
>> महेश खरे
महाराष्ट्रामध्ये शिल्पकलेची मोठी परंपरा आहे. साऱ्या जगामध्ये अद्वितीय अशी अखंड दगडात कोरलेले कैलास लेणे याच मातीत शिल्पकारांनी घडविले. शिल्पकार करमरकर, म्हात्रे, तालीम यांनी घडविलेली तालीम देशविदेशात नावाजली गेली. याच परंपरेतले एक नाव म्हणजे 95 वर्षांचे समृद्ध व पृतार्थ आयुष्य जगलेले शिल्पकलामहर्षी सदाशिवराव तथा भाऊ साठे.
बालपणी चुलत्यांच्या गणपतीच्या कारखान्यात सदाशिवराव तथा भाऊ साठे यांच्या हाताला जी चिकणमाती लागली ती अखेरपर्यंत त्यांच्या मनाला चिकटूनच राहिली. काका हरिभाऊ साठे यांच्याकडे गणेशमूर्ती, महालक्ष्मीचे मुखवटे साकार करत करत पुढे सदाशिवभाऊंनी सर ज. जी. कला महाविद्यालयातून शिल्पकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. नंतर काही काळ राजकमल स्टुडिओच्या कला विभागात नशीब आजमावण्याचा प्रयत्न करून त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. मग नव्या क्षितिजावर आपल्या कलेचा आविष्कार करण्यासाठी ते दिल्लीला रवाना झाले. काही वर्षे दिल्लीत कलानिर्मिती करून मग ते महाराष्ट्रात परत आले.
सदाशिवरावांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत अनेक उत्तमोत्तम व्यक्ती, समूह व स्मारक शिल्पे घडविली आहेत. दिल्ली महानगरपालिकेसाठीचा महात्मा गांधींचा पूर्णापृती पुतळा, मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथील सुप्रसिद्ध असा अठरा फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, ग्वाल्हेर येथील झाशीच्या राणीचा पुतळा, लाल किल्ल्यासमोरील उद्यानातील नेताजी सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेनेतील सैनिकांचे समूहशिल्प इ. अनेक भव्य शिल्पे देशभरात अनेक ठिकाणी उभी आहेत. हिंदुस्थानचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन, हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सुप्रसिद्ध अर्थतज्ञ व हिंदुस्थानचे माजी अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख, महर्षी धोंडो केशव कर्वे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जयप्रकाश नारायण, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, इंग्लंडच्या राणीचे पती प्रिन्स फिलिप, हिंदुस्थानचे अखेरचे ब्रिटिश व्हॉईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन अशा अनेक मान्यवरांची व्यक्तिशिल्पे समक्ष बसून साठे यांनी घडविली आहेत.
भाऊंची देहयष्टी वामनमूर्ती म्हणावी अशी असली तरी त्यांची कलाप्रतिभा उत्तुंग होती. मृदुभाषी व हसतमुख असणारे भाऊ प्रसंगी समोरच्या व्यक्तीला मोजक्या कठोर शब्दांत खडसावणारे होते. कल्याणच्या खाडीकिनाऱ्यावर दुर्गाडी या जलदुर्गाजवळ शिवाजी महाराजांचा हिंदुस्थानी नौदलाचे प्रणेते शोभणारा पुतळा असावा अशी त्यांची संकल्पना, मुंबईतील नेहरू सेंटर येथे पं. नेहरूंचे आगळे स्मारकशिल्प, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर कन्याकुमारी येथे विवेकानंदांचा प्रेरणादायी पुतळा अशा काही आगळ्या कल्पना प्रत्यक्षात आल्या नाहीत याविषयीची खंत त्यांच्या बोलण्यातून कधीतरी डोकावत असे. मुंबईतील शिवस्मारकाविषयीही त्यांची काही परखड मते त्यांनी संबंधितांना ऐकवली होती. वय वाढल्यावर सामान्य माणूस निवृत्त होतो, थकतो, पण प्रतिभेची देणगी लाभलेल्या कलाकाराला हा शाप नसतो. भाऊंकडे बघितले की, याची सार्थता लक्षात येत असे. वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी दांडी येथे महात्मा गांधींचे उत्तुंग असे 18 फूट उंच शिल्प करण्याचे काम स्वीकारून पूर्ण करण्याइतकी जिद्द त्यांच्यामध्ये होती.
सदाशिवराव साठे हे कल्याण-डोंबिवली परिसरातील आदरणीय सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व होते. भाऊंच्या पत्नी नेत्रा साठे या प्रसिद्ध चित्रकार होत्या. त्यांनी कोल्ड सिरॅमिक पेंटिंग या नव्या चित्रकला प्रकाराचा शोध लावला. 23 ऑगस्ट 2014 रोजी नेत्राताईंचे निधन झाले. त्यानंतर भाऊ मनाने थोडे थकले, पण तरीही त्यांच्यातील कलाकार अस्वस्थ व निर्मितीक्षम होताच. वयाची नव्वदी ओलांडल्यावरही त्यांनी रंगसाहित्य मागवून नेत्राताईंची काही अपूर्ण चित्रे पूर्ण केली.
साठे कुटुंबात दीर्घायुष्याची परंपरा आहे. भाऊंच्या मातोश्री 106 वर्षांचे कृतार्थ आयुष्य जगल्या होत्या. भाऊ आपल्या आईचा वारसा चालवून शतक गाठतील अशा आशा व विश्वास होता. मात्र काळाने सर्वांना फसवले. भाऊंच्या महान कीर्तीचे शिल्प सर्वांच्या मनात चिरकाल राहील. त्यांचा कलाप्रेमाचा वारसा त्यांचे सुपुत्र श्रीरंग साठे आणि कलानिर्मितीचा वारसा त्यांची चित्रकर्ती सुकन्या साधना व शिल्पकार पुतण्या सिद्धार्थ पुढे चालवत राहतील.
‘चतुरंग’ प्रतिष्ठानचा एक कार्यकर्ता म्हणून मी एका कार्यक्रमाचे आमंत्रण करायला कल्याणमधील भाऊंच्या निवासस्थानी, साठेवाडय़ात सर्वप्रथम गेलो होतो. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे व ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्या मुलाखतीचा हा कार्यक्रम होता. भल्यामोठय़ा लाकडी दिंडी दरवाजातून आत गेल्यावर उजव्या हाताला भाऊंचा छोटा स्टुडिओ आहे आणि पहिल्या मजल्यावर भाऊ सहकुटुंब राहत होते. मी जेजेचा विद्यार्थी असल्याचे कळल्यावर भाऊंनी विशेष आत्मीयतेने विचारपूस केली होती.
(लेखक ज्येष्ठ ग्राफिक्स डिझायनगर आणि ‘आरोग्य संस्कार’ मासिकाचे संपादक आहेत.)

























































