
>> अजित कवटकर
भौतिकवादाच्या राक्षसी स्वार्थाने मनुष्याला आत्मकेंद्री बनवले आणि सामाजिक स्वच्छतेला तिलांजली दिली जात गेली. सामाजिक स्वच्छतेची जबाबदारी ही माझी नव्हे तर ती शासनकर्त्यांची वा ज्याला त्याबद्दल अधिक कणव आहे त्याची, असा दुसऱ्यावर आपली जबाबदारी ढकलणारा विचारप्रवाह समाजमनावर पुढे बळावत गेला. आपल्या आचरणात जोपर्यंत नैसर्गिक स्वच्छता मूळ धरत नाही, तोपर्यंत होणारी प्रगती शाश्वत म्हणता येणार नाही. एकूणच काय, तर स्वच्छतेविना गती नाही.
प्रगतीचे अनेक मापदंड आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा एक आहे तो, ‘स्वच्छता.’ विकसित राष्ट्रे अधिक स्वच्छ असलेली अनुभवास येतात. वेगळ्या बाजूने विचार करता, ती स्वच्छ आहेत म्हणून प्रगतीपथावर आहेत वा विकसित झालीत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. स्वच्छतेचा प्रभाव सर्वांगीण असतो आणि त्याची सकारात्मकता सर्वव्यापी परिणाम करत असल्याचे वैज्ञानिक आधारावरदेखील सिद्ध करता येते. स्वच्छ विचारांचा परिणाम स्वच्छ कृतीत दिसून येतो आणि त्यातूनच प्रगतीसाठीचे पोषक वातावरण निर्माण होते. निर्माणकारी, सकारात्मक ऊर्जा ही स्वच्छतेत वसते आणि म्हणूनच जीवनाची उक्रांती ही स्वच्छ पर्यावरणात घडत गेली. जीवन विकासासाठी त्यामुळे स्वच्छता अनिवार्य आहे. गलिच्छपणात अधोगती निपजते याची जिवंत उदाहरणं आपल्याला सहजपणे अवतीभवती बघायला मिळतात. त्यामुळे, स्वतःसाठी, समाजासाठी तसेच शाश्वत व समृद्ध जीवनासाठी स्वच्छतेबाबतची जागरूकता कृतीत दाखवणे आवश्यक आहे.
हातातील खाद्य पदार्थाचे रिकामे आवरण चालता-चालता रस्त्यावर फेकून देणे, सार्वजनिक ठिकाणी उभ्या अथवा बसल्याजागी बाजूला थुंकत बसणे, घराबाहेर कचरा लोटणे, पाण्यामध्ये कचरा विसर्जित करणे वगैरेसारख्या सवयींमुळे बाहेर सार्वजनिक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरत जाते. जिथे हे कचऱ्याचे ढिगारे साचतात, आपण त्याच पर्यावरणाचा एक भाग असतो आणि त्यामुळे केलेल्या कर्माची फळं आपल्याला तर चाखावी लागतातच, परंतु निष्पाप जिवांना विनाकारण यातून यातना भोगणे भाग पडते.
मनुष्य अतिक्रमण वा हस्तक्षेप नसणारे असे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास हे केवळ जीवनचक्राच्या नैसर्गिकतेवर व पर्यावरणातील परस्परावलंबनावर स्वच्छ, सुंदर, निर्मळ राहतात. तिथे निर्माण होणारा कचरा हा पुनर्चक्रीकरणातून त्या व्यवस्थेत ऊर्जेच्या रूपात पुन्हा समाविष्ट होतो आणि जीवनाला बळ देतो. तेथील प्रत्येक परिसंस्थेतील प्रत्येक घटक हा त्याबाबतीतील आपली कर्तव्यं अतिशय जबाबदारीने व जाणीवपूर्वक पार पाडत असतो. म्हणूनच ते प्रदूषणविरहित जग हे जीवनदायी म्हटले जाते ते याचसाठी. नैसर्गिक पर्यावरणातील ही कर्तव्यनिष्ठता, मानवी जगात तितक्या प्रामाणिकपणे स्वीकारली जात नसल्यामुळेच आज प्रदूषण वेगवेगळ्या रूपात राक्षसी बनत चालला आहे.
