लेख – ठसा – अशोक शेवडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> माधव डोळे

काही वर्षांपूर्वी फक्त दूरदर्शन आणि आकाशवाणी ही दोनच मनोरंजनाची माध्यमे होती. व्हाट्सअॅप, ओटीटी, नेटफ्लिक्स, फेसबुक यांसारखा फास्ट सोशल मीडिया नव्हता. सिनेमागृहे आणि नाटय़गृहे हाऊसफुल्ल चालायची. मुलाखती, गाण्यांच्या मैफली यांसारखे कार्यक्रम स्टेजवरून व्हायचे. याच काळात अशोक शेवडे हे एक प्रमुख नाव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटलावर उदयाला आले. स्टेट बँकेतील नोकरी करत असतानाच हजरजबाबीपणा, अभ्यासू वृत्ती आणि उत्कृष्ट सादरीकरण या जोरावर शेवडे यांनी नामवंतांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली.

मराठी वाद्यवृंदांचे यशस्वी निवेदन केले. काही नाटकांची संहिताही लिहिली. साहित्यापासून राजकारणापर्यंत अनेक नामवंत व्यक्तींच्या मुलाखती घेणे हा त्यांचा हातखंडा. अशोक शेवडे यांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यापासून माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्यापर्यंत अनेकांच्या आपल्या खास शैलीत मुलाखती घेतल्या. त्यात नाना पाटेकर, रमेश देव, दादा कोंडके, आशा काळे, कविवर्य कुसुमाग्रज, सुधीर फडके, बाबासाहेब पुरंदरे, सुशीलकुमार शिंदे आदींचा समावेश आहे. शेवडे यांनी ‘ऊठ मर्दा, कोंबडं आरवलंय’, ‘पण लक्षात कोण घेतो’ ही नाटके लिहिली. तसेच अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले. अफाट जनसंपर्क आणि समोरच्या व्यक्तीला बोलते करण्याची हातोटी. यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला नेहमी गर्दी व्हायची. गणेशोत्सवामध्ये अशोक शेवडे यांचा कार्यक्रम हा ठरलेला असायचा.

दिलखुलास मुलाखतकार, लेखक, दिग्दर्शक, कुशल संयोजक असे अनेक गुण त्यांच्यामध्ये होते. साहित्य, संस्कार आणि मनोरंजन याचा त्रिवेणी संगम असलेला ‘चंदेरी सोनेरी’ हा त्यांचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय झाला. निवेदिका प्राची देवस्थळी यांच्या साथीने शेवडे यांनी अनेक कार्यक्रम गाजवले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून अगदी मनोहर जोशी, पु. ल. देशपांडे, राम कदम, सुशीलकुमार शिंदे, वामनराव पै अशा अनेक दिग्गजांनी शेवडे यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. खरे तर मुलाखत घेणे ही एक वेगळी कला आहे.

ती कुणालाही सहजपणे साध्य होत नाही. त्यासाठी चिकाटी, अभ्यास आणि माणसे वाचण्याची कला अवगत असायला हवी. ही कला शेवडे यांच्याकडे होती आणि म्हणूनच त्यांच्या ‘चंदेरी सोनेरी’ या कार्यक्रमाने चारशेचा टप्पा गाठला होता. 30 वर्षे त्यांनी चित्रपट व नाटय़ क्षेत्रात एखाद्या झपाटल्याप्रमाणे पत्रकारिता केली. अनेक वृत्तपत्रांमध्ये दमदार लेखन केले. 1985 साली झालेल्या ‘नाटय़दर्पण रजनी’ या कार्यक्रमाचे मच्छिंद्र कांबळी यांच्यासोबत केलेले सूत्रसंचालन यादगार ठरले. त्यांनी अनेक क्षेत्रांत काम केले, पण मुलाखती हा त्यांचा खास वीक पॉइंट होता. पाच हजारांहून अधिक दिग्गजांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या. ‘गोष्ट कामगारांच्या कल्याणाची’ या त्यांच्या लघुपटाला महाराष्ट्र सरकारचा 1988 साली विशेष पुरस्कार मिळाला होता. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या कार्यकारिणीवर त्यांनी काम केले. त्याशिवाय महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पेंद्रीय फिल्म सेन्सॉर बोर्ड येथेही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला.

स्टेट बँकेत 25 वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी चित्रपट व नाटक आणि साहित्यासाठी वेळ मिळावा म्हणून व्हीआरएस घेतली. शेवडे यांनी काही पुस्तकेही लिहिली. ‘आठवणी- चंदेरी-सोनेरी’ हे पुस्तक विशेष गाजले. ‘ऊठ मर्दा, कोंबडं आरवलं’ या त्यांनी लिहिलेल्या लोकनाटय़ाचे दिग्दर्शन दिलीप कोल्हटकर यांनी केले होते. ‘पण लक्षात कोण घेतो’ हे त्यांचे नाटक दूरदर्शनवर गाजले. त्यात प्रभाकर पणशीकर, डॉ. गिरीश ओक, स्मिता पाटील, पल्लवी प्रधान अशा दिग्गज कलाकारांनी भूमिका बजावल्या. रंगभूमी, मुलाखती, संगीत अशा अनेक क्षेत्रांमध्ये काम करणारे अशोक शेवडे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाने गाठले. ते बरे होतील याची अनेकांना खात्री होती. पुन्हा एकदा माईक हातात घेऊन मी मुलाखत घेईन अशी त्यांची जिद्द होती. सांस्कृतिक क्षेत्रात सुमारे पन्नास वर्षे आपल्या चंदेरी-सोनेरी स्टाईलने मुलाखती घेऊन आपला लखलखाट निर्माण करणारा जिद्दी कलाकार हरपला, पण त्यांनी घेतलेल्या मुलाखती आणि हा सांस्कृतिक लखलखाट मराठी माणसाच्या हृदयात कायम राहील.