लेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>वैजयंती कुलकर्णी<<

लोकशिक्षणासाठी नाथांनी स्वतः कृती करून दाखविली. आदर्श घालून दिला. आपण माणूस आहोत ही जाणीवही विसरलेल्या समाजाच्या एका मोठय़ा घटकाला नाथांनी जवळ केले. नाथांनी महाराष्ट्राच्या लोकपरंपरा लोकशिक्षणातून समृद्ध केल्या. कितीतरी रूपकांच्या माध्यमांतून नाथांनी समाजाला जागे केले. म्हणूनच तळागाळातल्या लोकांना संत एकनाथ आपले वाटले. संत एकनाथांनी अनेक भारुडांतून समाजाला जाग आणली. जाती–भेदांचे जोखड लोकांच्या मानेवरून काढण्याचा प्रयत्न केला.

‘शब्दाहून आचार मोठा’ असलेले संतश्रेष्ठ एकनाथ महाराज मानव संस्कृतीचा लखलखता अलंकार आहेत. नाथांच्या चरित्रात आणि चारित्र्यात काय आहे यापेक्षा काय नाही? हा प्रश्न पडतो. आदर्श गृहस्थाश्रमी, प्रपंच-परमार्थ दोन्हीत श्रेष्ठ आणि श्रेष्ठ समाजसुधारक, पददलितांचे उद्धारक, महान कवी, उत्तम टीकाकार, थोर तत्त्वज्ञ, श्रेष्ठ संत, अत्युच्च कोटीचे कीर्तनकार, सर्वोत्तम प्रवचनकार, आदर्श शिष्य, क्रती सद्गुरू, मायमराठीचे सुपुत्र, संस्कृतचे गाढे अभ्यासक, शांतीदया तर प्रत्येकावर किती करावी? हा प्रश्नच उभा राहतो. चांगला साधक, गृहस्थाश्रमी साधकांचा दीपस्तंभ, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत समाजाचे सत्त्व राखणारा श्रेष्ठ सत्त्वस्थ!

संत एकनाथ क्रांतिकारक संत म्हणावे लागतील. कोणताही बोलघेवडेपणा न करता त्यांनी अंगिकारलेले अस्पृश्योद्धाराचे ‘क्रत’ थक्क करणारे आहे. नाथांनी ‘अद्वैत’ तत्त्वज्ञान व्यवहार्य केले. लोकपरंपरा संस्कृतीला समृद्ध करतात हे नाथांना चांगले कळले होते. रूपके आणि भारुडांच्या माध्यमातून नाथांनी अवघड तत्त्वज्ञान सोपे करून लोकभाषेतून जनसामान्यांपर्यंत पोचविले. लोकपरंपरेचे एक भव्य व्यासपीठ नाथांनी जनसामान्यांच्याच सहकार्याने निर्माण केले. अनेक लोकोत्तर गुणांचा संगम नाथांजवळ होता. सन्मार्ग दाखविणे खूप सोपे असते, पण स्वतः तो आचरणात आणणे खूप अवघड असते. ‘बोले तैसा चाले। त्याची वंदावी पाऊले।’ या तुकारामाच्या वचनासारखेच एकनाथ होते.

संत एकनाथांच्या काळातील समाज हा अधःपतित समाज होता. अशा समाजात माणसे खूपच स्वार्थी असतात. अशा समाजात  शब्दाप्रमाणे वागणारे नाथ खरंच अलौकिक होते. जनार्दनस्वामींच्या कृपेमुळे वारकरी संप्रदायाचा अभ्यास आणि दृष्टी नाथांना लाभलेली होती. समाजामध्ये वावरताना या किंवा कोणत्याही परंपरेचा आग्रह असा नाथांनी धरला नव्हता. ‘अधिकार तैसा करू उपदेश।’ या न्यायांने नाथांनी समाजाला शिकविले. लोकशिक्षणासाठी त्यांनी अगदी सोपे मार्ग सांगितले. मरगळलेल्या, आक्रमणांनी घेरलेल्या समाजाला क्रांतीचा विचार पेलतोच असं नाही.

लोकशिक्षणासाठी नाथांनी स्वतः कृती करून दाखविली. आदर्श घालून दिला. त्या काळाप्रमाणे दलितांची सावलीसुद्धा कोणी स्वीकारत नव्हते तेव्हा नाथांनी त्यांना आलिंगन दिले. असं कार्य द्रष्टा महापुरुष करू शकतो. आपण माणूस आहोत ही जाणीवही विसरलेल्या समाजाच्या एका मोठय़ा घटकाला नाथांनी जवळ केले. त्यांचे हरवलेले व्यक्तिमत्त्व त्यांना दाखवून दिले. त्यांच्या बोलीभाषेतूनच त्यांनी त्यांना शिकविले. त्या बहुजन समाजाशी संवाद केला. बहिष्कृत झालेल्या समाजाला त्यामुळे संजीवनच मिळाले. नाथांनी महाराष्ट्राच्या लोकपरंपरा लोकशिक्षणातून समृद्ध केल्या. जोशी, वासुदेव, आंधळा, पांगळा, बहिरा, मुका, पिसा, खेळिया, सरोदा, दिवटा, डोंबारी, कैकाई, माळी, जंगम, भुत्या, वाघ्या संन्यासी, चोपदार, शंखीण, सौरी, कान्होबा, पाखरू, पिंगळा, वटवाघूळ, टिटवी, पोपट, सर्प, विंचू, बैल, गाय, एडका, कुत्रे, बाजार, व्यापार, कहाणी, नीती, पाळणा, चौघडा, रहाट, नवलाई, जागर, धावा, शिमगा, होळी, जोगवा, गारुडी, फुगडी, दरवेशी, वैदू अशा कितीतरी रूपकांच्या माध्यमांतून नाथांनी समाजाला जागे केले. त्यांचं निरीक्षण यावरूनच कळून येतं. म्हणूनच तळागाळातल्या लोकांना संत एकनाथ आपले वाटले.

