्चर्य म्हणून व वास्तुशास्त्राचा अजोड नमुना म्हणून या अफाट पिरॅमिडस्कडे बघितलं जातं. ममिफिकेशन केलेल्या शरीरांखेरीजही या पिरॅमिडस्मधे इतक्या मौल्यवान आणि कलाकुसरीचे अजोड नमुने वाटाव्यात अशा वस्तू मिळाल्या आहेत. मानवाचं शरीर जतनाचं एक शास्त्र इथे विकसित झालं. त्याचबरोबर आत्म्याच्या मरणानंतरच्या सुखकर प्रवासासाठी म्हणून मोठाले पिरॅमिडस्, टुंब्स बांधण्यात आली. वैविध्यपूर्ण कोरीव चित्रांनी या टुंब्सच्या भिंती इतक्या भरगच्चपणे चितारण्यात आल्या व रंगवण्यात आल्या, की आज ही ऐतिहासिक स्थळं जगातलं एक आश्चर्य बनली आहेत.

हिंदुस्थानातील प्राचीन अशा मोहंजोदडो संस्कृतीतसुद्धा अशाच अनेक कलांचा उगम सापडतो. मातीची घडवलेली, रंगवलेली भांडी, खेळणी, शिल्प, दागदागिने, मूर्ती, शिल्पित केलेले छापे अशा अनेक वस्तू आपल्याला त्याकाळच्या कलाप्रकारांची साक्ष देतात. इथे सापडलेल्या एका छाप्यावरचा त्रिशूळधारी मनुष्य आणि आसपासचे प्राणी हे कोरीव शिल्प हिंदू धर्मातील पशुपतीनाथाचे पहिले शिल्प मानले जाते. मोहंजोदडो येथील नगररचना बघून तर आजचे वास्तुविशारद पण थक्क होतात.

साधारण ख्रिस्तपूर्व काळात हिंदू धर्माची पीछेहाट होत बुद्ध धर्म उदयाला आला. सर्वसामान्यांपासून राजे-उमरावांपर्यंत या बुद्ध धर्माची शिकवण रुजली. धर्माला राजाश्रय मिळाला आणि त्रिखंडात या धर्माची कीर्ती पोहोचाकी, टिकावी यासाठी या धर्माचा उद्गाता गौतम बुद्ध आणि त्याची शिकवण चिरकाल टिकावी या उद्देशाने खूप मोठय़ा अलंकृत वास्तू हिंदुस्थानात तयार केल्या गेल्या. हिंदुस्थानी उपखंडात पसरलेले बांधीव, कोरीव, एक दगडी स्तूप याची साक्ष देतात. हिंदुस्थानी शिल्पकलेला एका अत्युत्तम उंचीवर नेऊन ठेवण्याचं कार्य या धार्मिक वा धर्मासाठी बांधणाऱ्या, कोरणाऱ्या व रंगकणाऱ्या कलाकारांनी केले. याच धर्माच्या रेटय़ात महाराष्ट्रात अनेक दगडी गुहा खोदण्यात आल्या. त्यातल्या संभाजीनगर इथल्या अजिंठय़ाच्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या डोंगरी खडकात कोरलेल्या व भिंती रंगवलेल्या दगडी गुहा जगप्रसिद्ध आहेत. बुद्ध धर्माच्या प्राबल्याच्या काळात हिंदुस्थानी गुहा शिल्पात खूप भरभराट झाली.

