आभाळमाया – अवकाशातील आदळआपट

856

पाच अब्ज वर्षांपूर्वी आपला सूर्य आणि त्यापाठोपाठ आपली सूर्यमाला निर्माण झाली. त्याबाबत पूर्वी असा समज होता की, आपल्या सूर्याजवळून आणखी एक तारा गेला आणि त्यांच्या टकरीतून सूर्यमाला अस्तित्वात आली. परंतु नंतर झालेल्या अभ्यासातून असं लक्षात आलं की ज्या प्रचंड तेजोमेघातून (नेब्युला) सूर्याची निर्मिती झाली त्यातूनच इतर सारे ग्रहसुद्धा निर्माण झाले. सूर्याच्या अंतर्भागात हायड्रोजनसारखं हलकं द्रव्य सापडलं तर जड मूलद्रव्य पृथ्वीसारख्या ग्रहांवर सापडतात.

आपल्या चंद्राची निर्मिती मात्र पृथ्वीवर एक लघुग्रह पृथ्वीच्या जन्मकाळातच आदळला आणि तो पृथ्वीत विलीन होत असताना जे द्रव्य बाहेर फेकलं गेलं त्यापासून चंद्र आकाराला आला. आधुनिक खगोलीय संशोधनाची महती अशी की आता या अब्जावधी वर्षांपूर्वीच्या अवकाशी घटनांचं यथार्थ स्वरूप समजून येऊ शकतं. म्हणूनच 1916 मध्ये आइन्स्टाईन यांनी गुरुत्वीय लहरींचा (ग्रॅव्हिटेशनल वेव्हज) सिद्धांत मांडला. तो 2016 मध्ये ‘लायगो’ प्रकल्पातून प्रत्यक्ष जाणवला. अवकाश संशोधनातील ही प्रगती गतकाळातील म्हणजे माणूस नावाचा प्राणीच नव्हे तर एकूणच सजीवसृष्टी अस्तित्वात येण्यापूर्वीच्या अनेक खगोल ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेण्याचा मार्ग प्रशस्त करीत आहे.

गेल्या जुलै-ऑगस्टमध्ये, अमूक एक ऍस्टेरॉइड किंवा अवकाशात भरकटणारा एक महापाषाण (अशनी) पृथ्वीवर आदळेल आणि पृथ्वीवर मोठा उत्पात होईल अशा बातम्या येत होत्या. त्यातील एक एक पृथ्वीपासून सुमारे पन्नास हजार किलोमीटरवरून पसार झाला. पृथ्वीच्या आरंभ काळात या ग्रहाने अशनींचे असे असंख्य आघात झेलले आहेत. पृथ्वीवर माणसाची प्रगत वसाहत होण्याआधी आदळलेल्या अशनींच्या खाणाखुणा कॅनडातील न्यू क्वेबेक, अमेरिकेतील बॅरिंजर आणि आपल्या महाराष्ट्रातील लोणारसारख्या विवरांबद्दल स्पष्ट होतं. त्यामुळे पुन्हा असं घडणारच नाही असं नाही, पण तारखा देऊन उत्पाताची भाकितं करणाऱयांचं म्हणणं गेल्या साठ वर्षांत तरी सुदैवाने खोटं ठरलंय. त्यातही पृथ्वीवरच्या दाट वातावरणामुळे अवकाशात भिरभिरणारे बरेचसे लहान-मोठे दगडगोटे उल्का किंवा फायरबॉल (अग्निगोलक) या स्वरूपात केवळ चमचमत खाली येताना दिसतात; परंतु ते पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाहीत. यातील (पार्सिअस) किंवा सिंह (लिओ) तारकासमूहाच्या पार्श्वभूमीवर दिसणाऱया अशा उल्कावर्षावांच्या तारखाही ठरलेल्या आहेत. पुढच्या महिन्यात सोळा ते अठरा नोव्हेंबर या काळात सिंह राशीच्या पार्श्वभूमीवर मोठा उल्कावर्षाव दिसू शकतो. मात्र तो आपल्या निरीक्षणासाठी किती अनुकूल आहे ते पाहावं लागत. 1998 मध्ये आम्ही याच काळात एका रात्री ताशी दोनशे ते अडीचशे उल्का आणि अग्निगोलक पाहिले होते. ही ‘फेव्हरेबल’ स्थिती म्हणजे काय याविषयी त्याच वेळी जाणून घेऊ.

तर मुद्दा अवकाशस्थ आदळआपट होण्याचा. दोन महिन्यांपूर्वी आलेल्या एका अवकाश वृत्तात असं म्हटलं होतं की, स्वीडनमधल्या अवकाश अभ्यासकांनी पृथ्वीवरच्या आजच्या वातावरणातील थंडाव्यासाठी अशनींच्या एका टकरीमुळे निर्माण झालेल्या धुळीने पृथ्वीवरचं 47 कोटी वर्षांपूर्वी अतितप्त असलेलं वातावरण सजीवसृष्टीला पूरक ठरेल इतपत शीत केलं, आजही अवकाशातील छोटय़ा-मोठय़ा आदळआपटींमधून निर्माण होणारी सुमारे 40 हजार टन धूळ पृथ्वीवर दरवर्षी पडत असते.

47 कोटी वर्षांपूर्वी 90 मैल रुंदीचा एक प्रचंड महापाषाण, मंगळ आणि गुरू यांच्यामधल्या कक्षेत फिरणाऱया एका अज्ञात अवकाशस्थ वस्तूला एवढय़ा जोरात धडकला की त्या टकरीतून निर्माण झालेली प्रचंड धूळ पृथ्वीकडे पुढली 20 लाख वर्षे येत राहिली. ही धूळ आरंभकाळात एवढय़ा व्यापक प्रमाणात पृथ्वीला लपेटून राहिली की त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत प्रखर सूर्यप्रकाश पोहोचणं कठीण झालं. परिणामी पृथ्वीवर उठलेल्या शीत लहरीने हिमयुगच अवतरलं.

याच काळात पृथ्वीवर काही ठिकाणी समशीतोष्ण भागही असतील तेथे सूक्ष्म जीव आणि सूक्ष्म वनस्पतींची निर्मिती होऊ लागली. साधारण 25 अंश सेल्सिअसच्याही खाली तापमान खूप काळ राहिलं आणि त्यामुळे पृथ्वीचा एक ऊबदार ‘इन्क्युबेटर’ झाला असणार. सजीवनिर्मितीला आणि त्यांच्या वाढीला मंगळ-गुरू यांच्यामधल्या पट्टय़ातील विशाल अशनींची टक्कर खूपच उपकारक ठरली. अर्थात ही टक्कर पृथ्वीपासून बरीच दूर होती.

मात्र प्रत्येक अशनी इतका उपकारक असेलच असं नाही. 65 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर आदळलेल्या विशालकाय अशनीने या ग्रहावर लाखो वर्षे राज्य करणाऱया डायनॉसोर या महाकाय प्राण्यांचा संपूर्ण विनाश केला. अवकाशातील काही आदळआपट आणि टक्कर-धडक यांचा पृथ्वीला कधी प्रचंड फायदा झालाय तर कधी भीषण ठरलाय. विराट निसर्ग निर्हेतुक असतो हेच खरं.

आपली प्रतिक्रिया द्या