लेख : आभाळमाया : नवा धूमकेतू

29

>>वैश्विक

रिटॅनेन नावाच्या दर साडेपाच वर्षांनी येणाऱ्या धूमकेतूचा शोध पूर्वीच लागला असला तरी हौशी आकाश-निरीक्षकांसाठी तसा तो नवाच म्हणायला हवा. कारण येत्या 16 तारखेला तो पृथ्वीपासून सर्वात जवळ म्हणजे अवघ्या दीड कोटी किलोमीटर अंतरावर आहे. वृषभ राशीच्या पार्श्वभूमीवर दिसणारा हा धूमकेतू लांब शेपटीवाला वगैरे दिसणार नसला तरी त्या रात्री दहापासून त्याचे दर्शन ही दुर्बिणीतून आकाशाचा वेध घेणाऱ्यांना एक पर्वणी ठरणार आहे.

परंपरेने ‘अशुभ’ ठरवलेल्या अवकाशस्थ गोष्टींमध्ये ग्रहण, खळं किंवा धूमकेतूंचा समावेश होता. आता त्यामागील विज्ञान समजल्याने गैरसमज दूर व्हायला मदत झाली. कोणतीही अवकाशस्थ घटना डोळ्यांची काळजी घेऊन म्हणजे ग्रहण पाहताना योग्य गॉगल वापरून दुर्बिणीतून बघताना योग्य फिल्टरचा वापर करून न्याहाळता येते. विशेषतः सूर्यासारख्या तेजस्वी, प्रखर ताऱ्याकडे पाहताना ही काळजी आवश्यक असते. मायलर फिल्मचे खास चष्मे वापरून सूर्यग्रहण पाहता येते आणि दुर्बिणीला सोलार फिल्टर लावून दिवसाही सूर्यावरच्या डागांचे निरीक्षण केले जाते.

…तर गोष्ट धूमकेतूची. ‘काय धूमकेतूसारखा उगवलास’ हा वाक्प्रचार आता विज्ञानाने कालबाह्य ठरवला आहे. कारण अचानक, न सांगता येणाऱ्याच्या बाबतीत धूमकेतूची उपमा दिली जायची. परंतु कोणताच धूमकेतू ‘अतिथी’ म्हणजे ‘तिथी’ न सांगता येणारा नसतो. गणिताने त्याची तिथी, गती आणि स्थिती या साऱ्या गोष्टींची माहिती आता आपल्याला आगाऊच मिळू शकते.

1910 मध्ये आलेला हॅलीचा प्रसिद्ध धूमकेतू येणार, असं हॅली या शास्त्रज्ञाने फार पूर्वीच सांगितलं होतं. तो दर 76 वर्षांनी येणार हेसुद्धा त्याच वेळी ठरलं होतं. प्रसिद्ध विनोदी लेखक 1834 मध्ये जन्माला आले ते हॅलीचा धूमकेतू दिसला त्या वर्षी. त्यानी विनोदाने म्हटलं होतं की, मी ‘हॅली’च्या धूमकेतूबरोबर आलोय आणि त्याच्याबरोबरच जाणार! योगायोगाने ते 1910 मध्ये निवर्तले. त्या वर्षी हॅलीचा धूमकेतू फारच मोठ्या प्रमाणात देखण्या स्वरूपात दिसला होता. तोपर्यंत जगात फोटोग्राफी चांगलीच विकसित झाल्याने हॅलीचे उत्तम फोटो निघाले. त्या वेळी या धूमकेतूच्या शेपटीचा पसारा एवढा मोठा होता की, आपली पृथ्वीही त्यातून पसार झाली होती!

साहजिकच 1986 मध्ये हा धूमकेतू पुन्हा दिसणार हे ठाऊक असल्याने खगोल अभ्यासकांनी त्याच्या स्वागताची खूप तयारी केली. तोपर्यंत फोटोग्राफीतच नव्हे तर टेलिस्कोपमध्ये (दुर्बिण) भरपूर सुधारणा झाल्या होत्या. त्यामुळे हॅलीचे विशाल दर्शन कॅमेऱ्यात कैद करायला सारे ऍस्ट्रोफोटोग्राफर उत्सुक होते. परंतु हॅलीने त्यांची घोर निराशा केली. आमच्या वांगणी येथील आकाशदर्शनाच्या जागी 1986 च्या मार्चमध्ये सुमारे 600 खगोलप्रेमी जमले होते, परंतु त्या वेळी तो एखाद्या कापसाच्या पुंजक्यासारखा दिसला.

धूमकेतूचं हे असंच आहे. त्यासाठी मुळात धूमकेतू कसे तयार होतात नि कुठून येतात हे लक्षात घ्यायला हवं. डच शास्त्रज्ञ उर्ट यांनी मांडलेल्या सिद्धांतानुसार आपल्या सूर्यमालेभोवती गोलाकार पसरलेला एक धूमकेतूंचा ढग आहे. त्यातून हे सारे धूमकेतू अधूनमधून सूर्यामालेत येत असतात. त्या ढगाला आता उर्ट क्लाऊड असंच नाव आहे. तर या उर्ट क्लाऊडमधून इतस्ततः भटकणाऱ्या धूमकेतूची निर्मिती झाली नी आपली सूर्यमाला निर्माण झाली. त्या काळापासून या ढगात हजारो धूमकेतू असून ते मूलतः बर्फाचा गोळा आणि त्यात मिसळलेले धुलीकण व दगड अशा स्वरूपात असतात. अगदी छोटे धूमकेतू सुर्यमालेत शिरल्यावर सूर्याकडे खेचले जाऊन सूर्यात विलिन होतात. त्यांना ‘सन-ग्रेझिंग’ धुमकेतू म्हणतात. ‘शू-मेक्ट-लेव्ही-9’सारखे धुमकेतू तुकडे होऊन गुरूसारख्या मोठ्या ग्रहावर आदळल्याचंही आपण पाहिलं आहे.

धूमकेतूच्या कक्षा लंबवर्तुळाकार, विविवृत्राकार अशा असू शकतात. हायबरबोलिक कक्षेतले धूमकेतू परत येत नाहीत. बाकीचे ठराविक काळाने येतात. एनकेचा धूमकेतू दर साडेतील वर्षांनी येतो. धूमकेतू सूर्याच्या जवळ येऊ लागला की त्यातील बर्फाळ द्रव्यातील घटक, बर्फ वितळल्याने बाहेर पडतात व त्यांची एक शेपूट तयार होते. त्यावरूनच धूमकेतूला शेंडेनक्षत्र असं म्हटलं गेलं. या शेपटीचा आकार धूमकेतूच्या मूळ बर्फाळ गोलकावर अवलंबून असतो. सूर्यमालेतून परत जाताना धूमकेतूच्या शेपटीतील द्रव्य तसंच मागे राहातं आणि त्यातील दगड-धोंडे उल्केच्या स्वरूपात पृथ्वीवर येतात ते ठराविक दिवशी नयनरम्य उल्कावर्षावाच्या स्वरूपात दिसतात. धूमकेतूंचा अभ्यास जीवसृष्टीच्या उगमाच्या दृष्टीनेही करता येतो. पृथ्वीवरची जीवसृष्टी निर्माण होण्यास कदाचित धूमकेतूही कारणीभूत असू शकतील असं म्हटलं जातं. यासाठीच धूमकेतू पाहायची संधी सोडू नका. मग तो ‘रिटॅनेन’सारखा अंधुक असला तरी!

आपली प्रतिक्रिया द्या