संत एकनाथांचा काळ यवनांच्या आक्रमणांनी भरलेला होता. त्यामुळे समाज स्थिर नव्हताच. अशा समाजाला जागृती आणण्याचा आणि कर्मकांडामध्ये न अडकता समाज कसा सुधारता येईल हाच नाथांनी विचार केला. लोकभाषेतील जेवढय़ा परंपरा लोकरीतीनुसार ‘बहुरूढ’ त्यांना भारूड म्हणतात. नाथांची भारुडे लोकशिक्षणासाठी, जनजागृतीसाठीच उपयोगी आहेत.

भारुडाचा वाच्यार्थ गौण (महत्त्वाचा नाही), पण पारमार्थिक अर्थ खूप महत्त्वाचा आहे. नाथांचा ‘ज्योतिषी’ संतसंगतीने जन्म-मरण फेरा चुकविण्याचा उपदेश करतो. ‘वासुदेव’ दुर्गुण टाकून सद्गुणांसंगे – ‘‘सुख-दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ/ज्ञानाचा ज्ञानाचा उद्बोध भक्तिप्रेमाचा कल्लोळ।’ अशी स्थितप्रज्ञता अंगी बाणविण्यास सांगतो. मोहभ्रांतीचा अंधार सोडून गुरुसंगतीत राहण्याचे ‘आंधळा’ सांगतो. भ्रमात अडकल्याने कल्पनेच्या भ्रांतीची दैन्यावस्था सांगून असले पांगुळपण विवेकाने दूर करण्याचा मार्ग ‘पांगळा’ चालून दाखवितो. हरिकीर्तन न ऐकता बहिरा झालेला एका जनार्दनी कृपेने श्रवणास लागतो आणि ‘मुका’ बोलका तत्त्वज्ञ होतो. ‘खेळिया’ जातीपातीची बंधने तोडून ‘सर्वं खल्विदं ब्रह्म’चा साक्षात्कार घडवितो. ‘सरोदा’ ढोलके वाजवून सत्त्व भूमिकेतून परमार्थ हाती कसा येतो याचा उपदेश करतो. ज्ञानाच्या मशाली पेटवून भक्तिपेठा वसविण्याचे काम ‘दिवटा’ करतो. ‘कैकाई’ जिवाशिवाची एक मिठी कशी असते याचे मार्गदर्शन करते. ‘मानभाव’ शेंदरी-हेंदरी दैवते बाजूला सारून सात्त्विक दैवतांना पूजतो. लोकांकडून पुजवितो. हरिनामाच्या माळा गळय़ात घालून ‘जंगम’ आत्मलिंगाची पूजा बांधतो. अविनाशी ‘बायला’ अठरा मुलांना जन्म देतो म्हणजे अठरा पुराणांनाच जन्म देतो. एका जनार्दनाप्रमाणे समरसता आली तर प्रपंच सुखाचा होण्याची भाषा ‘दादला’ करतो. बोधाची परडी आणि ज्ञानाची संबळ घेऊन ‘भुत्या’ नाचतो. ‘शंखीण-उंखीण’ म्हणजे माया-ममता. त्या घरात आल्या म्हणजे घरची ‘शांती’ बाईल घराबाहेर जाते. नाथांचे ‘पाखरू’ म्हणजे परमात्मा कृष्ण मायबाप विन म्हणजे निर्गुण, निराकार परब्रह्मच आहे. ‘पिंगळा’ प्रबोध करतो. समाजातील भेदांचे प्रतीक म्हणजे ‘वटवाघूळ’ आहे. पंचमहाभूतांच्या पिंजऱयात विषयाचा जीव ‘पोपट’ गुंतला आहे. माणसाला बेभान करणारा कामक्रोधाचा ‘विंचू’ सावधानतेचा इशारा देतो. नाथांची बहुगुणी ‘गाय’ पंढरीत भक्तांच्या कल्याणासाठी उभी आहे. मदनरूपी ‘एडका’ विवेक, वैराग्याची वेसण घालून आवरता येतो. ‘बाजार’ हे संसाराचे प्रतीक आहे. संतसंगाशिवाय त्यातून सुटका नाही. विवेकाचा अंकुश नसलेली बुद्धी म्हणजे ‘थट्टा’ होय. भोवतालचे अवघे मायामय विश्व म्हणजे ‘स्वप्न’ होय. चित्त उन्मनी हरवतो तो ‘पाळणा’ आहे. असंख्य भक्तांचा उद्धार करणारा नाथांचा ‘चौघडा’ हरिनामाचा आहे. ज्ञानाग्नीत घालून जाळण्यासाठी देह चतुष्टय़ाची ‘होळी’ आहे. बोधाचे कुंकू कपाळी, भक्तीची काठी हाती अशी नाथांची ‘नवलाई’ आहे. ‘जागर’ हरिनामाचा आहे. ‘किल्ला’ हे नरदेहाचे अप्रतिम रूपक होय. नाथांचा ‘जागल्या’ ईश्वररूपी मालकाजवळ जाऊन जन्म-मरणाची खेप चुकवितो.

संत एकनाथांनी अशा अनेक भारुडांतून समाजाला जाग आणली. जाती-भेदांचे जोखड लोकांच्या मानेवरून काढण्याचा प्रयत्न केला. त्या काळाप्रमाणे त्यांनी भारुडातून लोकशिक्षण दिले. त्यांचं अफाट कार्य पाहायला आपल्या जवळ ज्ञानाचे डोळे हवेत.