अस्वच्छता ही रोगांना जन्म देते, त्यांचा प्रसार करते. त्यातून होणारे विकार मनुष्यशक्ती व त्याची उत्पादनक्षमता कमकुवत करते. सभोवतालची अस्वच्छता वैचारिक प्रगल्भता वाढू देत नाही, जी समाजाची सुयोग्य जडणघडण खुंटवते. त्या गलिच्छपणात मनुष्य (जीवन) वाया जातो. उत्साह, उमेद, जिद्द यास खीळ बसून ते प्रगतीला मारक ठरते, अधोगतीला स्फूर्ती लाभते. एखाद्यावरील हा परिणाम त्याच्या अवतीभोवती तोच नकारात्मक प्रभाव उत्सर्जित करतो. यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडते, अर्थव्यवस्थेला नुकसानकारक ठरते, सार्वजनिक संसाधनं ही उत्पादनशील – प्रगतीशील प्रकल्पांवर खर्च न होता, ती या अस्वच्छतेतून निर्माण झालेल्या असंख्य समस्यांचे निवारण करण्यावर खर्च होतात. तेव्हा असा समाज अथवा विभाग हा आजारी, अज्ञानी आणि इतरांवर भार म्हणून बघितला जाण्याची शक्यता असते. याचे परिणाम सर्वांसाठी हानीकारक ठरतात.
आपले घर, परिसर, प्रदेश, देश हे स्वच्छ व सुंदर असण्याचे फायदे तेथील प्रत्येकाला होतात. आरोग्यदायी वातावरणात केवळ मानसिक व शारीरिक विकास होतो असे नाही, तर आर्थिक प्रगतीला विशेषकरून चालना मिळते आणि त्यातूनच सर्वांगीण उन्नती साध्य होते. हे एवढं, अशा प्रकारे साकारण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेचा आग्रह ठेवून, त्यादृष्टीने कृतिशील राहणे आवश्यक आहे. आपण आपला परिसर अस्वच्छ करायचा नाही, निदान एवढे जरी प्रत्येकाने ठरवले तरी आजच्या परिस्थितीत आमूलाग्र बदल होईल.
स्वच्छता हे ’संस्कार’ होय. त्यातही महत्त्वाचे म्हणजे त्यास जगाकडून निरपेक्ष स्वीकृती लाभली आहे. सर्व धर्म हे स्वच्छतेचा पुरस्कार करतात. धर्माच्या उत्पत्तीमागील प्रेरणाच मुळी सात्त्विकता होती व राहील. त्यातून बहरत गेलेल्या संस्कृतींनादेखील मानसिक, शारीरिक, सामाजिक स्वच्छतेचाच ध्यास होता. आचार-विचारांच्या शुद्धीकरणातून आत्मिक जग निर्मळ करणे हा धर्म-संस्कृतीचा प्राथमिक हेतू तर होताच, पण श्रेष्ठ तत्त्वं – मूल्यं यांच्या प्रसारातून स्वच्छतेचे संस्कार मनामनांत असे रुजविणे की बाह्य जग अधिक स्वच्छ, सुंदर, निरोगी व शाश्वत राखण्याच्या दृष्टीने निरंतर कर्म घडत राहतील, हा देखील होता.
मानवाकडून नैसर्गिक जीवनपद्धतीचे अनुकरण होईपर्यंत, या जगाचे जीवनसौंदर्य पुढील अनेक पिढय़ांकरिता ’शुद्ध’ ठेवण्यात यश लाभले. पण पुढे भौतिकवादाच्या राक्षसी स्वार्थाने मनुष्याला आत्मकेंद्री बनवले आणि सामाजिक स्वच्छतेला तिलांजली दिली जात गेली. सामाजिक स्वच्छतेची जबाबदारी ही माझी नव्हे तर ती शासनकर्त्यांची वा ज्याला त्याबद्दल अधिक कणव आहे त्याची, असा दुसऱ्यावर आपली जबाबदारी ढकलणारा विचारप्रवाह समाजमनावर पुढे बळावत गेला आणि तिथेच अस्वच्छतेचा प्रादुर्भाव होत गेला. आपल्या आचरणात जोपर्यंत नैसर्गिक स्वच्छता मूळ धरत नाही, तोपर्यंत होणारी प्रगती शाश्वत म्हणता येणार नाही. एकूणच काय, तर स्वच्छतेविना गती नाही.


























































