लेख – ‘दर्पण’ वृत्तपत्राची जन्मकथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> योगेंद्र ठाकूर

मराठी वृत्तपत्र व्यवसायाचा प्रारंभ प्रथम मुंबईतच झाला व तोही पहिले गुजराती वृत्तपत्र निघून दहा वर्षांचा काळ लोटल्यानंतर झाला. शिक्षणामुळे वृत्तपत्रासारखी साधने आपण निर्माण करावी अशी इच्छा मुंबईतील मराठी समाजात निर्माण झाली. मराठी वृत्तपत्र अशाच प्रक्रियेतून जन्मास आले. प्रबोधनाची आणि पाश्चात्य विद्येचा परिचय करून देण्याची प्रेरणा त्यामागे होती. अशा खटपटीतूनच बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ सुरू केले. ‘दर्पण’ पत्राचा पहिला अंक शुक्रवार 6 जानेवारी 1832 रोजी प्रकाशित झाला. आज मराठी वृत्तपत्रांचा डोलारा उभा आहे. त्याचा पाया ‘दर्पण’ वृत्तपत्राने घातला.

देशी भाषेतील पहिली वृत्तपत्रे बंगालमध्ये सुरू झाली. त्यामुळे ती बंगाली आणि पारशीमध्ये निघणे अपरिहार्य होते. बंगालमधील श्रीरामपूरच्या कॅरे आदी बापिस्ट मिशिनऱयांनी धर्मप्रसाराच्या निमित्ताने आपला मोर्चा बंगाली भाषिक वृत्तपत्राकडे वळविला आणि एप्रिल 1818मध्ये ‘दिग्दर्शन’ हे मासिक सुरू केले. असे असले तरी खऱया अर्थाने 23 मे 1818 रोजी सुरू करण्यात आलेले ‘समाचार दर्पण’ हे बंगाली भाषेतील साप्ताहिक बंगालमधील पहिले वर्तमानपत्र म्हणून ओळखले जाते. देवनागरी लिपितील हिंदी पत्र सुरू झाले तेही कलकत्यातच. जुगलकिशोर शुक्ल यांनी 30 मे 1826 रोजी ‘उदन्त मार्तेड’ हे हिंदी पत्र सुरू केले. परंतु ते एका वर्षातच बंद पडले. कलकत्यापाठोपाठ पण मुंबईच्या आधी मद्रासला वृत्तपत्रे सुरू झाली. दक्षिण हिंदुस्थानातील तामीळ, मल्ल्याळम भाषांतील वृत्तपत्रे आज आघाडीवर असली तरी सुरुवात संथगतीनेच झाली होती. मद्रासच्या ख्रिश्चन रिलिजस सोसायटीने 1831 साली ‘तामीळ मॅगझिन’ सुरू करून तामीळ वृत्तपत्राचा श्रीगणेशा केला. उर्दू भाषेतील पहिले वृत्तपत्रही कलकत्त्याहूनच निघाले होते. उर्दू भाषेतील पहिले वृत्तपत्र म्हणून ‘जाम-ए-जहाँनुमा’ याचा मे 1821मध्ये सुरू झाल्याचा उल्लेख इतिहासात आहे. अशा रीतीने कलकत्ता आणि मद्रास येथून भाषिक वृत्तपत्रे निघू लागली. परंतु मुंबईतून एकही पत्र 1822 सालापर्यंत निघाले नाही. 1822 साली पारशी गृहस्थ फर्दुनजी मर्झबन यांनी ‘मुंबईना समाचार’ हे साप्ताहिक गुजरातीतून सुरू केले. ते आजही ‘मुंबई समाचार’ या नावाने निघत आहे. सध्या सुरू असलेले ‘मुंबई समाचार’ हे सर्वात जुने भाषिक वृत्तपत्र आहे. त्यानंतर गुजराती भाषेत सुरुवातीस जी वृत्तपत्रे निघाली ती मुंबईतच. त्यात पारशी समाजाचा सिंहाचा वाटा होता. मोबेद नवरोजी दोराबजी यांनी सप्टेंबर 1930पासून ‘मुंबई वर्तमान’ सुरू केले तर 1931मध्ये पारशी समाजाचे मुखपत्र म्हणून पेस्तनजी मोतीवाला यांनी ‘जाने जमशेद’ हे पत्र सुरू केले.

