
मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांच्या पाठोपाठ पद्मगंधा प्रकाशनाचे प्रकाशक तथा मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे हेही अखेरच्या प्रवासाला गेले. मराठी साहित्यात दोन्ही प्रकाशकांचे महत्त्वपूर्व योगदान राहिलेले आहे, त्यांच्या निधनाने केवळ मराठी प्रकाशन विश्वाचेच नाही, तर मराठी साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे. अरुणजी सुनील मेहता यांच्या श्रद्धांजली सभेत हजर होते. मेहतांप्रती त्यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या. रात्री झोपेत असताना त्यांचे निधन झाले. मराठी साहित्य व प्रकाशन विश्वात प्रत्येकास हळहळ वाटावी, अशीच ही दुःखद घटना होय. गतवर्षी डिसेंबर महिन्यात नाशिक येथे झालेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात ते हजर होते. ती त्यांची शेवटची भेट ठरेल असे वाटले नव्हते. अरुण जाखडे हे तर लेखक, संपादक आणि प्रकाशक होते. तिन्ही क्षेत्रांत त्यांनी आपल्या वैशिष्टय़पूर्ण कार्यकौशल्याने अमीट छाप सोडली. घरात कोणतीही साहित्यिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी लेखन, संपादन आणि प्रकाशन क्षेत्रात घेतलेली झेप ही नक्कीच कौतुकास्पद आहे. डॉ. गणेश देवी त्यांच्या संदर्भात म्हणतात, “महाराष्ट्राच्या भाषिक सर्वेक्षणात जाखडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचे मराठीसह इंग्रजी, हिंदीत प्रकाशन झाले हे जाखडे यांचे कामही भरीव आहे.’’ महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या प्राचीन मिथकांची प्रेरकता उलगडून दाखवणारा डॉ. रा. चिं. ढेरे यांचा ‘श्री तुळजाभवानी’ ग्रंथ तसेच रघुनाथ धोंडो कर्वे या विसाव्या शतकातील विचारवंतांचे विचारधन जाखडे यांनी आठ खंडांत प्रकाशित केले. बालसाहित्य विज्ञान, इतिहासावरची अनेक पुस्तके त्यांनी काढली. अरुण जाखडे हे एक सर्जनशील लेखक, साक्षेपी संपादक आणि दूरदृष्टी असलेले प्रकाशक होते.जाखडे यांनी आपल्या कार्यात नेहमी तंत्र आणि संवेदना यांचा सुंदर मेळ घातला. नगर जिह्यातील आष्टी हे त्यांचे जन्मगाव. या गावात टपाल, दवाखाना, एसटी अशा कोणत्याही सुविधा नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या आयुष्याची वीसेक वर्षे रानावनात भटकण्यात, काटय़ाकुटय़ाचा रस्ता तुडवत, नद्या- ओढे यात बागडण्यात गेली. माध्यमिक शिक्षणासाठी ते मोठय़ा गावातील वसतिगृहात राहिले. नगर येथे बीएससी प्रथम वर्गापर्यंत शिक्षण घेतले. नैराश्यातून शिक्षणाला रामराम ठोकून ‘गडय़ा, आपुला गाव बरा’ असे म्हणत गाव गाठले. मात्र आईने दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्यांनी पुन्हा नगरचे महाविद्यालय गाठले. पदवीनंतर कायनेटिक इंजिनीअरिंगमध्ये नोकरी केली. 1982 मध्ये पुण्यात बजाज टेम्पोमध्ये रुजू झाले. कारखान्यातील कामगारांचे साहित्य प्रकाशित करावे म्हणून ‘पद्मगंधा’ दिवाळी अंक 1988 मध्ये काढला. तीच अंकाची व प्रकाशनाची सुरुवात होय. नैराश्यातून शिक्षणाला रामराम ठोकल्यानंतरच्या वर्षभराच्या काळात ते निसर्ग, कुत्री, जनावरं, पशु-पक्षी, माणसात रमले. त्या भन्नाट अनुभवाचा फायदा त्यांना पुढील काळात लेखनासाठी झाला. ‘इर्जिक’ या स्तंभलेखनात त्यांनी आपले अनुभव मांडले. सदर लेखनास त्यांना मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचा पुरस्कार लाभला. या चौतिसेक वर्षांच्या काळात पद्मगंधा प्रकाशन आणि दिवाळी अंक म्हणजे अभिजात साहित्याची मेजवानी असे सूत्र जमले होते. या काळात त्यांनी भाराभर पुस्तके काढली नाहीत. जी निर्मिती करू, ती दर्जेदारच असली पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. साहित्य संमेलन अध्यक्षपदाची एक निवडणूक ते हरले असले तरी प्रकाशक परिषदेच्या संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. पद्मगंधाप्रमाणेच ते ‘आरोग्य दर्पण’ हा दिवाळी अंकही प्रकाशित करीत असत. निसर्गरम्य वातावरणात त्यांचे बालपण गेल्याने साहजिकच त्याचा परिणाम त्यांच्या संवेदनाशील मनावर होत गेला. अरुण जाखडे यांच्या अकल्पित जाण्याने मराठी साहित्य आणि प्रकाशन क्षेत्र हळहळले आहे. लेखक – संपादक आणि प्रकाशक यांचा त्रिवेणी संगम आता रिता झाला आहे.
- प्रशांत गौतम































































