देहबोली, पेहराव अन् मानसिकता…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> किरण खोत, निवेदक, सूत्रसंचालक

एक उत्तम वक्ता होण्यासाठी तुम्हाला शब्दांचा जितका अभ्यास  करायचा असतो तितकाच किंबहुना त्याहून जास्त महत्त्वाचा आहे तुमचा पेहराव, तुमची देहबोली आणि तुमचे सादरीकरण.

बोलताना आपण कसे उभे राहतो, आपल्या हातांचा उपयोग कसा करतो, बसल्यावर पायाची घडी कशी घालतो, मानेची हालचाल कशी करतो आणि प्रामुख्याने चेहऱ्यावरचे हावभाव कसे आहेत अशा अनेक गोष्टी तुमच्या बोलण्यासोबत तुमचा विषय प्रभावी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

 तुमची केशभूषा, वेशभूषा ते तुमच्या पायातील चपला, बूट इतकेच काय तुम्ही घातलेले मोजे, वापरत असलेला रुमाल, हातातले घडय़ाळ या सगळय़ांचे योगदान तुमच्या संभाषणात अतिशय महत्त्वाचे असते. एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी जेव्हा तुम्ही वक्ते म्हणून बोलायला जाणार असाल तर तुम्हाला तुमचे मंचावर घालावे लागणारे कपडे नीट इस्त्री करून घातले पाहिजेत, पायातल्या बुटांना चकाचक पॉलिश करायला हवे.

टापटीप प्रसन्न ताज्यातवान्या स्वरूपात तुम्ही बोलायला जेव्हा उभे राहता तेव्हा तुमचा आत्मविश्वास वेगळय़ा स्वरूपाचा तुम्हालाच जाणवू लागतो.

तुम्हाला आवडणार सुगंधी अत्तर, आवडत्या ब्रॅण्डेड कंपनीचा पेन, तुम्ही वापरत असणारी डायरी, त्यावर काढलेले अक्षर इतक्या बारीकसारीक गोष्टींचा प्रभाव तुमच्या बोलण्यावर पडत असतो.

आपण आपले लक्ष नुसत्या बोलण्यावर देऊन चालणार नाही, तर त्यासोबत तुम्ही तुमची देहबोली, पेहराव या गोष्टींनासुद्धा तितकेच महत्त्व द्या. राहणीमानात बदल करण्यासाठी तुम्हाला तुमच्यापेक्षा मनाने, ज्ञानाने, पैशाने श्रीमंत लोकांच्या वर्तुळात राहायला हवे.

तुम्हाला तुमच्या बोलण्यात बदल आणायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या देहबोलीत, पेहरावात आणि तुमच्या मानसिकतेत बदल करायला हवा.