आभाळमाया – धुमकेतूचे ‘घर’

>> दिलीप जोशी

धुमकेतू हा शब्द उच्चारला की लगेच 1910मध्ये येऊन गेलेल्या ‘हॅली’च्या धुमकेतूची आठवण होते. इतकी त्याची चर्चा, फोटो आणि त्याबद्दलच्या कथा जगाला ठाऊक झाल्या आहेत, परंतु त्यानंतरही म्हणजे हॅलीचा धुमकेतू 1986ला पुन्हा (धुसर) दिसल्यानंतर धुमकेतूबद्दलची भीती कमी होऊन कुतूहल वाढीला लागलं. ही गोष्ट खूपच महत्त्वाची. आपल्याकडच्या अनेक खगोल संस्थांनी धुमकेतूची संपूर्ण माहिती देणारे कार्यक्रम अनेक ठिकाणी केले आणि योगायोगाने ‘हॅली’नंतर हेल-बॉप, ह्याकुताके असे मोठे दिसणारे, स्पष्ट दिसणारे धुमकेतू येऊन गेले. आमच्या ‘खगोल मंडळा’ने तर कित्येक धुमकेतूंची छायाचित्रंही घेतली आहेत.

तेव्हा सूर्यमालेच्या भेटीला येणाऱया धुमकेतूंविषयी अभ्यासकांत जागृती आणि जनसामान्यांमध्ये उत्सुकता आहेच. ती वाढायला दर दोन-चार वर्षांनी एखादा धुमकेतू येत असतो. पूर्वी ते येतच असतील, पण गेल्या चाळीस वर्षांत चांगल्या दुर्बिणी (टेलिस्कोप) वापरून धुमकेतूचं निरीक्षण आणि छायाचित्रण करण्याची सोय झाली तेवढी ‘हॅली’च्या आधी नव्हती म्हणा किंवा तेवढी वैज्ञानिक जागरूकता नव्हती असं म्हणूया. मला आठवतं आमच्या लहानपणी (बहुधा कौहुतेक) धुमकेतू पहाटेच्या आकाशात दिसायचा. ते ‘शॅडे नक्षत्र’ पाहावं की न पाहावं यावरही चर्चा व्हायची. तरी एकदा तो पाहिला जायचाच. कालांतराने जसजसं स्पेस सायन्स विकसित झालं तसतशी एकूणच विश्वाची संकल्पना जाणून घेण्यात लोकांनाही रस वाटू लागला. रात्री आकाशदर्शनाच्या कार्यक्रमाला जिथे पाच-पन्नास माणसं यायची तिथे आता शेकडय़ांनी गर्दी होते. ‘पॅण्डॅमिक’मुळे रात्रभराचं आकाशदर्शन आणि ‘ऍस्ट्रोफोटोग्राफी’चे दोन मोसम वाया गेल्याचं दुःख खगोलप्रेमींना आहेच, पण त्याला इलाज नाही.

हे सगळं का सांगितलं तर गेल्या काही आठवडय़ांत आपण ग्रहमालेतल्या काही वैशिष्टय़ांची माहिती घेत नेपच्यून-प्लुटोपलीकडच्या ‘कायपर बेल्ट’पर्यंत येऊन पोहोचलो. त्याहीपलीकडे धुमकेतूचं ‘घर’ आहे. तिथे ते लक्षावधींच्या संख्येने दाटीवाटी करून राहिले आहेत. त्यातलेच कोणी मुसाफिर फिरायला बाहेर पडतात. मध्येच सूर्याकडे आकर्षित होतात. त्यामुळे आपल्या सूर्यसंकुलात प्रवेश करतात आणि छान दर्शन देतात.

त्यामुळेच कधी तरी येणारा तो धुमकेतू ही व्याख्या आता बदलली असून धुमकेतू ठरावीक कालमर्यादेने येतातच असं सिद्ध झालंय. ‘हॅली’चा धुमकेतू दर शहात्तर वर्षांनी येणार म्हणजे येणार. तो ‘म्हातारा’ होत असताना किती अशक्य होईल हे मात्र त्यात असलेल्या द्रव्यावर अवलंबून आहे. शिवाय तो पृथ्वीच्या किती जवळून जाणार यावर त्याचं दर्शन सुस्पष्ट की अस्पष्ट ते ठरणार.

अगदी छोटे ‘अशक्त’ धुमकेतू सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने त्याच्याकडे खेचले जातात आणि सूर्यबिंबात विलीन होतात. त्यांना ‘सन ग्रेझिंग’ धुमकेतू म्हणतात. कॉम्प्युटर प्रोग्रॅमच्या मदतीने अशा नवनव्या धुमकेतूंचा शोध लावणारे तरुणही आहेत. त्यात मराठी तरुणाईचाही समावेश होतो.

तेव्हा धुमकेतूंचे ‘घर’ म्हणजे सूर्यमालेभोवती सर्वत्र एन्व्हलपसारखा विस्तारलेला उर्ट-क्लाऊड! 1950 मध्ये नेदरलॅण्डचे संशोधक जॅन उर्ट यांनी त्याचा शोध लावला. आपल्याच सौरसंकुलातील हा महत्त्वाचा भाग आहे असं त्यांनी सांगितलं आणि तिथे हजारो धुमकेतूंची वस्ती असल्याचंही स्पष्ट केलं. त्यातून येणारे धुमकेतू आपल्याला दिसतात. हे आता सर्वज्ञात आहे.
मग या वर्षी काही धुमकेतू दिसणार आहेत का? जानेवारी महिन्यात लेनार्ड यांनी शोधलेला धुमकेतू बहुधा पावसाळा संपल्यानंतर आपल्याला टेलिस्कोपमधून पाहता येईल. जानेवारी 22मध्ये तो सूर्याच्या सर्वात जवळ असेल. याशिवाय नोबाइज, स्कॉटी वगैरे धुमकेतू आहेतच.

असं म्हटलं जातं की, 2031मध्ये बर्नाडिनेली आणि बेमस्टिन यांनी शोधलेला (त्याच नावाचा) धुमकेतू सूर्यमालेला भेट देणार असून त्याचा पसारा (व पिसारा) 100 ते 200 किलोमीटरच्या आसपास आहे. म्हणजे तो मोठय़ा प्रमाणात दिसला तर पृथ्वी कदाचित हॅलीच्या धुमकेतूच्या शेपटातून गेली तशी जाईल.

एखादा धुमकेतू गुरूसारखा प्रचंड गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने वाटेतच कसा तुटतो आणि त्यावर कसा आदळतो हे 1994मध्ये शू मेकर लेव्ही हा धुमकेतू गुरू ग्रहावर आदळल्याचं तेव्हा पाहायला मिळालं. पृथ्वीच्या निर्मितीनंतरही लाखो वर्षे धुमकेतू आदळतच होते. धुमकेतू आणि अशनींच्या वर्षावापासून पृथ्वीची मुक्तता झाल्यावरच आपली जीवसृष्टी बहरली. तरी साडेसहा कोटी वर्षांपूर्वी डायनॉसॉर धुमकेतूच्या आघातानेच नष्ट झाल्याचं म्हटले जाते.

आपली प्रतिक्रिया द्या