तद्नंतर पुन्हा उसळी मारत स्थिरावलेल्या हिंदू धर्मात मोठय़ा संख्येने भव्य-अतिभव्य अशा बांधीव, रचित मंदिरांची निर्मिती झाली. हिंदू कळणाच्या असंख्य देव-देवतांच्या निमित्ताने शिल्पकला फार झपाटय़ाने प्रगत झाली. अजिंठय़ाच्या गुहा तरबेजतेने रंगवणारे कलावंत हिंदू मंदिरं हिंदू देव-देवतांच्या चित्रांनी रंगवू लागली. पोथी आर्ट निर्माण करण्यातदेखील याच परंपरेच्या कलावंतांनी हातभार लावला. यातूनच पुढे मग उत्तर हिंदुस्थानी प्रांतांचे वैशिष्टय़ अधोरेखित करणारी मिनिएचर पेंटिंग्ज उदयाला आली. याचदरम्यान साधारण दोन हजार वर्षांपूर्वी इस्लाम धर्माचा उदय आणि प्रसार झाला. या धर्माच्या कडव्या नियमांमुळे या धर्माच्या अधिपत्याखाली एकाहून एक सुरेख मस्जिदी तयार झाल्या. व्यक्तिरेखाटनाला इस्लाममधे वाव नसल्यामुळे कॅलिग्राफिकली कलाकुसरीची नक्षीदार रचना करण्यात इथले कलावंत माहिर ठरले. एकेका धर्माखाली एकेका कलेला इतकं झपाटय़ाने विकसित होता आलं की, आजही या कलांचे आधुनिक आविष्कार पाहिले की ते धर्मच आठवावेत इतक्या त्या कला त्या धर्माशी निगडित झालेल्या आहेत.

ख्रिश्चन धर्मात देखणी धर्मस्थळं म्हणजे चर्चेस बांधण्यात आली. चर्चेसच्या भिंती येशू जीवनचरित्रातल्या प्रसंगांनी रेखाटण्यात आल्या. स्टेन्ड ग्लास ही अनोखी कला इथेच उदय पावली. पण हळूहळू एकूणच धर्माचा सरसकट पगडा कमी होऊ लागला. यांत्रिकीकरण झाले. दळणवळणाची साधनं काढली. मानव जास्त प्रगल्भ झाला. समाजात खुलेपणा आला. माणूस जास्त स्वकेंद्रित झाला. साहजिकच कलेनेही वेगळंच वळण घेतलं. स्वतःला भावणारी, विचारांचं स्वातंत्र्य देणारी कलाकृती करण्याकडे कलावंतांचा कल राहिला. मग धर्म, राजवट यालाही न जुमानता कलाकार आपले विचार समर्थपणे मांडू लागले. आणि त्यातूनच मग हल्लीचे आधुनिक कलाविष्कार विकसित झाले. परमस्थानी पोहोचले. पण अजूनही काही धर्मांमध्ये हा खुलेपणा नाहीये. त्यामुळे कलाविष्कारातही दडपशाही दिसून येते. तरीपण जागतिक स्तरावर नव्या तंत्रज्ञान शोधामुळे खूपच एकरूपता आली आहे. मानवाच्या विचारात खोली आली आहे, समजेत गांभीर्य स्वमर्जीने आले आहे. त्यामुळे एकूणच कलेमध्ये वैविध्यपूर्ण प्रयोग होताहेत. म्हणजे चित्रकला, शिल्पकला, गायनकला, नृत्यकला, नाटय़कला, वादनकला. अशा अनेकानेक ठळक आणि सूक्ष्म कलांचा उगम जरी धर्माशी निगडीत राहून झाला असला तरी आता हे सर्वच कलाप्रकार आपापल्या वैशिष्टय़पूर्ण कारणांनी जगतात गाजताहेत. वृद्धिंगत होत आहेत. आपापल्या शाखेत परमस्थानी पोहोचायचा प्रयत्न करताहेत. ही फार आश्वासक गोष्ट आहे.

विशेषकरून एकूणच जगतात धर्म या कल्पनेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना हे सर्कच कलाप्रकार  समाजात यशस्वीपणे स्वतंत्र बाजासह प्रवाहित होत आहेत, नावारूपाला येत आहेत हे फार कौतुकास्पद आहे. हल्ली हे सगळेच कलाप्रकार अगदी मूलभूत वैशिष्टय़ानिशी, ठाशीव वेगळेपणाने इतके समृद्ध होऊन सामोरे येताहेत की, या कलांचा उगम कधीकाळी धर्माच्या छत्रछायेखाली झाला, हे सांगूनही पटणार नाही.