अशा रीतीने कलकत्ता, मद्रास व मुंबई येथून भाषिक वृत्तपत्रे सुरू होऊन 13-14 वर्षे लोटल्यानंतर मराठी वृत्तपत्रे सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मुंबईत मराठी, गुजराती, पारशी लोकांची वस्ती होती. गुजराती आणि पारशी लोकांची वाचनाची भूक भागत होती. परंतु मराठी माणूस वृत्तपत्र वाचनापासून भुकेला होता. मराठी वृत्तपत्र व्यवसायाचा प्रारंभ प्रथम मुंबईतच झाला व तोही पहिले गुजराती वृत्तपत्र निघून दहा वर्षांचा काळ लोटल्यानंतर झाला. मुंबईत गुजराती वृत्तपत्र निघाल्यावर मराठी वृत्तपत्र निघणे ही काळाची गरज होती. शिक्षणामुळे वृत्तपत्रासारखी साधने आपण निर्माण करावी अशी इच्छा मुंबईतील मराठी समाजात निर्माण झाली. राजा राममोहन रॉय यांच्यासारख्या विचारवंतांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी वृत्तपत्राचा मार्ग चोखाळला होता. याच्या बातम्या मुंबईत येत होत्या. मुंबईत आधीच सुरू झालेली इंग्रजी व गुजराती वृत्तपत्रे समोर होतीच. त्यामुळे मराठी भाषक वृत्तपत्राकडे वळणे अपरिहार्य होते. मराठी वृत्तपत्र अशाच प्रक्रियेतून जन्मास आले. प्रबोधनाची आणि पाश्चात्य विद्येचा परिचय करून देण्याची प्रेरणा त्यामागे होती. मग लोकसंवादाचे वृत्तपत्र हे साधन अस्तित्वात आणण्याच्या खटपटी सुरू झाल्या.

अशा खटपटीतूनच बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ सुरू केले. ‘दर्पण’ पत्राचा पहिला अंक शुक्रवार 6 जानेवारी 1832 रोजी प्रकाशित झाला. सुरुवातीस ‘दर्पण’ हे काही महिने पाक्षिकच होते. परंतु पंधरा दिवसात बातम्या शिळ्या होत होत्या म्हणून 4 मे 1832च्या अंकापासून ‘दर्पण’ साप्ताहिक झाले. ‘दर्पण’ पत्रात इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांत मजकूर प्रसिद्ध होई. त्याकाळी बंगालीमधून ‘समाचार दर्पण’ नावाचे पत्र निघत असे आणि त्यातही बंगाली व इंग्रजी भाषांतून मजकूर असे. बाळशात्री जांभेकरांना मराठी, इंग्रजी, उर्दू, पारशी, गुजराती आणि बंगाली भाषा अवगत होत्या. त्यामुळे साहजिकच त्यांच्यावर बंगाली भाषेचा पगडा असणे स्वाभाविकच आहे. राजा राममोहन रॉय यांच्या विचारांचाही पगडा त्यांच्यावर होता. हे त्यांच्या लिखाणातून जाणवत असे.

‘दर्पण’ पत्र प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी या वृत्तपत्राच्या काही प्रती सरकारने घ्याव्यात असा अर्ज केला होता. ‘दर्पण’ पत्र सुरू करण्याचे मुख्य उद्दिष्टय़ हे ज्ञानप्रसार होते. हे करताना बाळशास्त्री जांभेकरांपुढे बंगालचे उदाहरण होते. ‘लोकस्थिती, धर्मरीती आणि उपयोगी फेरफार घडवून आणणे’ हे नियतकालिकेचे कर्तव्य आहे, अशी त्यांची धारणा होती. लोकांना ज्ञान देण्याच्या मूळ हेतूला धक्का न लावता सर्व विषयाला स्थान ‘दर्पण’मध्ये होते. वाचकांची पत्रेही आवर्जून छापली जात. ‘दर्पण’ पत्राचा दर्जा उच्च राखण्याचा कसोशीने प्रयत्न बाळशास्त्री यांनी केला. त्यामुळे ‘दर्पण’ पत्र लोकमित्र झाले आणि मराठी समाजात प्रतिष्ठाही लाभली. असं हे लोकप्रिय पत्र ‘दर्पण’ 1840 मध्ये ते बंद करण्यात आले. बाळशास्त्री जांभेकरांनी 26 जून 1840च्या अंकात ‘Last Farewell’ हे निरोपाचे संपादकीय लिहून वाचकांचा निरोप घेण्यात आला. संपादकीयात असे म्हटले होते की, ‘दर्पण’ पत्र निघाले तेव्हा हिंदू समाजाला मराठी वृत्तपत्राचा परिचय झालेला नव्हता. मराठी वृत्तपत्र निघाले नव्हते. धार्मिक व राजकीय बाबतीत उदार विचार प्रसूत करून जनतेत वृत्तपत्राविषयी आवड निर्माण करण्याच्या हेतूने हे पत्र काढण्यात आले होते.’ आज मराठी वृत्तपत्रांचा डोलारा उभा आहे. त्याचा पाया ‘दर्पण’ वृत्तपत्राने घातला हे सत्य आहे.